ओळख हैदराबाद संस्थानाची भाग ४


                                                  हैदराबाद मुक्तीसंग्राम

 भाग ४

ओळख हैदराबाद संस्थानाची

भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे,

लातूर मो.न.७५८८८७५६९९

              भारतात  हैदराबाद, काश्मीर, म्हैसूर  या सारखी पश्चिम युरोपीय देशांच्या तोडीची काही बलाढय  संस्थाने होती तर  याउलट काठेवाडच्या संस्थानातील राजे छोटयाशा घरात राहत. गुजरातमधील दारोड, विजानोन, अकाडीया, आलमपूर, काटोडिया ही  संस्थाने  फक्त एक ते दोन  चौ.कि.मी क्षेत्रफळाची    होती. चारशेहून अधिक संस्थानांचे क्षेत्रफळ वीस चौरस मैलाहून कमी होते.

            भारतात असलेल्या इतर संस्थानाच्या तुलनेत हैदराबाद हे संस्थान अनेक बाबतीत वेगळे होते. हैदराबाद  क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि  लोकसंख्येच्या व उत्पन्नाच्या  दृष्टीने प्रथम क्रमांकाचे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या १ कोटी ६३  लाख ३८ हजार ५३४ होती, तर क्षेत्रफ़ळ ८२,३१३  चौ. मैल इतके होते. या संस्थानाचा विस्तार १६ जिल्हयात पसरला होता. यापैकी आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वरंगल, नालगोंडा, महबूबनगर, मेदक, हैदराबाद शहर व शहराच्या आसपासचा प्रदेश असलेला अतराफबल्दा हे आठ  जिल्हे तेलगू भाषिक, बिदर, रायचूर, गुलबर्गा हे तीन जिल्हे कन्नड भाषिक तर औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद हे  पाच जिल्हे मराठी भाषिक म्हणजे आपल्या मराठवाडयातील होते. (सध्या आठ जिल्हे) संस्थानाचे वार्षिक उत्पन्न २६ कोटी रुपयाचे होते. संस्थानात तेलगू, मराठी, कन्नड, हिंदी  व उर्दू या प्रमुख भाषा होत्या. मात्र १८८४ पासून उर्दूला राज्य भाषेचा दर्जा होता.

संस्थानात  कमालीचे दारिद्रय होते, शिक्षणाचा प्रसार नव्हता, समाजात मोठया प्रमाणात अंधश्रध्दा होत्या.चांदीचा हाली सिक्का (रुपया) हे चलन होते. भाकरीचे चित्र असलेला पिवळा ध्वज हा आसफजाही निजामशाहीचा राष्ट्रध्वज होता. चौथी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत व पुढील शिक्षण उर्दू भाषेत दिले जाई. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी काही हायस्कूल व माध्यमिक शाळा (फोकानिया) होत्या. वरंगल, औरंगाबाद, गुलबर्गा येथे इंटर मिडीएट पर्यंत शिक्षण व हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठ होते. आरोग्य, रस्ते, उद्योगधंदे, दळणवळण व सार्वजनिक सुविधांचा अभाव होता.  

           संस्थानात शेती हाच  मुख्य व्यवसाय होता. हिंदू प्रजेला शेतीशिवाय अन्य पर्याय पण फारसे उपलब्ध नव्हते. तेलंगनामध्ये शेतीची रचना जमीनदारी पद्धतीची होती. मुठभर जमीनदाराच्या मालकीची हजारो एकर जमीन असे.उदा. सुर्यपेठ तालुक्यातील जनारेडडी प्रतापरेडडी यांना  दीड लाख एकर तर खमम येथील  कलरू देशमुख यांना  एक लाख एकर जमीन होती. हैदराबाद संस्थानात ५५० जमीनदार असे होते ज्यांना  ५०० एकरपेक्षा जास्त जमीन होती.या सर्व जमीनदारांचे वार्षिक उत्पन्न १० कोटीचे होते. मराठवाडयात व कर्नाटकच्या तीन जिल्ह्यात रयतवारी पद्धत होती. हैदराबाद  संस्थानातील एकूण क्षेत्रफळाच्या ४२ % भाग निरनिराळ्या जहागीरीने व्यापला होता. संस्थानातील लहान-मोठया जहागीरदाराची संख्या ११६७ होती.त्यात एक लाखाहून अधिक उत्पन्न असलेले १९ जहागीरदार होते.अत्यंत बुरसटलेली,कमालीच्या शोषणावर आधारलेली आणि पराकोटीच्या अन्यायांनी पुरेपूर भरलेली जमीनदारी व जहागिरदारी होती. 

 संस्थानातील आर्थिक विषमता पराकोटीला पोहचली होती.१९४१ मध्ये हैदराबाद संस्थानातील ८५% प्रजा हिंदू, तर १२.८ % मुस्लिम होते. असे असले तरी सरकारी नौकरीमध्ये  मात्र मुस्लिमांचे प्रमाण ७५ % हिंदूचे २० % असे होते. सरकारी नोकऱ्यांत  १ लाख १२ हजार ७३७ मुस्लिम तर हिंदू केवळ २३,३६८ होते. त्यातही सचिव, विभागप्रमुख, सुभेदार, न्यायाधीश, पोलीस अधिकारी यातील बहुतांश जागांवर मुस्लिमच असत.   संस्थानातील १६ पैकी १४ कलेक्टर मुस्लिम होते. सरकारी कार्यालये व न्यायालये यात उर्दुचाच वापर होई. तेलगू, मराठी व कानडी या भाषांना राज्यकारभारात अजिबात स्थान नव्हते.

