हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग : गोर्टा हत्याकांड


हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग
गोर्टा हत्याकांड

       हैदराबाद मुक्तीसंग्राम हे वास्तविक पाहता भारतीय स्वातंत्र्य लढयाची प्रतिकृतीच.भारतीय स्वातंत्र्य लढयात जसे इंग्रजाच्या कौर्याचे उदाहरण म्हणून जालियनवाला  बाग हत्याकांड ओळखले जाते तसेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढयात  रझाकारांच्या  कौर्याचे प्रतिक  म्हणून  ‘मुचलंब’  व  गोर्टा’    येथील हत्याकांड ओळखले जाते. १० मे १९४८ रोजी झालेल्या या पूर्णपणे दुर्लक्षित घटनेविषयी  हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे यांनी सादर केलेला शोध निबंध.
                        
                 १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण अजून स्वातंत्र्याची परिपूर्ती झाली नव्हती, कारण  भारतातील काही संस्थानिकांचा  भारतात विलीनिकरणास विरोध होता,भारताचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुत्सदीपणे ५६५ पैकी बहुतांश संस्थानांचे १५ ऑगस्ट १९४७ पुर्वीच भारतात विलीनीकरण केले पण काश्मिर, जुनागड व हैदराबादच्या  संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वातंत्र्य देण्यास व भारतात विलीन होण्यास  नकार दिला, त्यातील आपले  हैदराबाद हे संस्थान निजामाच्या पोलादी जोखडा खाली  होते , येथे आसफिया घराण्याची सत्ता १७२४ ला स्थापन झाली होती.या घराण्यातील राजे ‘निजाम’ या त्यांना मिळालेल्या पदवी वरून ओळखले जात. 
             हैदराबाद हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंखेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे संस्थान होते. या संस्थानाचा विस्तार १६ जिल्हयात पसरला होता. यापैकी ८ जिल्हे तेलगु भाषिक, 3 जिल्हे कन्नड भाषिक तर ५  जिल्हे मराठी भाषिक म्हणजे आपल्या मराठवाड्यातील होते. संस्थानाची लोकसंख्या १ कोटी ६३  लाख ३८ हजार ५३४ होती, तर क्षेत्रफ़ळ ८२३१३  चौ.मैल इतके होते . वार्षिक उत्पन्न २६ कोटी रुपयाचे होते. या संस्थानातील ८५ % प्रजा हिंदू होती तर संस्थानिक मुस्लिम होता. सरकारी नौकरीमध्ये  मुस्लिमांचे प्रमाण ७५ % हिंदूचे २० % असे होते. संस्थानात तेलगू, मराठी, कन्नड व उर्दू या प्रमुख भाषा होत्या मात्र १८८४ पासून उर्दूला राज्य भाषेचा दर्जा होता. शिवाय हैदराबाद संस्थानाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४२ % भाग विविध जहागीरीने व्यापला होता .
            हैदराबादचा स्वातंत्र्यालढा हा भारतीय स्वातंत्र्य लढयाचाच भाग होता. येथील प्रजेला दुहेरी पारतंत्र्यात राहावे लागत होते. राजकीय पारतंत्र्य तर होतेच पण त्या बरोबर जनतेच्या शिरावर सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते. ब्रिटीशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती.   
           हैदराबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची प्रतिकृतीच होय. भारतीय स्वातंत्र्यलढयात जी आंदोलने झाली ती अल्प स्वरुपात का होईना येथे झाली. हिंदू महासभा, आर्य समाज, स्टेट कॉंग्रेस यांच्या वतीने निशस्त्र प्रतिकाराचे सत्याग्रह झाले. विद्यार्थांनी वंदेमातरम् आंदोलन केले. स्वामीजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक सत्याग्रह केले. ग्रामीण भागात व सरहदीवर अनेक सशस्त्र दले स्थापन झाली. १९४२ च्या चले जाव चळवळीचे पडसाद हैदराबाद मध्येही उमटले. साराबंदीचे आंदोलन झाले, शिंदीची झाडे तोडण्याचा जंगल सत्याग्रह झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी सत्याग्रह झाले. सातारा जिल्हयातील प्रतिसरकार प्रमाणे गोवर्धन सारोळा व इतर अनेक गावात निजामाची सत्ता धुडकावून लावली गेली. निजामाच्या गाडीवर बॉंब टाकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्नही झाला.क्रांती कार्यासाठी निधी जमवण्याच्या प्रयत्नातून उमरी बँक लुटल्याचेही उदाहरण आहे.  
