सामाजिक क्रांतीचे अग्रदूत : महात्मा बसवेश्वर




सामाजिक क्रांतीचे अग्रदूत : महात्मा बसवेश्वर

बाराव्या शतकात कर्नाटक राज्यातील कल्याण येथे महात्मा बसवेश्वरांनी समाज क्रांतीला जन्म दिला.जगात इंग्लंडच्याही अगोदर अनुभव मंटपच्या माध्यमातून लोकशाहीचा प्रयोग येथे झाला.वचन साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक समतेचा संदेश घरोघरी पोहचला होता.त्यास्तव सामाजिक क्रांतीचे तत्वज्ञान मांडणारे महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

जन्म व बालपण :

महात्मा बसवेश्वर हे क्रांतिकारी युगपुरुष होते.त्यांचा जन्म इस ११०५ मधील वैशाख शुद्ध तृतीया रोहिणी नक्षत्रावर अक्षय तृतीयेच्या दिवशी बागेवाडी (बसवन्ना बागेवाडी ) येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज आणि आईचे नाव मादलांबिका होते. बसवेश्वरांचे वडील हे बागेवाडी या अग्रहाराचे प्रमुख म्हणजे महाजन होते.( राजाने किंवा इतर सधन श्रेष्ठींनी ब्राम्हणांना दान दिलेल्या खेड्यांना अग्रहार असे म्हणत.या अग्रहारांच्या उत्पन्नावर ब्राम्हणांचे अध्ययन व अध्यापनाचे कार्य चालत असे.विद्येची केंद्रे म्हणून या अग्रहारांना प्रतिष्ठा होती.अग्रहारात विद्वानांना आश्रय असे.)ते पाचशे ब्राम्हणांचे प्रमुख होते.बसवेश्वरांच्या मोठया भावाचे नाव देवराज आणि बहिणीचे नाव नागम्मा होते.
महात्मा बसवेश्वर अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. उत्तम स्मरणशक्ती, निष्कलंक चारित्र्य, विनम्रता, प्रामाणिकपणा, निस्वार्थ:वृत्ती, निर्भयता अशा अनेक गुणांचा समावेश होता. बसवेश्वरांचे शिक्षण कुडलसंगम येथे जातवेद मुनींच्या मार्गदर्शनाखाली झाले. बस्वेश्वरांना अगदी लहानपणापासूनच ईश्वरभक्तीची विशेषतः शिवभक्तीची आवड होती. पण प्रत्येक घटनेकडे, प्राप्त होणाऱ्या ज्ञानाकडे चिकित्सक वृत्तीने पाहणे त्यांना आवडे. ब्राम्हणी अहंकाराचा त्यांना तिटकारा होता. आपल्या बुद्धीला जे पटत नाही ते त्यांना मान्य नव्हते. समाजातील लोकांच्या विशेषतः ब्राम्हणांच्या ढोंगी आणि दुटप्पी वर्तनाने त्यांना दु:ख होत असे. लोक जे ज्ञान सांगतात त्याप्रमाणे त्यांचे आचरण नाही हे पाहून त्यांच्या मनाला क्लेश होत असे.

महात्मा बस्वेश्वराचे पहिले बंड:

महात्मा बस्वेश्वराना वयाच्या आठव्या वर्षी आपल्या जीवनातील संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुंजेची तयारी सुरु केली पण बस्वेश्वरानी आपला या विधीवर विश्वास नसल्याचे सांगितले अर्थात जातीमुळे प्राप्त होणाऱ्या श्रेष्टत्वाला त्यांनी अगदी लहान वयातच विरोध दर्शविला. मुंज नाकारणे म्हणजे ब्राम्हण होण्यास नकार देणे, हे सोपे नव्हते. यावेळी वडिलांचाही आग्रह त्यांनी मान्य केला नाही. या प्रसंगावरून त्यांच्या व्यक्तिमत्वातील तत्त्वनिष्ठा आणि सच्चेपणा यांचे दर्शन घडते.

