हत्तीबेट आणि रामघाटाची लढाई (भाग २५ )
हैदराबाद मुक्तीसंग्राम
भाग २५
हत्तीबेट आणि रामघाटाची लढाई
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
लातूर
मो.७५८८८७५६९९
आट्टर्गा येथे किसान दलाच्या तरुणांनी गाव बेचिराख करायला निघालेला मदतगार, अमीन व इतर तीन पोलीसांना ठार केले.निजामी राजवटीला आव्हान देणारी ही घटना होती. या घटनेमुळे सर्व गाव चिंतातूर झाले. सरकार आता यापेक्षा मोठी कारवाई करणार आणि यापुढे आपला निभाव लागणार नाही याची त्यांना जाणीव झाली. परत स्थलांतर सुरू झाले. टोळीतील तरुणांनी सुरक्षित ठिकाण म्हणून हत्तीबेटाची निवड केली. रात्रीच्या अंधारातच ते हत्तीबेटाच्या दिशेने चालू लागले. वलांडी मार्गे पहाटे पाचच्या सुमारास टोळी हत्तीबेटावर येऊन पोहचली. हत्तीबेट म्हणजे विस्तीर्ण पसरलेला डोंगर. तिथे असलेल्या नैसर्गिक गुहा व लेण्यांच्या दालनात टोळी राहू लागली. बेटाशेजारी धर्मापुरी (१९६२ साली हे गाव पूर्णपणे स्थलांतरित झाले आहे.) शंभू उमरगा, करवंदी, चवनहिप्परगा, ममदापूर, देवर्जन अशी अनेक लहान गावे आहेत. तेथील लोकांनी टोळीच्या जेवणाची व्यवस्था केली. काही दिवस टोळी हत्तीबेटावर निवांतपणे राहिली. मात्र टोळीच्या मागावर असलेली निजामी फौजची तुकडी हत्तीबेटावर चालून आली. दुपारी साधारणपणे तीनच्या सुमारास आक्रमण सुरु झाले. टोळीकडे संख्याबळ आणि शस्त्रसाठा मर्यादित होता. त्यामुळे टोळीप्रमुखांनी सर्वाना शत्रू टप्प्यात आल्याशिवाय प्रतिहल्ला करू नका असे सुचवले. टोळीतील तरुणांनी बेटावर असलेल्या केंगलाच्या आडोशाने मोर्चे धरले. प्रत्येकाला जागा नेमून देण्यात आल्या. शत्रू वेगाने बेटावर येत होता. प्रशिक्षित फौजेपुढे टोळीचा निभाव लागणार नाही असे फौजेच्या अधिकाऱ्यांना वाटले असावे. पण फौज गोळीच्या टप्प्यात येताच टोळीवाल्यांनी एकाच वेळी जोरदार फायरिंग सुरु केली. बेसावध असलेले काही जवान जखमी झाले. फौज मागे हटली पण काही वेळाने त्यांनी परत आक्रमण केले. टोळीकडे शस्त्रसाठा कमी असला तरी हिमतीची आणि लढाऊ वृत्तीची कमी नव्हती. जवळपास सहा वाजेपर्यंत युद्ध चालले. नैसर्गिक आडोशाचा फायदा घेऊन टोळीने फौजेला माघार घेण्यास भाग पाडले. उद्या सकाळी फौजेचे परत आक्रमण झाल्यास आपण संकटात सापडू, त्यामुळे आता येथे थांबणे योग्य नाही असा विचार सर्व प्रमुख मंडळीने केला. क्षणभराची विश्रांती न घेता रात्रीच्या अंधारातच त्यांनी तोंडचिरकडे प्रयाण केले. मजल दरमजल करत टोळी तोंडचिरला पोहचली.
तोंडचीर, कौळखेड या भागात अप्पाराव
पाटील कौळखेडकर
यांनी परिसरातील लोकांना संघटीत करून टोळी बनवली होती. यात तुकाराम पाटील (तादलापूर),
माणिकराव मुळे, चनवीर, हंसराज, बलवीर (डोणगाव)
कन्हैयालाल मारवाडी (मदनूर) किशनगिर, दत्तूगीर पैलवान(तोंडचिर) अशा अनेक स्वातंत्र्यप्रेमी तरुणांचा
समावेश होता.या टोळीत काही पैलवान व काही बंजारा
(लमाण) समाजाचे तरुण पण सहभागी झाले होते. आट्टर्गा किसान दलाची टोळी तोंडचीरला आल्याची
खबर उदगीरचे पोलीस व रझाकार यांना समजल्याशिवाय राहिली नाही. तोंडचीरला नारायणराव
बापूराव पोलीस पाटलांच्या टोलेजंग वाडयात
टोळी राहत होती. आट्टर्ग्याच्या टोळीमुळे रझाकार व पोलीस
आपल्या गावावर आक्रमण करतील असे गावातील काही
लोकांना वाटले. त्यामुळे त्यांनी टोळीतील लोकांना गावात राहू नका अशी विनंती केली.