आरोग्य, रस्ते, उद्योगधंदे, दळणवळण सार्वजनिक सुविधांचा अभाव होता. औद्यौगिकदृष्टया हैदराबाद संस्थान मागासलेलेच होते. कोळशाच्या काही खाणी, निजाम शुगर फॅक्टरी व अन्य एक साखर कारखाना, दोन कापड गिरण्या, ‘डेक्कन एअरवेज’ ही छोटीशी विमान कंपनी, वजीर सुलतान टोबॅको कंपनीचा चारमिनार सिगारेट बनवण्याचा कारखाना, ‘फारुखी दंतमंजन’ आणि  हर दर्द की दवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्याजिंदा तिलस्मात’(जिंदा तेल) याशिवाय उल्लेख करावा असा उद्योग हैदराबादमध्ये अस्तित्वातच नव्हता. आजही प्रसिद्ध असलेली संस्थानातील बिदर येथील बिद्री कला तसेच औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद जवळ कागजीपुरा येथे हस्तव्यवसाय म्हणून कागद तयार होई. निजामाची सर्व फर्माने आणि राजपत्र या कागदावरच छापले जात. हिमरू शाली आणि चादर, बीडला गुप्ती तयार केली जात असे. नाही म्हणायला इ.स.१८७४ मध्ये वाडी – हैदराबाद हा  ११० मैल लांबीचा रेल्वे मार्ग कार्यन्वित झाला होता.    

            हैदराबाद संस्थानातील प्रजेला दुहेरी पारतंत्र्यात राहावे लागत होते. राजकीय पारतंत्र्य तर होतेच पण त्या बरोबर जनतेच्या शिरावर सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते. ब्रिटीशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती. खऱ्या अर्थाने  हैदराबाद मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची प्रतिकृतीच होय. भारतीय स्वातंत्र्यलढयात जी आंदोलने झाली ती अल्प स्वरुपात का होईना येथे झाली. हिंदू महासभा, आर्य समाज, हैदराबाद स्टेट कॉंग्रेस यांच्या वतीने निशस्त्र प्रतिकाराचे सत्याग्रह झाले. विद्यार्थांनी ‘वंदेमातरम्’ आंदोलन केले. स्वामीजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक सत्याग्रह केले. ग्रामीण भागात व सरहद्दीवर अनेक सशस्त्र दले स्थापन झाली. १९४२ च्या चले जाव चळवळीचे पडसाद हैदराबाद संस्थानातही  उमटले. अनेक ठिकाणी साराबंदीचे आंदोलन, तर काही ठिकाणी शिंदीची झाडे तोडण्याचा जंगल सत्याग्रह झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी सत्याग्रह झाले. सातारा जिल्हयातील प्रतिसरकारप्रमाणे ‘गोवर्धन सारोळा’ व ‘मुक्तापूर’सह  इतर अनेक गावात निजामाची सत्ता धुडकावून लावली गेली व जनतेने स्वतःचे शासन निर्माण केले. निजामाच्या गाडीवर  बॉम्ब  टाकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न नारायणराव  पवार व त्यांच्या क्रांतीकारक  साथीदारांनी केला. क्रांती कार्यासाठी निधी जमवण्याच्या प्रयत्नातून उमरी बँक लुटली गेली,

            हैदराबादचा स्वातंत्र्यलढा हा खऱ्या अर्थाने लोकलढा होता. सशस्त्र आंदोलनात ध्येयधुंद, प्राणार्पणाची तयारी ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला. १९३८ ते १९४८ या दहा वर्षात सुमारे पन्नास हजार लोकांचा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग होता.१९४७-४८ या वर्षात वीस हजार कार्यकर्ते  निजाम सरकारच्या तुरुंगात होते तर तीस हजार कार्यकर्ते भूमिगत कार्य करीत होते. या लढयाची तुलना आपण गांधीजींच्या  आंदोलनातील जनतेच्या सहभागाशी केली तर चित्र अधिक स्पष्ट होईल. त्या काळी भारताची लोकसंख्या चाळीस कोटी होती आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली आंदोलनात दीड लाख कार्यकर्त्यांनी भाग घेतला आणि तुरुंगवास सहन केला. हैदराबाद संस्थानाची लोकसंख्या त्यावेळी एक कोटी ६३ लाख होती. म्हणजे फक्त सहा हजार सत्याग्रही तुरुंगात गेले असते तरी प्रमाण बरोबरीचे ठरले असते. त्याऐवजी वीस हजार कार्यकर्त्यांनी तुरुंगवास सहन केला. म्हणजे हे प्रमाण भारतीय जनसहभागाच्या तिपटीपेक्षा जास्त ठरते.भूमिगत कार्यकर्त्यांची संख्या यात मिळवली तर प्रमाण दहापट होते.

वास्तविक पाहता हैदराबादचा स्वातंत्र्यलढा भारतीय स्वातंत्र्याची परिपूर्ती करणारा लढा होता,  असे असतानाही हैदराबादच्या मुक्तीलढयास संस्थानाचा लढा म्हणून दुर्लक्षित केले जाते, खरेतर ही खेदाची बाब आहे, आपला इतिहास गौरवशाली आहे. हा  इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

(लेखक हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक असून बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत्त.

मो.न.७५८८८ ७५६९९)

-------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.