कुडलसंगमला आगमन :

महात्मा बसवेश्वर वयाच्या सोळाव्या वर्षी कुडलसंगमला आले असावेत. त्यांचे गुरु जातवेद यांनी त्यांचे प्रमाणे स्वागत केले. त्यांची मोठी बहिण नागम्मा ही त्यांच्यासोबत होती. या भगिनीने त्यांना आयुष्यभर साथ दिली. नागम्माचे पती शिवस्वामी हेही कुडलसंगमचेच होते. महात्मा  सामाजिक बंधने झुगारून देऊन ज्ञानाच्या लालसेने आणि प्रकाशाच्या शोधात कुडलसंगमला आले अर्थातच कुडलसंगम हे त्यांच्या ज्ञान साधनेसाठी एक आदर्श स्थान होते. येथे त्यांच्या भोवती अनुयायी सहजपणे जमत असत. मृदू वाणी, लोकांशी प्रेमाने  बोलणे यामुळे त्यांच्या भोवती अनुयायांची संख्या वाढू लागली. येथील वास्तव्यात त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन, चिंतन केले. समाजातील अज्ञान, पिळवणूक पाहून सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची अंतःप्रेरणा बनली.  महात्मा बसवेश्वर हे केवळ विचार करणारे तत्त्वज्ञ नव्हते तर कृतीशील विचारवंत आणि क्रांतिकारी समाजसुधारक होते. जगात सार्वभौम, सर्वश्रेष्ठ असा एकच ईश्वर आहे.तो सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वत्र आहे.तो कनवाळू असून आपल्या खऱ्या भक्तांवर त्याची कृपा असते, हा असा एकमेव सर्वश्रेष्ठ ईश्वर म्हणजे शिव होय या निष्कर्षाप्रत ते पोहचले होते.

मंगळवेढा  येथील वास्तव्य :

कल्याणला यावेळी चालुक्य घराण्यातील सोमेश्वर हा राजा राज्य करीत होता .सोमेश्वरानंतर जगदेमल्ल हा राज्यावर आला. या राजांच्या पदरी बिज्जल हा मंगळवेढा येथील जहागिरदार होता.हा एक समर्थ, शक्तिमान असा जहागिरदार होता पण  अत्यंत महत्त्वकांक्षी व धूर्त होता. (हा बिज्जल इस ११४० ला मंगळवेढयाचा जहागिरदार बनला. ) या काळातच महात्मा बसवेश्वरांचे मामा बलदेव यांच्या आग्रहामुळे बसवेश्वर मंगळवेढा येथे आले.त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्याची शाही खजिन्याचे गणक म्हणून नियुक्ती झाली.अलौकिक बुद्धिमत्ता, सचोटी,प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कार्यक्षमता या गुणामुळे सर्वजणच प्रभावित झाले.त्यांची कोषाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.


कर्मभूमी कल्याणमध्ये महात्मा बसवेश्वर :