          सातव्या निजामाचे नाव नवाब उस्मान अली खां असे होते, भारतातील सर्वात विलक्षण व विक्षिप्त संस्थानिक म्हणून सातवा निजाम ओळखला जात असे ,रुस्तुम-ई दौरान ,अरस्तू- ए - जमाल, वलमा मलिक ,असिफजहा,अशा अनेक पदव्या तो लावत असे. हा इतर निजामाच्या तुलनेत काही बाबतीत वेगळा होता .इतर निजाम हे अन्य संस्थानिकाप्रमाणे ‘हिज हायनेस’ होते पण उस्मानअली एकटाच ‘हिज एक्झालटेड  हायनेस’ होता.हा ब्रिटीशांचा ‘फेथफुल अलाय’ होता कारण पहिले महायुद्ध चालू असताना याने ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय केले होते .अमेरिकेतील फोर्ड नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.यास पैसा व सत्ता या दोन गोष्टीचे जबरदस्त आकर्षण होते.हा महत्वकांक्षी, हुशार तर होताच शिवाय राजकीय डावपेच करण्यात व कटकारस्थाने रचण्यात पुरेसा चतुर होता.एक मात्र खरे आहे की उस्मान अली  इतर संस्थानिकाच्या  तुलनेत अत्यंत साधा ,निर्व्यसनी ,विलास, शानशौक, बडेजाव यापासून दूर होता. तो शेकडो नौकर-चाकर असूनही नमाज पढताना आपली चटई आपल्या हाताने पसरीत असे व नंतर गुडाळून ठेवत असे.सुमारे एक हजार कोटीची मालमत्ता बाळगणारा निजाम आठवड्याला फक्त वीस रुपये स्वतःवर खर्च करीत असे. हा १९११ ला गादीवर आला होता.याचे एकच स्वप्न होते ते हैदराबाद स्वतंत्र राज्य करणे.हा गादीवर आल्यापासून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरु केले.त्याने आपल्या  महत्वकांक्षेच्या पूर्ततेसाठी मुस्लीम धर्माचा व मुस्लीम जातीयतेचा आधार घेतला. उस्मान अलीने १९२१ मध्ये एक आदेश काढून सभा संमेलने,बैठकी- प्रवचने, मिरवणुका यावर सक्त बंधने लादली.व्यायाम शाळा,आखाडे,खाजगी शाळा, ग्रंथालये परवानगी वाचून काढू नयेत अशी सक्ती करण्यात आली.गश्ती निशाण ५२ आणि ५३ या नावाने हे दोन आदेश हैदराबाद संस्थानात ओळखले जात होते.  
             संस्थानात आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी निजामाच्या आशीर्वादाने ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना १९२८  साली झाली. पुढे चालून लातूरचा कासीम रझवी  या संघटनेच्या अध्यक्षपदावर आला याने खाकसारच्या धर्तीवर रझाकार या संघटना बनवली.खुद निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचारास सुरुवात केली.या संघटनेची सदस्य संख्या पुढे चालून दीड लाखापर्यंत झाली.रझाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानात ५२ केंद्रे होती, प्रत्येक रझाकाराला दरमहा साठ रुपये पगार मिळे. कासीम रझवी हा लातूरचा साधा वकील होता मात्र त्याचे नेतृत्व अफाट होते. तो दिल्लीच्या लाल किल्यावर निजामाचा झेंडा फडकविणार अशी वल्गना करीत असे.कासीम रझवीच्या नेतृत्वाखालील   रझाकार संघटनेने  संस्थानातील हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचाराचे सत्र सुरु केले हजारो लोकांच्या कत्तली केल्या ,अनेक गावे जाळली खून,बलात्कार, लुटालूट यांची परिसीमा गाठली.
           स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद स्टेट कॉंग्रेसने हैदराबाद संस्थान  भारतीय संघराज्यात विलीन करण्याचे जे ऐतिहासिक कार्य केले त्यास भारताच्या इतिहासात तोड नाही.पण याची सुरुवात हिंदू महासभा, आर्य समाज यांनी केली होती.या लेखात आर्य समाजाच्या लढ्यातील काही ठळक घटनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.      
            हैदराबाद संस्थानात निजामाच्या अन्यायाविरुद्ध प्रथम आवाज उठविण्याचे काम आर्य समाजाने केले.२४ ऑक्टोबर १९३८ ते ७ ऑगस्ट १९३९ या कालावधीत आर्य समाजाने आपले १२ हजार सत्याग्रही तुरुंगात पाठविले , संस्थानात १९४१ पर्यत २४१ शाखा कार्यरत होत्या. संस्थानात आर्य समाजाचे ४०००० अनुयायी होते.  यात मोठ्या प्रमाणात संस्थानाबाहेरील सत्याग्रही होते, आर्य समाजाचा मुख्य प्रभाव उस्मानाबाद ,नांदेड ,बिदर व गुलबर्गा या जिल्हयात मोठ्या प्रमाणात होता .आर्य समाजाने मुस्लीम धर्मप्रसार व धर्मांतर (तबलीग )यांना प्राणपणाने विरोध केला. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता त्यामुळे  आर्य समाजाची स्थापना ,आर्य मंदिर, हवनकुंड, आर्य कीर्तन इ.  प्रतिकारातूनच करावी लागली पण आर्य समाजामुळे  मुस्लीम धर्मांतर मोहिमेस आळा बसला.