गावातील लोकांचे म्हणणे ऐकल्यावर टोळी प्रमुखांनी गाव सोडायचा निर्णय घेतला. अप्पाराव
पाटलांची टोळी तिरुक्याकडे तर आट्टर्गा टोळी मशनेरच्या दिशेने
निघाली. सगळाच निजामी मुलुख. गावागावत रझाकार व पस्ताकोम. त्यामुळे
खेडया गावातील लोक सुद्धा टोळीला मदत करून जीव धोक्यात घालून घेण्यास तयार
नव्हते. टोळीतील बहादर तरुण रानावनाने उपाशीपोटी
फिरत होते. अखेर टोळी बावलगाव तांडा
मार्गे मशनेर येथे पोहचली. तेथे त्यांच्या जेवणाची सोय झाली.या भागातील लोकांनी पण टोळीला मदतीचे आश्वासन दिले.
उदगीरचे पोलीस व रझाकार अशा जवळपास
अडीचशे लोकांनी तोंडचिरवर हल्ला
केला. टोळी गावात नाही याची रझाकारांना
कल्पना नव्हती. या हल्ल्यामध्ये किसनगिरी महाराज, हनुमंत आग्रे व देवराव या तिघांना रझाकारांनी ठार
केले. गाव लुटले,
अनेक घरांना आगी लावल्या. आता मात्र गाववाल्यांना टोळीला गावात राहू न दिल्याचा पश्चाताप झाला. टोळीला
घडलेला घटनाक्रम कळवण्यात आला.
निरोप मिळताच टोळीवाले परत तोंडचीरला आले. गावाची स्थिती पाहून टोळीवाले उदास झाले. पण शांत राहणे त्यांना पसंद नव्हते. त्यांनी याचा
बदला घेण्याचा निर्धार केला. लवकरच टोळीतील तरुणांनी कुमदाळ येथे चार रझाकारांचा खात्मा
केला. या घटनेने उदगीर व परिसरातील रझाकार वर्चस्वाला धक्का बसला.आता परिसरातील
सर्व रझाकार यार महम्मदच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. आपल्यावर आक्रमण होणार हे टोळी
वाल्यांना माहिती होतेच, त्यांनी ही लढाईची परिपूर्ण तयारी केली. रझाकारांनी
सर्वप्रथम कौळखेड हल्ला केला. पण गावात कुणीही नव्हते. या अगोदर पण रझाकारांनी हे
गाव लुटले होते. अप्पाराव पाटलांचा वाडा जाळला होता. रझाकार तोंडचीरकडे निघाले. टोळीला
याची खबर अगोदरच लागली होती. गावात राहून लढा देणे शक्य नाही हे ओळखून
टोळीवाल्यांनी या भागातील डोंगररांगांचा आश्रय घेतला. यावेळी दोन्ही टोळीतील तरुण एकत्र होते. परिसरातील
लोकांची त्यांना साथ मिळाली. रामघाटात रझाकारांनी टोळीवर हल्ला केला. रझाकारांची
संख्या प्रचंड होती. प्रसंग खूप कठीण होता. पण टोळीतील तरुण सिंहासारखे शूर होते.अटीतटीची
लढाई सुरु झाली. या लढाईत टोळीतील तरुणांनी शर्थीची झुंज दिली. टोळीतील काही तरुण
घनदाट झाडीतून मार्ग काढत रझाकारांच्या पिछाडीवर गेले आणि त्यांनी तेथून जेजालचा (छोटी
तोफ) भयानक मारा सुरु केला.
हे हत्यार निर्णायक ठरले. दोन्ही बाजूने आक्रमण झाल्यामुळे रझाकार गोंधळले. रझाकारात बाजारबुनग्यांची
संख्याच जास्त असावी. अनेकांनी पळ काढला. इकडे टोळीवाल्यांनी भेदक मारा करून रझाकारांना
सळो कि पळो करून सोडले. रझाकार सदर यार महम्मद ठार होताच बाकीच्या रझाकारांनी फळ काढला. या लढाईत अनेक रझाकार मारले
गेले. अगदी शेवटच्या टप्प्यात टोळीचा
देवराव पाटील हा तरुण हुतात्मा झाला.
निवृत्तीराव गायकवाड, यशवंतराव
सायगावकर, माणिकराव मुळे, व्यंकटराव मुळे, अप्पाराव पाटील, भीमराव बिरादार(पुढील
काळात मिरखलचा भिमा म्हणून कुप्रसिद्ध) या वीरांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने
रझाकारांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर टोळी परत आट्टर्ग्याला परतली. तेथे काही दिवस
राहिल्यानंतर ते सोलापूरला शस्त्र आणण्यासाठी गेले. या वेळी मादनहिप्परगा (ता.आळंद
जि.गुलबर्गा) येथे निजामी फौजेसोबत झालेल्या लढाईत डॉ.चनाप्पा, माणिकराव मुळे व
समर्थ या टोळीच्या वीरांना हौतात्म्य
प्राप्त झाले. पण येथील गढीवर पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकावण्याचा मान आट्टर्गा टोळीच्या वीरांना मिळाला. आट्टर्गा या छोटयाशा गावातील तरुणांनी
आजूबाजूच्या गावातील काही स्वातंत्र्यप्रेमी तरुणांच्या मदतीने हैदराबाद मुक्तीसंग्रामात
दिलेले योगदान सुवर्णाक्षराने लिहून ठेवावे असेच आहे. अर्जुन जाधव यांनी किसान
दलाच्या शौर्याची गाथा ‘मुक्तीची पहाट’ या ग्रंथात शब्दबद्ध केली आहे.
उमाटे
भाऊसाहेब शिवाजीराव ,लातूर ७५८८८७५६९९ www.bhausahebumate.com
Post a Comment