बसवेश्वर मंगळवेढा या ठिकाणी असतानाच कल्याणचा राजा   चालुक्य जगदेकमल्ल वारला त्यानंतर तैलप तृतीय हा कल्याणचा सम्राट बनला.पण हा कमकुवत होता त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेण्यास अनेक जन उत्सुक होते. बिज्जल व तैलप  हे आत्येमामे भाऊच होते त्यामुळे अत्यंत चाणाक्षपणे बिज्जलने स्वतःला महामंडलेश्वर हा किताब धारण केला आणि इस ११६२ मध्ये बिज्जल सत्तारूढ झाला.त्याने  कल्याण हेच  आपल्या राजधानीचे ठिकाण केले. याच्या घराण्यास कलचुरीं असे म्हणतात.कल्याणवरइस ११६२ ते ११८२ अशी २१ वर्ष कलचुरीची सत्ता होती. सत्तेवर येताच बिज्जलाला बसवेश्वरांच्या मदतीची आवश्यकता होती.म्हणून त्यांना कल्याणला बोलविण्यात आले.त्यांना येथे पण कोषाचे प्रमुख म्हणजे कोषाध्यक्ष पदी नियुक्ती दिली.
कुडलसंगम असो मंगळवेढा असो की कल्याण  महात्मा बस्वेश्वरांची अध्यात्मसाधना सतत चालू होती. इष्टलिंगाला करस्थालावर विराजमान करून ते श्रद्धेने आणि एकनिष्ठतेने शिवाची आराधना करीत होते. या अध्यात्मसाधनेतून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आगळा वेगळा रंग प्राप्त झाला. अध्यात्मसाधनेतून अंतिम सत्य त्यांना गवसले. या सत्यात समानतेचे सौदर्य होते. मानवतेचा गंध होता लोकांच्या सुखदु:खाशी समरस होण्याचे अफाट सामर्थ्य त्यांच्याजवळ होते. शरणशक्ती म्हणजे सज्जनशक्ती त्यांच्याजवळ होते. शरणशक्ती म्हणजे सज्जनशक्ती कशी संघटित करावी आणि त्या शक्तीला आपल्या कार्यासाठी कसे जोडून घ्यावे यांचा मंत्रच जणू त्यांना गवसला होता.
कल्याणला आल्यानंतर बसवेश्वरांनी आपल्या मनातील नवसमाज निर्मितीच्या स्वप्नाला आकार देण्यास प्रारंभ केला.त्यास्तव अनेक अनुयायी गोळा केले. वीरशैव लिंगायत संप्रदायाची उभारणी केली त्यासाठी अनुभवमंटपची निर्मिती करून लोकशाही पद्धतीने धर्माची तत्त्वे निश्चित केली.महायोगी अल्लमप्रभू यांना अनुभव मंटपाचे अध्यक्ष केले.

समाजक्रांतीचे तत्वज्ञान :

महात्मा बस्वेश्वरांना आदर्श समाज व्यवस्था  निर्माण करावयाची होती. आदर्श समाजव्यवस्थेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मुल्ये अनुस्यूत असतात. सत्ताधीशांचा स्वार्थ आणि बहुसंख्य व्यक्तींची अंधश्रद्धा या आदर्श समाजव्यवस्थेच्या आड येतात.बसवेश्वरांनी स्वार्थाचा आणि अंधश्रध्देचा विचार केला आहे.
महात्मा बसवेश्वरांनी वर्णाश्रमविरोध, जात्यंताचा कार्यक्रम, जन्म आणि लिंग यावर आधारित असमानता दूर करण्याचा कार्यक्रम, पुरोहीतशाहीविरोध असे संघर्षाचे कार्यक्रम एकीकडे तर कायक, दासोह, जंगम कल्पनांनवर आधारित नवसमाजनिर्मितीचा रचनात्मक कार्यक्रम दुसरीकडे अशी दुहेरी समाजपरिवर्तनाची  नीती आखलेली दिसते. समाजजीवन हे दारिद्र्य, चंगळवाद, पुरोहीतशाही , अंधश्रद्धा यामुळे गदुळ झालेले आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यातून समाजाला सोडविण्यासाठी त्यांनी आध्यात्मिक मार्गाबरोबरच ऐहिक बाबतीतही मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कायक,दासोह या कल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण , आशयगर्भ असून अत्यंत आधुनिक विचारसरणीच्या जवळ जाणाऱ्या आहेत.जातीभेदाचे निर्मुलन करून व वर्ण –जातीपलीकडे गेलेल्या एका समाजाचे चित्र ते बघत होते.त्यांच्या पूर्वी व नंतरही इतके भव्यदिव्य स्वप्न बघून ते प्रत्यक्षात आणण्याकरिता प्रयत्न करणारा एवढा महान संत विश्वात झाला नाही.  
तत्कालीन समाजात जन्माधिष्टीत असमानता, कर्मकांड व रूढीप्रियत, अंधश्रद्धा यामुळे  सामान्य माणूस पुरोहीतशाहीला कंटाळला होता.  जात्यंत हा विषय महात्मा बस्वेश्वरानी प्रथमच अजेंड्यावर आणला.बसवेश्वरांचे मोठेपण यात आहे की ज्या काळात जात्यान्ताची कल्पना करणेही शक्य नव्हते त्या काळात महात्मा बसवेश्वर फक्त विचार मांडून थांबले नाहीत तर ते विचार व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला.