एकीकडे निजाम सरकार व मुस्लीम धर्माध शक्ती वाढत्या अत्याचाराकडे वाटचाल करीत होत्या तर आर्य समाज अधिक परिणामकारक प्रतिकाराचे मार्ग शोधत होता. हैदराबाद संस्थानात इस्लाम धर्मीयांखेरीज कोणालाच विशेषता हिंदुना कसलेच धर्मस्वातंत्र नव्हते.आर्य समाजावर तर सरकारची वक्रदृष्टी होतीच. मराठवाडयात आर्य समाजाची पहिली शाखा धारूर (जि.बीड)  येथे स्थापन झाली,नंतर  निलंगा(जि.बिदर)   येथे आर्य समाज स्थापन झाला.१९३५ मध्ये बिदरच्या मिर्जा मुहम्मद  या  कलेक्टरने एके दिवशी निलंगा येथील समाजमंदिर व हवनकुंड पायदळी तुडवून जमीनदोस्त केले . संस्थानभर याचे तीव्र पडसाद पडले शेवटी ते मंदिर कलेक्टरला स्वतः च्या पैशातून बांधून देण्याचे आदेश दिले गेले व विशेष म्हणजे  त्याची अंमलबजावणी झाली.१०
               इ.स.१९३७ मध्ये अनेक संताप जनक घटना घटल्या.  मुक्तीसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र गुंजोटी येथील आर्यसमाजाचे कार्यकर्ते वेदप्रकाश यांच्या हत्येपासून सुरु होते , गुंजोटी येथील वेदप्रकाश यांचे मूळ नाव दासप्पा असे होते.१९३६ -१९३७ या काळात या भागात अनेक गावात आर्य समाजाची स्थापना झाली होती.भाई बंशीलाल,भाई श्यामलाल ,पं.विरभद्रजी आर्य ,पं. कर्मवीरजी, आर्य उदयवीर, माधवराव घोणशीकर, पं.नरेंद्रजी  यांनी या भागात हिंदुना संघटीत करण्याचा प्रयत्न केला.वेदप्रकाश आर्य समाजाच्या कार्यात उत्साहाने सहभागी होत होते.यामुळे रझाकाराना  वेदप्रकाश डोळ्यात खुपत होते.
          २३ फेबुवारी १९३७ ला गुंजोटी येथे भाई बंशीलाल यांचे व्याख्यान आयोजित केले होते.भाषण ऐकण्यासाठी अनेक गावातील लोक आले होते.वेदप्रकाश पं.बंशीलाल यांना आणण्यासाठी उमरगा येथे गेले होते पण सायंकाळपर्यंत पं . बंशीलाल आले नाहीत त्यामुळे वेदप्रकाश निराश होऊन गावी परतले.परगावचे लोक वाट पाहून चार वाजल्यानंतर आपापल्या गावी परतले.गावातील मजलिसे  इत्तेहादुल मुसलमीनच्या गुंडांना आर्य समाजाच्या या कार्याचा रोष होता,त्या दिवशी आर्य समाजाचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी अनेक गावाहून   गुंड आले होते.आता ते घोषणा देत वेदप्रकाशच्या घराकडे आले. पं . बंशीलाल आले असावेत या कल्पनेने वेदप्रकाश उत्साहाने पळत सुटले.तितक्यात  गुंडांनी त्यांना घेरले.वास्तविक पाहता पिळदार शरीराचे वेदप्रकाश आपली तलवार न घेताच शत्रूच्या गराड्यात सापडले, तलवारीच्या घावांनी वेदप्रकाश यांचे शरीर रक्ताने माखून निघाले.लढता लढता ते कोसळले .वेदप्रकाश  हुतात्मा झाले, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील वेदप्रकाश हे  पहिले  हुतात्मा, ही बातमी सर्वदूर पोहचली,सर्वत्र हाहाकार माजला.११  

             हुतात्मा वेदप्रकाश नंतर बसवकल्याण येथे तशीच घटना घडली.या गावात धर्मप्रकाश हे आर्य समाजाचे कार्यकर्ता होते,यांचे मूळ नाव नागप्पा असे होते ,हे हिंदू मुलांना व्यायाम शिकवीत, धर्मप्रकाश आर्य समाज मंदिरातून घरी जात असताना मुसलमान समुदायाने त्यांना घेरले तलवारीने वार केले,धर्मप्रकाश हुतात्मा झाले.१९३८ मध्ये उदगीर येथे दसऱ्याच्या मिरवणुकीवर मुसलमानांनी हल्ला केला, गोळीबार केला,आर्य समाजाचे कार्यकते माणिकरावांच्या दिशेने गोळीबार झाला.माणिकराव यांना वाचवण्यास जाऊन त्यांचे  सहकारी भीमराव मरण पावले पुढे दवाखान्यात माणिकराव पण वारले,गावात अनेक घरावर मुसलमानांनी हल्ले केले.भीमरावची काकू पण गोळीबारात मरण पावल्या. यावेळी आर्य समाजाचे नेते पं. श्यामलालजी  यांना अटक केली कारण त्यांच्यामुळेच या भागात आर्य समाजाचा प्रभाव झपाटयाने वाढला होता, त्यांना बिदरच्या तुरुंगात अंधार कोठडीत ठेवले. १६ डिसेंबर १९३८ ला तुरुंगात त्यांच्यावर विषप्रयोग झाला व त्यातच त्यांचे निधन झाले,सोलापूर येथे त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.सरकारच्या आशीर्वादाने चालू असलेल्या राक्षसी कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट आली.१२  पुढे ही आर्य समाजाच्या हुतात्म्याची परंपरा चालू राहिली. आर्य समाजाच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनता निर्भयपणे निझामाशी,रझाकारांशी  मुकाबला करू लागली,पुढे चालून हैदराबाद स्टेट कॉंग्रेसला अनेक निर्भय कार्यकर्ते आर्य समाजाने तयार केलेल्या पायाभरणीमुळे मिळाले.
               आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागात आंध्र परिषद , मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्र्याचा  जो लढा येथे चालवला गेला त्याचे नेतृत्व कर्मयोगी संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.१९३८मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना केली.त्यांना रेड्डी ,सिराज - उल –हसन तिरमिजी यांची साथ लाभली.निजामाने या संघटनेवर बंदी घातली. हैदराबाद स्टेट कॉंग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी लढा सुरु झाला,या लढयाचे नेतृत्व कर्मयोगी संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ या झुंजार सेनानीने केले.१३  ११  जून १९४७ रोजी निजामाने आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही तर स्वतंत्र राहणार अशी घोषणा केली .पुढे २७ नोव्हेंबर १९४७ ला भारत सरकारने निजामाशी जैसे थे करार केला .
              हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र गुंजोटी(ता.उमरगा ) येथील आर्यसमाजाचे कार्यकर्ते वेदप्रकाश यांची  ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’च्या गुंडांनी घडवून आणलेल्या  हत्येपासून सुरु होते, गोरटा  येथे मात्र रझाकारांनी  अन्याय ,अत्याचाराची परिसीमा गाठणारे हत्याकांड घडवून आणले. (भारतीय स्वातंत्र्यलढयातील ब्रिटीशाच्या कौर्याची परिसीमा गाठणारे हत्याकांड म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड प्रसिध्द आहे , )अर्थात  हैदराबाद संस्थानातील  गोरटा  हत्याकांड मात्र  पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे,गोरटा हे गाव सध्या कर्नाटकातील बिदर जिल्हयात बस्वकल्याणपासून 14  कि .मी .अंतरावर आहे.या परिसरात रझाकारांचा प्रभाव फार मोठया  प्रमाणात होता ,निजामी राज्यात तिरंगा ध्वज फडकावण्यास बंदी होती, पण हाळगोरटा व होनाळी या दोन गावातील लोकांनी स्टेट कॉग्रेसच्या आदेशानुसार आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला होता .विशेषता होनाळीचे भाऊराव पाटील व हाळगोरटा येथील विठोबा इंद्राळे  यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज व आर्य समाजाचा ओमचा ध्वज  फडकाविला होता.१४ 
भाऊराव पाटील यांचा वाडा:  होनाळी 
          ते आर्य समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते होते.त्यांनी  परिसरातील हिंदू बांधवाना एकत्रित करून संघटन करण्याचा प्रयत्न चालविला होता , चौकशीला गेलेल्या दोन पोलीसांचा भाऊराव पाटील यांनी अपमान केला होता.ही बाब परिसरातील रझाकारांना  समजल्याशिवाय  राहिली  नाही, त्यात गोरटयाचा रझाकार प्रमुख  हिसामोद्दिन यास समजली ,तो संतप्त झाला, त्याच्या सोबत फतरू नावाचा एक अति क्रूर रझाकार होता, त्यांनी  पोलीस व रझाकारांच्या मदतीने होनाळीवर हल्ला केला, पण या वेळी भाऊराव पाटील व त्यांचे साथीदार गावावर नव्हते, रझाकारानी याचा पुरेपूर फायदा घेत पाटलांचा वाडा जाळून टाकला,गावातील अनेक स्त्रियांवर बलात्कार केला व गावची प्रचंड लुट केली, याची माहिती भाऊराव पाटलांना झाल्यावर त्यांनी हिसामोद्दिनचा कायमचा काटा काढायचा दृढनिश्चय केला, एके दिवशी बस्वकल्याणच्या रस्त्यावर भाऊराव पाटलाच्या गोळीने हिसामोद्दिनचा  वेध घेतला, क्रूरकर्मा हिसामोद्दिन व त्याचे दोन साथीदार मारले गेले .१५  
                  हिसामोदिनच्या वधामुळे परिसरातील रझाकार संतप्त झाले ,त्यांनी परिसरात भाऊराव पाटलांचा कसून शोध घेतला पण ते तर वागदरी कॅम्पला निघून गेले होते मग त्यांनी भाऊराव पाटलांना  ज्यांनी-ज्यांनी आपल्या घरी लपविले होते ,त्यांना ठार करून हिसामोदीनच्या हत्येचा बदला घेण्याचा निश्चय रझाकारांनी केला. सर्वप्रथम रझाकारांनी  आपला मोर्चा  मुचलंबच्या शरणाप्पा पाटील यांच्या टोलेजंग वाडयावर वळवला ,वेळ सकाळी आकराची होती, पाटील आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन जेवायला बसले होते, पाटलीन जेवण वाढत होत्या,अचानक झालेल्या रझाकारांच्या ह्ल्यामुळे पाटील काहीच हालचाल करू शकले नाहीत ,रझाकारांनी अगोदरच गावातील लोकांना पळवून लावले होते त्यामुळे कुठून मदत मिळेल ? वाडयाचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे रझाकारांना वाडयात प्रवेश करता येत नव्हता .