सातवे निजाम मीर उस्मान अली खान भाग ५

 

 हैदराबाद मुक्तीसंग्राम

 भाग ५

सातवे निजाम मीर उस्मान अली खान

भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे,

लातूर मो.न.७५८८८७५६९९

 

              हैदराबाद संस्थानाचा  लढा इतर संस्थानांच्या तुलनेत कठीण होता. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न  भारताला  स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरही दीर्घ काळ रेंगाळला त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे येथील संस्थानिक सातवे निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादूर. उस्मान अली यांना मिळालेले राजपद मात्र फारच अनपेक्षित होते.  इ.स.१९११ साली  निजाम मीर  मेहबूब अली खान यांच्या निधनानंतर   अनपेक्षित रित्या उस्मान अली  यांना राजपमिळाले होते.

                   सहावे निजाम मेहबूबअली यांचे २९ ऑगस्ट १९११  रोजी निधन झाले. ते वारले त्यावेळी त्यांचा एकच औरस  मुलगा हयात होता, त्याचे नाव सलाबतजाह, त्यावेळी त्याचे वय फक्त बारा वर्षाचे होते. खरे पाहता त्यालाच गादीवर  बसवले जायचे   अज्ञा मुलाला गादीवर बसवल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असते  ब्रिटिशांना राज्यकारभारात हस्तक्षेपाची संधी मिळाली असती. त्यामुळे संस्थानातील कारभारी मंडळींनी एक नवीन शक्कल लढवली. महबूबअलीच्या जनानखान्यात लग्नाविना दाखल झालेल्या अमतुज जोहरा बेगम नावाच्या शिया असलेल्या स्त्रीचा उस्मान ली हा मुलगा. मेहबूब अली व जोहराचा निकाह झालेला नव्हता. मुस्लिम कायद्यानुसार अनौरस मुलाला वारसा  हक्क मिळत नाही पण राजाला सगळेच क्षम्य. ६ एप्रिल १८८६ मध्ये जन्मलेला उस्मानअली हा सलाबतजहा   पेक्षा तेरा वर्षांनी मोठा  होता. इ.स.१९०२ मध्ये लॉर्ड कर्झन  हैदराबादमध्ये आले, त्यावेळी सोळा वर्षाच्या उस्मानला गादीचा वारस म्हणून मान्यता देण्यात आली. त्यावेळी  कायदेशीर वारस सलाबतजहा हा  केवळ तीन वर्षाचा होता. उस्मानअलीला  राज्याचा वारस करण्याची शक्कल त्यावेळेचे दिवाण महाराजा किशनप्रसाद, पोलीस खात्याचे मंत्री नबाब  शहाबजंग आणि कोतवाल सुलतान यावरजंग या तिघांची  होती.

                   महबूब अलीचा मृत्यू होताच शहाबजंगाने घोडयावर शहरात फिरून उस्मानअली  राजा झाल्याचे जाहीर केले व लोकांना महबूबअलींच्या निधनाची  वार्ता कळाली. एक सप्टेंबर १९११ रोजी रेसिडेंट सर अलेक्झांडर पिन्हे याने औपचारिकरित्या उस्मानअलीला गादीवर बसवून मान्यता दिली. सप्टेंबर १९११ रोजी खिलवतमहल या राजप्रासादात मसनदशीनीचा म्हणजे  सिंहासनारूढ होण्याचा समारंभ पार पडला. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी, शेरवानीवरती तिरप्या पटयावर झळकणारी राजचिन्हे आणि हिरेमाणके अशा वेशात मिरवणुकीने येऊन उस्मानअली गादीवर बसला, तेव्हा आनंदाप्रीत्यर्थ १८ कैद्यांना सोडण्यात आले. १८ मोहरा, ५२५ चांदीचे रुपये व दहा बकरे यांचा दानधर्म करण्यात आला. त्याच्या  राजवटीला दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्यावर एक कोंबडे उतरून टाकण्यात आले. परंतु विधिलिखित काही टळलं नाही. उस्मानअलीच्याच  काळात आसफजाही राजवट संपुष्टात आली. 