वर्णाश्रमास विरोध:

वर्णाश्रम धर्माचे समर्थन कर्मसिद्धांताद्वारे केले जाते.बसवेश्वरांनी हा सिद्धांतच अमान्य केला.त्यामुळे त्यांनी वर्णाश्रमधर्माचे  समर्थनही लटके ठरवले आणि पुनर्जन्म, स्वर्ग,नरक, इत्यादी कल्पनांना भ्रांत ठरवले व त्या मानण्यास नकार दिला.
वर्णाश्रम धर्माबरोबरच त्यांनी स्त्रियांना समाजात आपले स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पुरुषप्रधान संस्कृतीत नेहमीच स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला गेला.त्यामुळे अर्धी मानवजात ही असमानतेच्या वागणुकीमुळे माणुसकीच्या व्यवहारापासून, न्याय हक्कापासून वंचित होती. या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वरांनी स्त्री मुक्ती करिता उठवलेला आवाज महत्वाचा ठरतो.त्यांनी स्त्रियांना समान दर्जा दिला त्यामुळे शरण चळवळीत स्त्रियांचे योगदान लक्षणीय आहे.शरण आंदोलनात सत्तरच्या वर स्त्रिया सहभागी झाल्याचे दिसते.अनुभव मंटपात त्यांना समानतेची बागणूक मिळत होती आणि अक्क महादेवीसारख्या अनेकाबद्द्ल अनेक शरणांनी आपल्या वाचनात आदर व्यक्त केला आहे.अक्क महादेवीबरोबरच सत्यक्का, आयदिक्का, लक्कमा, गुड्व्वा इत्यादी स्त्रियांची नावे आदराने घेतली जातात.

समानतेचे तत्त्व :

 महात्मा बसवेश्वर यांचा तीव्र विरोध ब्राम्हणशाही , पुरोहीतशाही व वर्णाश्रम धर्म यातील असमानतेला होता.समानता हे त्यांचे मार्गदर्शक तत्त्व होते.त्यामुळे जन्माने किंवा व्यवसायाने येणारी श्रेष्ठता – कनिष्ठता त्यांना मान्य नव्हती. स्वतः ब्राम्हण असूनही त्यांनी आपल्या आंदोलनात सर्व जाती वर्णाच्या लोकांना सामील करून घेतले होते.अनुभव मंटपात  येणारा प्रत्येक शरण हा समानतेची वागणूक देणारा होता म्हणून ही एक अध्यात्मिक संसद मानली जाते.जात, व्यवसाय या कशाचाही विचार ना करता शरण आपले विचार मांडू शकत होते व त्याची योग्य ती दखल घेऊन सर्वानुमते निर्णय घेतले जात होते.

कायक :