रझाकारांनी वाडयाला आग लावली ,बघता बघता ज्वालांचे लोळ भडकू लागले . बाहेर पडून रझाकारांच्या हाताने मरण्यापेक्षा अग्नी देवतेच्या स्वाधीन होणेच  योग्य आहे असा पाटलानी विचार  केला असेल .पत्नी ,दोन मुले व नोकर अशा  सात जणांचा त्या दिवशी जणू अग्नीजोहरच झाला.१६  
                त्या दिवशी पाटलाचे भाऊ काशीनाथ पाटील व भावजय डॉक्टरला दाखवण्यासाठी परगावी गेले होते म्हणून वाचले ,पाटलांची पाच वर्षाची पुतणी मात्र आश्चर्यकारक रित्या वाचली,त्याचे झाले असे की नुकतच जेवण करून ती दारापुढे खेळत होती पण अचानक झालेल्या रझाकारांच्या हल्यामुळे घाबरून ती घरामागे पळाली आणि विलक्षण गोष्ट म्हणजे तेथील  एका मुस्लिम कुटुंबाने तिला आपल्या घरात लपविले व त्यांचे प्राण वाचविले ,अजूनही त्या जिवंत असून त्यांचे नाव गुणवंतम्मा असे आहे ,  मी गेलो तेव्हा पहिल्यांदा त्यांचे दर्शन घेतले ,त्यांनी कन्नड मधून मला माहिती दिली,असे हे मुचलंबचे हत्याकांड ,२८ एप्रिल १९४८ ला झाले. याचे कुठे ही स्मारक नाही पण पाटलांचा वाडा मात्र आहे. बाहेरचा भाग तसाच असून आतून मात्र डागडुजी केली आहे .१७      
             
          गोर्टा हत्याकांड: हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग
         मुचलंबच्या घटनेनंतर सरकार दरबारी कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे रझाकारांना अधिकच जोर चढला,हिसामोद्दिनच्या  वधात गोरटयातील लोकांचा सहभाग होता असा रझाकारांचा समज झाला होता . गोरटा हे गाव बिदर जिल्ह्यात बस्वकल्याण तालुक्यात आहे.निजाम राजवटीत हे गाव खुर्शीद जाही पायगाह( जागीर )चा भाग होते.दुबलगुंडी (घोडवाडी ) तहसीलमध्ये या गावचा समावेश होत असे.१९२८मध्ये या गावात मस्जिद बनवण्याच्या कारणावरून हिंदू व मुस्लीम यांच्यामध्ये दंगल झाली होती.यावेळी अनेक अन्याय ,अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या.यावेळी गावातील ४६ हिंदू तरुणांना अटक झाली होती.व एकतर्फी खटला चालवून त्यापैकी ३२ तरुणांना एक वर्ष तुरुंगवास व प्रत्येकी २५ रु.दंड अशी शिक्षा सुनावली होती.१८  गोरटा या २००० लोकवस्तीच्या गावात ४०० घरे होती , १० मे १९४८ ला सकाळीच हिसामोद्दिनच्या वधाच्या सूडबुद्धीने पेटलेल्या २५०० पेक्षा जास्त रझाकारांनी व पस्तकौमानी गोरटयावर आकस्मिक हल्ला केला ,यात घोरवाडी,भालकी, हुमनाबाद , बसवकल्याण, हुलसूर ,बेलूर ,मेहकर ,इ .गावचे रझाकार व पस्ताकौम होते. मोठया  संख्येने हत्यारबंद रझाकार अचानक गावात घुसले व त्यांनी  दिसेल त्यास मारण्यास सुरवात केली.हिंदू लोकांची आकस्मिक हल्यामुळे पाचावर धारण बसली ,ते गडबडले ,त्यांना काहीच सुचत नव्हते .जो तो आपल्या घरांनी दडून जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता , रझाकार लोकांना घराबाहेर ओढत आणि ठार गाव .नारायणराव मक्तेदार,रामराव पटवारी व बस्वप्पा मालीहोत्या पाटील  या सारख्या  व्यक्तींना देखील त्यांच्या वाडयातून बाहेर ओढत आणून  लक्ष्मीच्या देवळापुढे  मारले गेले.१९
           भीमराव पोलिस पाटील व त्यांच्या पत्नीने आपले मुले बसप्पा व आणेप्पा यांना वाचवण्यासाठी गोरट्यातील रझाकार सदर रसुलखा यास ४२ तोळे सोने दिले,रसूल हा भीमराव पाटलाजवळ बसलेला होता म्हणून त्यांनी विश्वास ठेवला  पण त्यांचे वा मुलाचे प्राण वाचू शकले नाहीत,रसूलने बाहेर जावून बेलूरच्या रझाकारांना पाठवून दिले ,रझाकार वाड्यात शिरताच भीमराव पाटील आपल्या मुलांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडू लागले तितक्यात एका  रझाकाराने बसप्पाला मारले, समोरचे दृश्य पाहून पाटलीन चक्कर येऊन कोसळल्या, तितक्यात  पाटलानाही ठार केले , दरम्यान  पाटलाचा भाऊ व आनेप्पा या दरम्यान बाहेर पळाले , त्यांना तत्काळ मारले गेले .20  
