हैदराबाद: सर रोनल्ड रॉस आणि नोबेल.. भाग ६
हैदराबाद मुक्तीसंग्राम
भाग ६
हैदराबाद:
सर रोनल्ड रॉस आणि नोबेल..
भाऊसाहेब
शिवाजीराव उमाटे,
लातूर
मो.न.७५८८८७५६९९
हैदराबादच्या
इतिहासात अत्यंत गौरवाने ज्या बाबीचा उल्लेख करावा लागेल त्यात सर रोनल्ड रॉस
यांच्या नोबेल पुरस्कारप्राप्त शोधाचा
उल्लेख करावाच लागतो. आज आपण हैदराबादचे जोड शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
सिकंदराबाद येथे लागलेल्या एका महान शोधाची कथा जाणून घेणार आहोत.भारतातील पहिले
नोबेल पुरस्कार विजेते म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा यथार्थ गौरव केला
जातो.१९१३ला गुरुदेवांना साहित्याचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पण गुरुदेवांना
नोबेल पुरस्कार मिळण्याच्या अकरा
वर्ष अगोदरच हैदराबाद संस्थानात सर्जन
म्हणून आलेल्या सर रोनल्ड रॉस यांना त्यांनी
लावलेल्या शोधासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता याची माहिती अनेकांना नाही.
जन्माने भारतीय पण मूळ इंग्लंडच्या सर रोनल्ड रॉस यांना १९०२ मध्ये
वैद्यकशास्त्रातील सर्वोच्च नोबेल
पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हैदराबादच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी ही घटना..अर्थात सर रोनल्ड रॉस यांनी लावलेल्या शोधाची कथा जाणून घेणे हे केवळ मनोरंजकच नसून आजही प्रेरणादायी आहे. हैदराबादचा इतिहास लिहिताना सर
रोनल्ड रॉस यांनी सिकंदराबाद मध्ये लावलेल्या महान शोधाचा विसर पडू नये हीच
लेखकाची यामागची भूमिका आहे.विशेष म्हणजे बेगमपेठ विमानतळापासून जवळच असलेल्या एका
इमारतीमध्ये मानव जातीच्या इतिहासातील एक महान शोध लागला होता याची जाणीव त्या
भागातील बहुतांश लोकांना ही नाही.
जगातील अनेक
देशात हिवतापाच्या आजाराची लागण फैलावण्याचे प्रमाण आजही मोठया प्रमाणात दिसून येते. त्या काळात तर अशा
साथीच्या रोगांनी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागे.त्यावरून आपण मलेरिया आजाराचे वाहक असलेल्या डासांच्या शक्तीची कल्पना करू
शकतो. १३ मे १८५७ ला कुमाऊंच्या पहाडी इलाख्यातील अल्मोडा येथे सर
रोनल्ड रॉस यांचा जन्म झाला. दहा भावंडातील रोनल्ड सर्वात मोठा. त्यांचे वडील मेजर
कॅम्पबेल रॉस हे लष्करी सेवेत असल्याने त्यांच्या कुटुंबाची भारतभर भ्रमंती चालत असे. शालेय शिक्षण
झाल्यानंतर रोनल्डला वडिलांनी शिक्षणासाठी आपल्या मायभूमीला म्हणजे इंग्लंडला
पाठवले. आपल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी नोबेल पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या
रोनल्डला आरंभीच्या काळात वैद्यकीय शिक्षणात फारसी रुची नव्हती. तो कविता लिही, मूर्ती बनवत असे तसेच संगीत रचनाही करत असे.
वैद्यकीय अभ्यासक्रम संपत आला तरी पण
रोनल्डची कला प्रांतातील मुशाफिरी काही थांबत नव्हती. पण एकदा अचानक रोनल्डला आपण आपल्या आई वडिलांचा अपेक्षाभंग करत आहोत
याची तीव्र जाणीव झाली आणि त्यानंतर मात्र त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. रोनल्डने
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर वैद्यकीय पदवी तर प्राप्त केलीच पण शल्यशास्त्रात प्रावीण्य ही मिळवलं.
पुढे ते भारतात परतले. भारतीय वैद्यकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आणि लष्करात
डॉक्टर म्हणून त्यांची नियुकी झाली.
१८८५ ला बंगलोरला असल्यापासून त्यांनी ‘डास’ हा आपल्या अभ्यासाचा विषय बनवला. पुढे सिकंदराबाद मधील लष्करी तळावर सर्जन म्हणून त्यांची बदली झाली. पीतज्वर,हत्तीरोग व हिवताप हे डासवाहक रोग असल्याचं तोपर्यंत मान्य झालेलं होत. नेमकं त्याच बाबीवर रोनल्ड रॉसने लक्ष केंद्रित केले. त्यांनी आपल्या संशोधनासाठी विविध पथके नेमली. ही पथके हैदराबाद – सिकंदराबादच्या विविध भागातून डास व पिलांचे नमुने गोळा करून आणत. तसेच मलेरिया पिडीत रुग्णांना मच्छरदाणीत झोपवून त्यात काही डास सोडले जात. ते डास त्या मलेरिया ग्रस्त रुग्णाला चावल्यामुळे रोगवाहक बनतील व त्या डासांच्या विच्छेदनातून काही संकेत मिळतील यासाठी तो प्रयत्न असे. जे रुग्ण यासाठी तयार होत त्यांना आर्थिक मोबदला ही दिला जात असे. पण याचा फारसा फायदा मात्र होत नव्हता.रोनल्ड शोधपथकांनी आणलेल्या डासांचे अथकपणे विच्छेदन करून त्याच्या सविस्तर नोंदी करत होते. हा प्रयोग दीर्घ काळ चालूनही त्यांना कोणतेच संकेत मिळत नव्हते. या काळात प्रचंड श्रमाने रोनल्ड रॉस मरगळून जात असे. अगदी भर दुपारचा रस्ता सुद्धा आपणास दिसत नसल्याची नोंद त्यांनी आपल्या रोजनिशीत केलेली आहे.