मध्ययुगीन काळात श्रमाला प्रतिष्ठा नव्हती. या काळात  युद्धकलेत प्रविण असलेले शूर योद्धे आणि आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेले धर्मगुरू असे समाज व्यवस्थेत दोन हिरो होते. मात्र आपल्या श्रमाने, आपल्या कौशल्याने उत्पादन करणाऱ्या कारागीराला काही स्थान नव्हते. वरील दोन वर्गातील लोकांचा उत्पादकतेशी काही संबंध नव्हता.एकूणच भारतीय समाजव्यवस्थेत शारीरिक श्रम, कष्टाची कामे करणाऱ्या उत्पादक लोकांकडे तुच्छतेच्या भावनेने पाहण्याची, त्यांना  हिणवण्याची परंपरा रूढ होती वास्तविक शारीरिक श्रमातूनच विविध वस्तूंची निर्मिती होते आणि या श्रमाच्या अभावी समाजाची धारणाही होऊ शकणार नाही.
महात्मा बसवेश्वरांनी मात्र अतिशय न्यायाची आणि मानवी मुल्यांची प्रतिष्ठा राखणारी ‘कायक’ ही संकल्पना मंडळी. कन्नडमध्ये ‘कायकवे कैलास’ असे एक वचन आहे. मराठीत कायक हाच कैलास असा त्याचा अर्थ होतो.श्रम हे पवित्र आहेत कोणताही व्यवसाय करणाऱ्या माणसाचे वरवर हलके वाटणारे श्रम हे मुळी हलके नसतेच तर सर्व कामे समान प्रतिष्ठेचे असतात.आपण कोणत्याही प्रकारची श्रेष्ठ – कनिष्ठता मानता कामा नये असे त्यांनी सांगितले. भारतीय समाजाला श्रमाकडे पाहण्याचा एक निर्मळ आणि निकोप दृष्टीकोन देण्याचे काम कायकाच्या संकल्पनेतून झाले आहे. महात्मा बस्वेश्वरांची ही केवळ भारतीयांच नव्हे तर अखिल मानवजातीला दिलेली महान देणगी आहे.

दासोह :

महात्मा बसवेश्वरांनी मांडलेली एक महत्वाची संकल्प म्हणजे दासोह. आपल्यापाशी जे काही आपल्या गरजेपेक्षा  अधिक आहे ते समाजाला देणे याचाच अर्थ दासोह. आपल्या गरजेपेक्षा अधिक आपल्याजवळ असतील तर ते समाजाकरिता उपयोगात आणणे आवश्यक आहे. कायक करून आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळत असेल तर ते समाजाला परत दिले पाहिजे ते अतिरिक्त मिळालेले धन  आपल्या मालकीचे नाही ते समाजाचे असल्याने समाजाला परत जाणे आवश्यक आहे अशी  महात्मा बस्वेश्वरांची विचारधारा होती.खरतर आजच्या  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आर्थिक विषमतेच्या काळात दासोह ही कल्पना महत्वाची वाटते.

आंतरजातीय विवाह :

जातीप्रथा आणि जातीव्यवस्था नष्ट करावयाची असेल तर  आंतरजातीय विवाहाचा अवलंब करावा लागेल असा क्रांतिकारी विचार महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात मांडला. कल्याणमध्ये  हरळय्या हे जातीने चांभार होते तर मधुवरस हे जातीने ब्राम्हण होते. या दोघांनीही लिंगायत धर्म स्वीकारला होता.ते अनुभव मंटपाचे सदस्य होते. बसवेश्वरांचे ते अनुयायी होते मधुवरसने आपली कन्या कलावती हिचे लग्न हरळय्याचा मुलगा शीलवंत याच्याशी करावयाचे ठरविले यासंबंधी अनुभव मंटप मध्ये या विषयावर चर्चा पण झाली होती.हा विवाह झाला आणि या विवाहाची हकीकत कल्याण शहरात वाऱ्यासारखी पसरली.काहींनी या विवाहाचे समर्थन केले पण बहुसंख्य लोकांनी या विवाहास विरोध केला.विरोधक लोक रस्त्यावर उतरले, गोंधळ मजला, जाळपोळीला प्रारंभ झाला.शरणाची घरे जाळली जाऊ लागली.
अशा अवस्थेत महात्मा बसवेश्वरांनी कल्याण सोडले ते कुडलसंगमला गेले येथेच त्यांनी इस११६८  साली कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावर समाधी घेतली.त्यांची जीवनज्योत विश्वज्योतीत विलीन झाली.