     गोरटयात महादप्पा डूमणे यांचा तीन मजली मजबूत व भव्य वाडा होता,जणू छोटा किल्लाच.त्यावेळी इतर कोणत्याही इमारतीपेक्षा वाडा उंच व विस्ताराने मोठा होता. गावातील लुटालूट, जाळपोळ , कापाकापी पाहून जवळपास ७०० ते ८०० लोकांनी या वाडयात आश्रय घेतला त्यात जांच्याकडे हत्यारे होती असे ह्त्यारधारी नागप्पा हलम्बरे ,काशाप्पा भालके , सिद्रामप्पा पटणे, मारुतीअण्णा कोणे ,चनाप्पा डूमने,दानू कोळी व विठोबा कोळी हे कुशल वीर होते. वाडयात जमलेल्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी या बहादूर तरुणांवर होती. माडीवर पत्रे लावून मोर्च्याच्या जागा केल्या गेल्या. मोर्चे धरले गेले, इकडे गावात घोंगावणारे रझाकाररूपी वादळ आता डूमणे सावकाराच्या वाडयाकडे वळले, 
        
     डूमणे सावकार हे परिसरातील प्रसिध्द आसामी होती. डूमणे हे जरी सावकार असले तरी  एक दानशूर  व मदतीला धावून जाणारे  म्हणून त्यांची ख्याती होती. डूमणे सावकाराचा वाडा लुटावा, जाळून टाकावा  या हेतूने रझाकार तिकडे वळले. पण तिथे वेगळेच घडले, रझाकाराना वाडयातून प्रतिकार होऊ लागला. वाडयातील तरुणांनी आता निर्वाणीचे युद्ध करायचे ठरविले होते, आतून फायरिग होऊ लागली. गोफण गुंडयाचा व दगड धोंडयाचा भयानक मारा सुरु झाला. वाडयातून होत असलेल्या आकस्मिक प्रतीकारामुळे अनेक रझाकार ठार झाले, कित्येक जखमी झाले. ते आता पुढे सरकू शकत नव्हते. त्यांनी माघार घेऊन दर्ग्याजवळील मोठमोठ्या  चिंचेच्या झाडावरून ते डूमणे  सावकारच्या वाडयावर मारा करू लागले, तर काही रझाकार आसपासच्या माडयावर चढले, विशेषता यमुनाबाई शंकरराव कुलकर्णी यांच्या माडीवरून गोळीबार करू लागले. दिवसभराच्या  लढाईत अनेक रझाकार मारले गेले, रझाकारांशी लढतांना मारुतीअण्णा कोणे व चनाप्पा बिरादार या दोघांना वीरमरण आले, दिवसभर हा मुकाबला चालला, सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला तशी रझाकारांनी फायरिंग बंद केली व ते गाव सोडून निघून गेले.२१   
     
देवीचे मंदिर :गोर्टा

  

           रझाकार जाताच वाडयातील ग्रामस्थांनी विचार केला की अपमानित झालेले रझाकार उद्या दुप्पट तयारीने येतील. या विचाराने रात्रीच्या सुमारास वाडयातील लोक बाहेर पडले व आपापल्या पाहुण्याच्या गावांनी रातोरात निघून गेले. इकडे रझाकारांनी दिवसभर गावातील जवळपास २०० लोकांची हत्या केली. दुसऱ्या दिवशी रझाकार परत जोमाने आले, आता गावात स्मशानशांतता पसरली होती. सगळीकडे मृतदेहांच्या जळण्याचा वास येत होता, बराच वेळ फायरिंग करूनही डूमणे सावकाराच्या वाडयातून कोणताच प्रतिकार होत नसल्याचे बघून आता हळूहळू रझाकार वाडयात घुसले, सर्व संपती लुटली व संपूर्ण वाडा कमरेइतका खोदून बघितला व शेवटी वाडयाला आग लावली गेली, हा वाडा कित्येक दिवस जळत होता.वाडयाचा वरचा भाग पूर्ण जळाला असून लोखंडी बीम मात्र शाबूत आहेत, आपल्यावरील जखमा दाखवत आजही तो उभा आहे.२२      
           गोर्टा  हत्याकांडाची बातमी सर्व हैदराबाद संस्थानात पसरली, स्थानिक वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर  हायकोर्टातील वकिलांची प्रोटेस्ट  कमिटी सरकारकडे पाठवून मागणी केली की आम्ही गोरटयात जाऊन नेमके काय घडले आहे हे पाहू इच्छितो. शेवटी सरकारला वकिलांची मागणी मान्य करावी लागली. वकिलांच्या  ‘प्रोटेस्ट कमिटीने’  होनाळी, गोरटा व परिसरातील गावांचा दौरा केला व तेथून निर्वासित झालेल्यांच्या मुलाखती घेतल्या तसेच त्यांनी गावातील हरिजन, मुसलमान व पस्ताकौम यांच्याही मुलाखती घेतल्या. कमिटीच्या मते गावात फक्त पस्ताकौम व मुसलमानांची घरे न जळता शिल्लक होती. कमिटीने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, या हल्यात २०० लोक मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झाले, आर्थिक नुकसान सुमारे ७० लाख रुपयांचे  झाल्याचे कमिटीने नमूद केले. कमिटी १७ मे १९४८ ला म्हणजे घटनेनंतर सात दिवसाने गोरटयात पोहोचल्यानंतर केवळ  कुत्र्यांच्या  भूंकण्याचा आवाज येत होता, कावळे, गिधाडे मृतदेहांना खात होते, अनेक ठिकाणी अर्धवट जळलेल्या  अवस्थेत   मृतदेह आढळून आले सर्व परिसरात  दुर्गधी पसरली होती. कडब्याच्या बनमीत अनेक मृतदेह आढळून आले. सात दिवसानंतरही एकही सरकारी अधिकारी पंचनाम्यासाठी आला नव्हता, या घटनेची नोंद भारत सरकारच्या श्वेत पत्रिकेतही  करण्यात आली आहे.२३ 






