निजाम राजवटीची स्थापना

 

                                हैदराबाद मुक्तीसंग्राम

                                        (भाग ३)

                        निजाम राजवटीची स्थापना

भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे,

लातूर मो.न.७५८८८७५६९९

हैदराबाद हे लोकसंख्येच्या दृष्टीने  भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबादचे मूळ नाव भागानगर. हैदराबाद शहराचे वेगळेपण हे काही एका रात्रीतून तयार झालेले नाही. अनेक दशकांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरील बहूप्रवाही कल्लोळाचा  तो एकत्रित परिणाम आहे. कुतुबशाहीचा संस्थापक महम्मकुलीच्या विशाल, उदारमतवादी दृष्टिकोनावर हैदराबादचा पाया घातलेला आहे.

 इ.स.१५९१ मुसी नदीच्या काठावर  भागामतीवरील  आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून त्यानं सगळ्या जगात एकमेवद्वितीय ठरेल अशा  भागानगर (हैदराबाद) या नगराची स्थापना केली. चारमिनार सारखी भव्य वास्तूही महम्मद कुली कुतुबशाहच्या काळा तयार झाली. ते शहर स्थापन करताना महम्मकुलीने अल्लाहकडे एक दुवा मागितली होती. तो म्हणतो,  मेरा शहर लोगा सूं मामू कर, रखमां जूं  तूं दर्या मे मीन ! म्हणजे  हे अल्ला नदीतील माशाप्रमाणे माझे  शहरही असंख्य प्रकारच्या माणसांनी ओसंडून जाऊदे आणि खरोखरच पुढील काळात हैदराबाद हे शहर अठरापगड जाती-धर्माच्या लोकांनी गजबजून गेले. हैदराबादच्या  या वैविध्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरूंनी हैदराबादचंछोटा भारत असं  वर्णन केलं होतं. येथे आपणास सर्व जाती-धर्माचे लोक पहावयास मिळतील. आपली  मराठी मंडळीही शहा लीबंडा, ब्राह्मणवाडी या भागांमध्ये मोठया प्रमाणा स्थिरावली आहेत.

 कुतुबशाही (१५९१ ते १६८७)  मोगल (१६८७ते १७२४ )आणि असफजाही (१७२४ ते १९४८) अशा तीन भिन्न इस्लामी राजवटीचा अंमल या शहरावर राहिला.हैदराबादमधील असफजाही राजवटीचा संस्थापक म्हणजे औरंगजेबाचा उमराव गाजीउद्दिन फिरोजजंग याचा मुलगा मीर कमरुद्दीन ऊर्फ निजाम उल्मुल्क हा होता. हे घराणे शहाजहान 

बादशाहच्या काळात अफगाणिस्तान येथील समरकंद – बुखारा येथून आलेले होते. इ.स.१७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्युनंतर दिल्लीत सत्तेची भांडणे वाढत गेली, या संधीचा  फायदा घेऊन मोगल साम्राज्याचा दक्षिणेतील सुभेदार मीर कमरुद्दीन ऊर्फ निजाम उल्मुल्क याने  घेतला. इ.स.१७२४ मध्ये निजामाने मुबरेजखानाचा  साखरखेडयाच्या  लढाईत पराभव केला आणि दक्षिणेत आपल्या घराण्याची  सत्ता घोषित केली. निजामुल्क हा यांना मिळालेला किताब. निजाम या अरबी शब्दाचा अर्थ  प्रदेशाची व्यवस्था पाहणारा असा होतो. स्वतंत्र  राज्य घोषित करूनही असफजाही राजवटीतील सर्व राज्यकर्ते ‘निजाम’ या नावानेच ओळखले जात. पहिल्या असफजाहच्या बाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते. मीर कमरुद्दीन याने  वऱ्हाडात एलीचपूर  येथे  एका फकिराला आपल्या जवळ पिवळ्या फडक्यात बांधून आणलेल्या रोटया अर्पण केल्या. फकिराने मोजून पाहिलं तर सात रोटया होत्या. फकीर प्रसन्न झाला आणि त्याने आशीर्वाद दिला की, “तुझ्या सात पिढया राज्य करतील.” रोटया बांधलेला तोच  पिवळा रंग  ध्वजासाठी स्विकारण्यात आला. योगायोग असा की सातव्या निजामाच्याच काळात आसफिया राजवट लयाला गेली. आसफिया घराण्यात  पुढीलप्रमाणे सात राजे होऊन गेले. पहिला निजामुल्मुक मीर कमरुद्दीन असिफजाह (इ.स.१७२४ -१७४८ ) दुसरा मीर निजामअली(इ.स.१७६२ ते १८०३) तिसरा निजाम सिकंदरजहा (इ.स.१८०३ ते १८२९) चौथा निजाम नासिरूदौला (इ.स.१८२९ ते १८५७) पाचवा निजाम अफजलुदौला (इ.स.१८५७ ते १८६९) सहावा निजाम मीर महबूबअली(इ.स.१८६९ ते १९११) सातवा निजाम मीर उस्मानअली  (इ.स.१९११ ते १९४८).

इ.स.१७४८ ला पहिला निजामुल्मुक असिफजाह यांच्या मृत्युनंतर इ.स.१७६२ पर्यंत त्याच्या चार मुलांत गादीसाठी भांडणे होत राहिली शेवटी इ.स.१७६२ ला निजाम अली गादीवर आला व आपणच पहिला निजामुल्मुक असिफजाह यांच्यानंतरचे दुसरे निजाम असल्याचे जाहीर केले.त्यामुळे या काळातील निजामाची गणना केली जात नाही. निजामाच्या ताब्यातील या दक्षिणी सुभ्याचा कारभार १७६१ पर्यंत औरंगाबाद येथूनच चालत असे.१७६२ ला निजामअली  गादीवर आल्यानंतर मात्र हैदराबाद हीच असफजाही राज्याची राजधानी झाली. हैदराबाद संस्थानात आपल्या मराठवाडयातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड व उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होता. (आता मराठवाडयातील जिल्ह्यांची संख्या आठ झाली आहे.)