१६ ऑगस्ट १८९७
ला मोहम्मद बक्षी या सहायकाने एक बाटली आणून दिली, त्यात एक डझनभर डास होते.त्यांनी
आपल्या डायरीत नोंद केली, “बाटलीतले डास हिवतापानं ग्रस्त रुग्णांवर पोसलेले होते.
२० ऑगस्टला मी कामावर गेलो, तेव्हा अॅनोफेलीज जातीचे तीन डास बाटलीत जिवंत
असल्याचे मला आढळले.” नेहमीप्रमाणे पेशंट
पाहत रॉसने आपला पत्रव्यवहार पूर्ण केला.त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास त्यांनी डासांच्या
विच्छेदनास आरंभ केला. दुपारची वेळ... प्रचंड उकाडा. पण पंखा लावता येत नव्हता,
कारण वाऱ्याने डास उडून जात. रॉस
उकाड्याने हैराण झाला होता. त्यांचे डोळे थकलेले होते. आता फक्त एकच अॅनोफेलीज डासाचे परीक्षण उरले होते. ते करावे की
नाही असा विचार रॉसच्या मनात डोकावत होता. पण हातातलं काम पूर्ण करायचेच या
निश्चयाने ते कामाला लागले. अत्यंत काळजीपूर्वक डासांच्या पोटातील पेशी अलग करीत
रॉसने त्याचं निरीक्षण सुरु केले आणि आश्चर्य म्हणजे एखादा दडलेला खजिना सापडावा
त्याप्रमाणे तो आनंदाचा क्षण जवळ येऊन ठेपला.अचानक कोशिकेसारखा एक अंश
सूक्ष्मदर्शकाखाली रॉसच्या नजरेस पडला.त्याच्या सूक्ष्म आकारावरून ती डासाची
कोशिका नव्हे हे रॉसला कळून चुकले. आणखी काही पेशी मागे सारल्या, पुन्हा तसाच अंश
दिसला... हेच ते डासांच्या पोटातील हिवतापाचे जीवाणू, याबद्दल रॉसच्या मनात कोणतीच
शंका राहिली नाही. रॉस आनंदाने बेभान झाले.
असंख्य बळी घेणाऱ्या मलेरियाचे रहस्य अखेर उलगडलं होतं. हिवतापाच्या जीवाणूच्या
शोधानंतर त्या जीवघेण्या आजाराच्या चक्राची संगती लावणे वा अन्य अनुषंगिक बाबी रॉसला
मुळीच अवघड गेल्या नाहीत.आपल्या शोधाने आपण साक्षात मृत्यूवर देखील मात केल्याचा रॉस
यांचा आत्मविश्वास त्यांनी या काळात लिहिलेल्या कवितांमधून व्यक्त होतो.
मानवी जीवनात
क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणाऱ्या या संशोधनानं रॉसला १९०२ मध्ये ७८०० पौंडाचे
नोबेल पारितोषिक मिळाले. ‘एक अनपेक्षित व महान सन्मान’ अशी रॉसची त्यावर
प्रतिक्रिया होती. या पुरस्कारामुळे रॉसला अनेक सन्मान प्राप्त झाले. पुढे ते इंग्लंडला
स्थायिक झाले. हिवतापाच्या प्रभावी नियंत्रणाबद्दल रॉस यांनी केलेली टिप्पणी आजही
महत्वाची आहे.रॉसच्या मते,अनेक दाट लोकवस्तीच्या भागातून हिवतापाच्या डासांच्या
मुक्त संचारास त्या वस्तीतील रहिवाशांचा निष्काळजीपणा तर कारणीभूत असतोच पण
त्यासाठी प्रामुख्याने जवाबदार असते ते स्थानिक नगरपालिका,महानगरपालिका प्रशासन.
स्थानिक प्रशासनाने केवळ राजकारणात गुंतून न पडता विज्ञान विषयक ग्रंथाचे अध्ययन
केल्यास हे विश्व कितीतरी सुखावह स्थान बनेल, हे रॉसचे मत आजच्या संदर्भातही खरे
आहे...
सिकंदराबाद मधील
ज्या वास्तूत ही ऐतिहासिक घटना घडली त्या वास्तूचे मात्र फारसे जतन झाल्याचे वा
गौरवाने उल्लेख झाल्याचे पहावयास मिळत
नाही.अपूर्व जिद्द व अथक प्रयत्नांनी रॉसने ज्या वास्तूत हिवतापाचं रहस्य भेदले
त्या वास्तूमध्ये अनेक वर्ष एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यासाठी उपहारगृह चालवले जात
होते यावरून आपले शासन ऐतिहासिक वारसा जतन
करण्यासाठी कशा प्रकारे पुढाकार घेते याचा अंदाज लावू शकतो. असे असले तरी भारतीय भूमीत जन्मलेल्या व आपल्या हैदराबाद संस्थानात असताना संशोधन केलेल्या एका महान
शास्त्रज्ञाचा व त्याच्या शोधाचा एक
संस्थांनी माणूस म्हणून आपणास रास्त अभिमान असणे साहजिकच आहे.
(लेखक हैदराबाद
मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक असून बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत्त.मो.न.७५८८८
७५६९९)
Post a Comment