               हैदराबाद संस्थानातील भारत सरकारचे प्रतिनिधी के.एम.मुन्शी यांनी सुद्धा या परिसराचा दौरा केला व आपल्या ‘द एंड ऑफ अन इरा’या पुस्तकात या विषयी  सविस्तर माहिती दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील अनेक गावातील लोकांनी आपले घरदार सोडून भारतीय हदीत आश्रय  घेतला . आजपर्यत  येथे कुठलेही स्मारक उभारले नव्हते पण २०१५ पासून येथे भव्य स्मारक उभारले जात आहे. खूप उशिराने का होत नाही पण या दुर्लक्षित हुतात्म्यांचे स्मारक होत आहे ही समाधानाची बाब आहे. मुचलंब व गोरटा हत्याकांडातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रदधांजली....२४ 
   लेखकाने  सदर घटनेवर आधारित Documentary  तयार केली असून यू टयूबवर    https://youtu.be/vqAAAs-ViqA      या लिंकवर अभ्यासकांसाठी मोफत उपलब्ध आहे.

 भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे ,लातूर   मो. ७५८८८७५६९९       umatebhausaheb@gmail.com
Visit us at –    www.bhausahebumate.com
(लेखक हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक व वक्ते असून बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत.)

संदर्भ व टिपा
१ अनंत भालेराव,हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा,औरंगाबाद ,१९८७,०४
२ श्री.के.गोळेगावकर,तेच आव्हान –तीच माती ! नागपूर,१९७१,१९
३ ना.य.डोळे,हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम, ग्रंथाली ,१९९८,७
४ डॉमिनिक लॅपिए/ लॅरी कॉलिन्स,फ्रीडम अॅट मिडनाईट,मेहता,पुणे,१९७७,११३
५ प्रा.द.प.जोशी ,काळाच्या पडद्याआड,खंड १,मराठी साहित्य परिषद,हैदराबाद
टीप -श्री.लक्ष्मणराव फाटक हे हैदराबादला निजाम विजय हे साप्ताहिक चालवत.यातील निवडक भागाचे संकलन काळाच्या पडद्याआड,या नावाने मराठी साहित्य परिषद,हैदराबादने तीन खंडात केले आहे.
६ द.ग.देशपांडे,संस्थान हैदराबादचे स्वातंत्र्य आणि लोकस्थिती,१९९८,२४  
७ यशवंतराव सायगावकर,हैदराबाद मुक्ती आंदोलन के कुछ अध्याय,२००६,१४६
८ नरहर कुरुंदकर,हैदराबाद विमोचन आणि विसर्जन,हैदराबाद १९८५,१८१
९ नरेंद्र चपळगावकर,कर्मयोगी संन्यासी,मौज,मुंबई,१९९९,९५
१० अनंत भालेराव,हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा,औरंगाबाद ,१९८७,१४५ 
११ डॉ.भ.ग.कुंटे ,स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश,महाराष्ट्र शासन,मुंबई,१९७६,३५७
१२ पंडित नरेंद्र देव ,हैदराबाद के आर्यो की साधना और संघर्ष,दिल्ली,१९७३,९९
१३ अनंत भालेराव ,स्वामी रामानंद तीर्थ,नॅशनल बुक,दिल्ली १९८८, ३८       
१४ अर्जुन जाधव,मुक्तीची पहाट,बिदर,१९९४ ,५२
१५ यशवंतराव सायगावकर यांची मुलाखत ,दि.२१ऑगस्ट २०१६
१६ अर्जुन जाधव,मुक्तीची पहाट,बिदर,१९९४ ,५४
१७ गुणवंतम्मा काशिनाथराव पाटील यांची मुलाखत व प्रत्यक्ष भेट  दि.२३ ऑगस्ट २०१६ 
१८ खंडेराव कुलकर्णी, हैदराबाद का मुक्तीसंग्राम, बळवंत शंकर दाते.हैदराबाद १९७५,८८)
१९ मारुतीराव परिट यांची मुलाखत,दि.२४ ऑगस्ट २०१६
२० रुद्रमणी मठपती,गोरटा,बिदर ,२००१,७०
२१  K.M.Munshi,THE END OF AN ERA,Bombay,1957,131
२२ मारुतीराव परिट यांची मुलाखत,दि.२४ ऑगस्ट २०१६
२३ अनंत भालेराव,हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा,औरंगाबाद ,१९८७,२८९
२४ यशवंतराव सायगावकर , भाऊसाहेब उमाटे ,हैदराबाद मुक्तीसंग्राम : गोर्टा हत्याकांड,स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र, लातूर २०१९