                इ.स.१९११ ते १९४८ असा दीर्घ कालावधी त्यांना लाभला. उस्मान अलीला दोन गोष्टीचे जबरदस्त आकर्षण होते, एक सत्ता  आणि दुसरे संपत्ती. ते अत्यंत महत्त्वकांक्षी, जिद्दी, कमालीचे हट्टी होते, कुशाग्र बुद्धिमत्ता, हुशार, चतुर, मुत्सदी असे बहुढंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना पैशाचा मोह अनावर असला तरी मीर उस्मान अली खान इतर संस्थानिकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळे होते. अत्यंत साधे राहणीमान, निर्व्यसनी, विलास आणि बडेजाव यापासून दूर राहणारे अशीच त्यांची ओळख आहे. एक अफू सोडली तर त्यांना कोणतेच व्यसन नव्हते. खानपान, कपडेलत्ते साधे असत. मात्र ते कमालीचे धार्मिक  होते. पाच वेळा नियमितपणे नमाज पढणारे व सतत कुराणाचे वाचन करणारे, शेकडो नोकरचाकर असताना नमाजाच्या वेळी स्वतः चटई अंथरणारे उस्मान अली  स्वतःला रुस्तुम-ई दौरान, अरस्तू- ए - जमाल, वलमा मलिक, असिफजहा अशा अनेक पदव्या लावत. हे  इतर निजामाच्या तुलनेत काही बाबतीत वेगळे  होते. इतर निजाम हे अन्य संस्थानिकाप्रमाणे ‘हिज हायनेस’ होते पण उस्मानअली एकटेच ‘हिज एक्झालटेड  हायनेस’ होते. उस्मान अली  ब्रिटीशांचे  ‘फेथफुल अलाय’ होते  कारण पहिले महायुद्ध चालू असताना यांनी  ब्रिटीशांना  पन्नास कोटी रुपये अर्थसहाय्य केले होते. ते महत्वकांक्षी, हुशार तर होतेच शिवाय राजकीय डावपेच करण्यात व कटकारस्थाने रचण्यात पुरेसे  चतुर होते.  आपण अगोदर बोलल्याप्रमाणे मीर उस्मान अली खान हे योगायोगानेच गादीवर आले होते.  महबूब अलींना ही तो गादीवर यावा असे वाटत नव्हते पण त्यांचा नाईलाज झाला. त्यामुळे एवढया मोठया बादशाही परिवारात ते आणि त्यांची आई असे दोघेच परस्परांना जीव लावणारे होते. त्यामुळे ते एकाकी , इतरांपासून सतत सावध असणारे व जिद्दी बनले.

निजाम मीर उस्मान अली खान हे आपल्या संपत्ती साठीही ओळखले जातात. अमेरिकेच्या फोर्डनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून ते  ओळखले जात. त्यांच्याकडे सुमारे एक हजार कोटीची मालमत्ता होती. ‘सर्फ-ए- खास’ मधून त्यांना वार्षिक एक  कोटी उत्पन्न मिळे, उत्पन्नाचे एक साधन म्हणून नजराणा पद्धतीचा कल्पक वापर करून घेतला.सरकारी खाती व जिल्हा – तालुक्यांचे अधिकारी यांना नजराण्याचे इष्टांक ठरवून देण्यात आले. १८७ कॅरेटचा ‘जेकब’ नावाचा जगप्रसिद्ध हिरा ते  पेपरवेट म्हणून वापरीत.  हिरे, माणिके, जडजवाहीर, मोती यांनी किंग कोठीच्या अनेक इमारती खच्चून भरलेल्या होत्या, असे असूनही ते आपला खर्च वरचेवर येणाऱ्या पैशातून भागवत असत. विशेष म्हणजे ते  स्वतःवर आठवडयाला फक्त वीस रुपये खर्च करीत असत. एक साधी शेरवानी, एक पायजामा, विटकी झालेली रुमी टोपी असा त्यांचा नेहमीचा वेश असे, निजामास  पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी पाहुणे कसे चकित होत याचे एक उदाहरण सांगण्यास काही हरकत नाही.   मिर्झा इस्माईल एकदा आगा जमालुद्दीन काझरोनी या इराणच्या पाहुण्याला निजामाच्या भेटीस घेऊन गेले, एका छोटयाशा खोलीत बसलेल्या निजामाकडे निर्देश करून मिर्झासाहेब म्हणाले, “ये शाहे दकन अस्त.” (हे दक्षिणेचे राजे आहेत.) आश्चर्यचकित झालेले पाहुणे उदगारले, “पनाह बा खुदा.” (परमेश्वर आपले रक्षण करो.)   

डी.एफ.कारका यांनी  ‘फॅब्युलस निजाम’ या चरित्रग्रंथात   दिलेल्या माहितीनुसार निजाम मीर उस्मान अली खान यांच्या इस्लामी धर्माज्ञेप्रमाणे कायदेशीर चार बेगमा होत्या.अजिमुन्निसा बेगम ऊर्फ दुल्हन पाशा या पहिल्या पत्नीपासून हिमायत अली ऊर्फ आजमजाह व शुजावतअली ऊर्फ मोअज्जमजाह ही मुले आणि शहजादीपाशा नावाची मुलगी अशी अपत्ये होती.यापैकी आजमजाह यास ‘प्रिन्स ऑफ बेरार’म्हणून ओळखले गेले. याशिवाय  उस्मानअलीच्या जनानखान्यात ४२ बेगमा होत्या. ५० मुले, ४६ नातवंडे, १६ सुना  आणि ४४ खानाजाद  (दासीपुत्र) आणि एक हजार नोकर होते.

           उस्मान अली  गादीवर आल्यापासून हैदराबादला स्वतंत्र देश बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होते . त्यांनी  आपल्या  महत्वकांक्षेच्या पूर्ततेसाठी मुस्लिम धर्माचा व मुस्लिम जातीयतेचा आधार घेतला.  १९२१ मध्ये एक आदेश काढून संस्थानात  सभा संमेलने, बैठकी- प्रवचने, मिरवणुका यावर सक्त बंधने लादली. व्यायाम शाळा, आखाडे, खाजगी शाळा, ग्रंथालये परवानगी वाचून काढू नयेत अशी सक्ती करण्यात आली. गश्ती निशाण ५२ आणि ५३ या नावाने हे दोन आदेश हैदराबाद संस्थानात ओळखले जात होते.

(लेखक हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक असून बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत्त.मो.न.७५८८८ ७५६९९)

 

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.