कोणत्याच निजामाने फारशा लढाया केल्या नाहीत.त्यातील बहुतेक लढाया मराठयांच्या विरोधात होत्या.पुण्याची लढाई वगळता बहुतेक सर्वच लढायात निजामाचा पराभवच झाला. १७२७ ला  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरनजीक झालेली पहिली लढाई पालखेडची लढाई म्हणून ओळखली जाते. त्यानंतर   भोपाळ (१७३७), भालकी(१७५२),  सिंदखेड (१७५८),  उदगीर (१७६०), राक्षसभुवन (१७६३) आणि  खर्डा (१७९५) अशा अनेक लढाया झाल्या. यातील प्रत्येक लढाईमध्ये निजामाचा पराभव झाला पण मराठयांनी विजय मिळूनही फक्त  चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे  हक्क मिळवण्यातच  धन्यता मानली. यातील  आपल्या भागात झालेली उदगीरची लढाई ही ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्वाची होती. पेशव्यांचा उत्तरेकडे हल्ला करण्याचा विचार पक्का झाला होता.  त्यापूर्वी दक्षिणेकडील आपले राज्य पक्के करावे म्हणून पेशव्यांनी आपली नजर निजामाकडे वळवली. कारण पेशव्यांचा पहिला शत्रू निजामच होता. निजामाच्या दरबारात बुसी या फ्रेंच सेनापतीवरून दोन तट पडले होते. थोडयाच दिवसात बुसीला फ्रेंच गव्हर्नरने परत बोलवले.

मराठयांचे सैन्य सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली बिदरकडे जाण्यास निघाले. यात राघोबादादा, सदाशिवरावभाऊ  व विश्वासराव हे तिघे युद्धाच्या आघाडीवर होते. नानासाहेब अहमदनगरच्या किल्ल्यात बसून योजना आखत होते. सदाशिवरावभाऊ परतूर, बीड मार्गे परळीला आले. रघुनाथराव जानेवारी १७६०  च्या सुमारास उदगीरजवळ पोहचले होते. पेशव्यांकडे विश्वासराव मेहेंदळे, इब्राहीम खान गारदी ही मंडळी होती. १९ व २० जानेवारी रोजी राघोबाच्या सैन्याने आणि इब्राहिम खान गारदीच्या सैन्याने सलाबतजंगावर हल्ला चढवला. यात निजामी सैन्याचे नुकसान झाले. एव्हाना  निजामही आपल्या भावाच्या मदतीला आला. त्यांनी औरंगाबादहून आपली फौज धारूरला बोलवली होती. आपण धारूरला जावे व तिथे मराठयांच्या सैन्याशी लढा द्यावा या हेतूने त्यांनी आखणी केली होती. पण  निजामाची ही चाल पेशव्यांच्या  लक्षात आल्यानंतर रघुनाथरावांनी सलाबातजंगला महिना- दीड महिना उदगीरजवळ लहानसहान चकमकीत अडकून ठेवून त्यांचा  वेळ वाया घातला. इकडे सदाशिवरावभाऊंनी धारूरच्या मार्गावरील तांदुळजा हे गाव लढण्याकरिता निवडले. हे गाव तेव्हा  बावणे नाईक  या सरदारांच्या ताब्यात होते. इ.स. १७४३ साली शाहू महाराजांनी तांदुळजा आणि गिरवली ही दोन गावे सरदार जानोजीराव नाईक बावणे यांना इनाम म्हणून  दिली होती. त्यामुळेच  पेशव्यांनी या  गावची  निवड केली  असावी. येथील मातीची गढी   जानोजीराव बावणे यांच्याकडेच होती. तांदुळजा या गावाजवळ  निजामअली आणि सलाबतजंग यांच्या संयुक्त सैन्याची गाठ पडली. एका बाजूने सदाशिवराव भाऊचे सैन्य आणि डाव्या बाजूने राघोबाच्या सैन्यांनी हल्ला करून निजामाच्या सैन्याला नामोहरम केले. या तुंबळ युद्धात अनेक सैनिक कामाला आले. ज्या भागात हजारो सैनिक धारातीर्थी पडले, तो भाग आजही ‘शिरखंडी’ म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या दिवशी निजाम शरण आला. येथील बावणे नाईकांच्या गढीतच तहाची बोलणी झाली.(आजही या गढीत बावणे नाईकांचे वंशज वास्तव्यास आहेत.)  मराठयांच्या मागण्या मान्य करत निजामाने ६० लाखाचा मुलुख देऊन तह स्विकारला.

                 या सर्व लढायांचा निजामाने इतका धसका घेतला की त्यांनी आपले स्वातंत्र्य गमावून इंग्रजांच्या आधिपत्याखाली मांडलिकत्व पत्करले. इ.स.१८०० मध्ये निजामाने इंग्रजांशी एक करार केला आणि हैदराबादचे रुपांतर नेहमीसाठीच संरक्षित राज्यामध्ये झाले. पुढील भागात आपण हैदराबाद संस्थानाची ओळख करून घेऊ यात.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

(लेखक हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक असून बालभारतीच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत्त.

मो.न.७५८८८ ७५६९९)

 

 

 

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.