२५ भाऊसाहेब उमाटे , शौर्यगाथा हैदराबाद मुक्तीसंग्रामाची , बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, लातूर, २०१८  
२६     हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बागवर  ‘डॉक्यूमेंटरी’  प्रदर्शित               
    २७  टिप-  महाराष्ट्र टाईम्स’मधील बातमी
             हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरटा व मुचलंब हत्याकांडावर आधारित ‘डॉक्यूमेंटरी’अर्थात माहितीपट यू – टयूब वर प्रदर्शित झाला  आहे.हैदराबाद मुक्तीसंग्रमावर तयार झालेला हा पहिलाच माहितीपट आहे.मुळचे देवणी तालुक्यातील अनंतवाडीचे रहिवासी व लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील इतिहास शिक्षक , हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अभ्यासक व प्रसिध्द वक्ते भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे यांनी ही  ‘डॉक्यूमेंटरी’ तयार केली आहे.या प्रकल्पासाठी त्यांचे वडील इतिहासाचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव शंकरराव उमाटे यांनी आपल्या निवृत्तीवेतनाची रक्कम देऊन आर्थिक भार उचलला आहे.
            भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या संस्थानांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला त्यात आपले हैदराबाद संस्थान होते.निजामाच्या आशीर्वादाने संस्थानात रझाकार संघटनेने धुमाकूळ घातला होता.संस्थांतील हिंदू व लोकशाहीवादी प्रजेवर अनन्वित अत्याचाराचे सत्र सुरु झाले होते. आर्य समाज ,हिंदू महासभा व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली  जनता लढा देत होती.अशातच गोरटा (जि.बिदर )येथे रझाकारांनी भीषण हत्याकांड घडवून आणले.या हत्याकांडात २०० लोक मारले गेले.या गावात डूमने सावकारांच्या वाडयावर  रझाकारांबरोबर  तुंबळ युद्ध झाले.केवळ १० तरुणांनी दिवसभर प्राणपणाने झुंज देऊन वाडयात आश्रय घेतलेल्या ८५० लोकांचे प्राण वाचवले.हा रोमहर्षक इतिहास प्रकाशात आणण्याचे कार्य भाऊसाहेब उमाटे यांनी केले आहे.
              वास्तविक पाहता गोरटा हत्याकांड हे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बागच आहे.कारण ज्याप्रमाणे ब्रिटीशांच्या कौर्याचे प्रतिक म्हणून जालियानवाला बाग हत्याकांड प्रसिद्ध आहे त्याच प्रकारचे हत्याकांड या ठिकाणी घडून सुद्धा त्याकडे इतिहासाने दुर्लक्ष केले आहे. हा रोमहर्षक दुर्लक्षित इतिहास सर्वांना मीहीत व्हावा या उद्देशाने त्यांनी ही ‘डॉक्यूमेंटरी’बनवली आहे.यामध्ये त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या मारुतीराव परीट ,यशवंतराव सायगावकर ,बाबुराव आकन्ना यांच्या मुलाखती आहेत व गोरटा,मुचलंब ,होनाळी या ठिकाणी घडलेल्या घटनास्थळांचे चित्रीकरण आहे. यासाठी जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव सायगावकर ,मारुतीराव परीट ,डॉ.प्रभा वाडकर, शिवाजीराव उमाटे यांचे मार्गदर्शन झाले. ‘डॉक्यूमेंटरी’साठी चित्रीकरण राजकुमार भोसले ,सिद्धेश्वर चापोलीकार ,प्रथमेश उमाटे यांनी केले असून एडिटिंग बालाजी गव्हाणे यांनी  तर तांत्रिक मदत वसीम खान व जुबेर शेख यांनी यांनी केली आहे ,संशोधन,लेखन ,दिग्दर्शन भाऊसाहेब उमाटे यांचे आहे.    
       ही ‘डॉक्यूमेंटरी’ यू – टयूब वर  https://youtu.be/vqAAAs-ViqA या लिंकवर विनामुल्य पाहता येईल. हैदराबाद मुक्तीसंग्रामातील जालियानवाला बाग ,गोरटा हत्याकांड किंवा भाऊसाहेब उमाटे या नावावर सर्च करून सुद्धा  ही  ‘डॉक्यूमेंटरी’ यू – टयूबवर विनामुल्य पाहता येईल.जास्तीत जास्त लोक ही ‘डॉक्यूमेंटरी’ पाहतील व उपेक्षित इतिहास समजून अशी अपेक्षा भाऊसाहेब उमाटे यांनी व्यक्त केली.


 
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक,लातूर
मो.७५८८८७५६९९
Website- www.bhausahebumate.com

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.