विरशैवांचा  संघर्ष :

 कल्याणमधील परिस्थिती फार गंभीर बनली होती या प्रसंगी शिव शरण हे शांत बसू शकत नव्हते.आता त्यांनी कल्याणमध्ये राजाच्या सैन्याच्या विरोधात तलवारी हाती घेतल्या.जरी राजाच्या सैन्यासमोर त्यांचे सामर्थ्य कमी असले तरी ते प्राणपणाने लढत राहिले.वीरशैवाची घरे जाळले जाऊ लागले लुटालूट सुरु झाली.अनेक शरण मारले गेले.या काळात अनुभव मंटपचे अध्यक्ष श्री अल्लमप्रभु  यांनाही कल्याण सोडावे लागले ते श्री शैल्यमला गेले. अक्क महादेवी पण तिकडेच निधून गेल्या. आता अनुभव मंटपची जवाबदारी चन्न बसवेश्वरांवर आली त्यांनी वाचन साहित्य वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.त्यांनी पश्चिम घाटातील उळवी हे गाव गाठले.अशा पद्धतीने संत शरणांच्या  त्यागातून व बलिदानातून वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना झाली असल्यामुळे त्यांना ‘वीरशैव’ असे म्हणतात.मराठवाड्याचा भाग कल्याणला लागुनच असल्यामुळे या भागातही लिंगायत धर्माचा प्रसार झाला. प्रसिद्ध विचारवंत आ.ह. साळुंखे महात्मा बसवेश्वर यांचा संपलेल्या सहस्त्रकातील पहिले क्रांतीकारक म्हणून उल्लेख करतात.
अस्तित्वाची उत्कट संवेदनशीलता, माणसामाणसातील समतेविषयी अविचल अथांग निष्ठा आणि अशी समता प्रस्थापित करण्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची असाधारण समर्पणशीलता या महात्मा बसवेश्वर यांच्या गुणांमुळे आपले मन कृतज्ञतेने त्यांच्यासमोर नतमस्तक होते.म्हणूनच म्हंटले जाते, “बसवनं बस्वन्ना,  दिन दुबळ्यांचे नव्हे सर्व मानवजातीचे कल्याणबंधू ! बसवेश्वर तुमचे, आमचे हृद्येश्वर !!

संदर्भ सूची  –

१.              चिदानंद मूर्ती – श्री बसवेश्वर , नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली, आवृत्ती चौथी २०१२
२.              डॉ. सुधाकर देशमुख - वीरशैव  तत्त्वज्ञान, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद,२०१६
३.              सुभाष देशपांडे – महात्मा बसवेश्वर कार्य आणि कर्तृत्व, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद ,२०१५
४.              प्रा.नागोराव कुंभार (संपादक )  – विचारशलाका  महात्मा बसवेश्वर विचारविश्व विशेषांक
५.               डॉ. सुधाकर देशमुख –अश्मक, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद,२०१६
६.              तिप्परुद्रस्वामी एच., महात्मा बसवेश्वर – साहित्य अकादमी, दिल्ली, २००८desai
७.               प्रा.डॉ. प्रभा वाडकर – वचनप्रभा, माता नागाई सार्वजनिक ग्रंथालय प्रकाशन, लातूर २०१९ 
८.              Desai P. B.,Basaveshvara and His Times , Basava samiti , Bangalore, 2006  
९.              डॉ. बस्वराज मलशेट्टी, ( मुख्य संपादक ), शरण आंदोलन : बसवन्ना  आणि नवनिर्माण धोरण , बसव परिषद, हिरेमठ संस्थान , भालकी , जिल्हा बिदर , कर्नाटक
१०.         तिवारी भगवानदास , विश्वमानव बसवेश्वर , बसव शांती मिशन प्रकाशन, धारवाड,२००१     




 भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे

                                             सहशिक्षक , ज्ञानेश्वर  विद्यालय, शाहू चौक,लातूर  
                                    (सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,)

इतर लेखांसाठी अवश्य भेट दया  -


  www.bhausahebumate.com



No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.