वाचनमार्गावरील वारकरी

वाचनमार्गावरील वारकरी      
विद्यार्थी मित्रांनो, वाचन हा ज्ञान मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासात   वाचन खूप   महत्वाची भूमिका बजावते. वाचनामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय लागते.आपण अनुभवसमृद्ध होतो. चर्चा असेल अथवा वादविवाद आपली मते सप्रमाण मांडू शकतो. वाचनामुळे एकाग्रता वाढून   तणावावर मात करता येते. पुस्तके तुम्हाला कधीच एकटे असल्याची जाणीव होऊ देत नाहीत. ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. मात्र  सध्याच्या  स्पर्धेच्या युगात वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे का ? अशी शंका येते. सोशल मिडीयाच्या  वाढत्या प्रभावामुळे गंभीर वाचनाची सवय कमी होत आहे. विद्यार्थी दशेपासूनच वाचनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक व शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची आहे.
              चांगले पुस्तक कोणते ?

 जे पुस्तक वाचून आपले मन आनंदित होईल, नवीन ज्ञान मिळवल्याचे समाधान देईल ते. पुस्तकांची आवड निवड ही फार वैयक्तिक बाब आहे. त्यात वयोमान, मनःस्थितीनुसार बदल होऊ शकतो. मला आवडणार एखादं पुस्तक कदाचित तुम्हाला आवडणार ही नाही पण त्यात काही चुकीचे नाही. वाचनामुळे जाणीवेच्या कक्षा रुंदावतात, प्रगल्भता वृद्धिंगत होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना परत वाचनाकडे घेऊन जाणे महत्वाचे आहे.  घरात वा शाळेत  पुस्तके सहज उपलब्ध झाल्यास मुले ती वाचतात व आपोआपच वाचनाची आवड निर्माण होते असे माझे निरीक्षण आहे. माझ्या बाबतीत तर असेच झाले.
               पहिला मार्गदर्शक    
     
     माझे अण्णा (वडील )  शिक्षक होते आणि त्यांना वाचनाची फार आवड. त्यामुळे चारशे लोकवस्तीच्या (अनंतवाडी ता.देवणी) गावात बालपण जाऊनही मला लहानपणीच खूप दर्जेदार पुस्तके वाचता आली. आमच्या घरी नेहमीच पुस्तकांची रेलचेल  असायची.  माझी वाचनाची आवड अण्णामुळे वाढत गेली. सानेगुरुजी यांचे ‘श्यामची आई’, व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘माणदेशी माणसं’‘बनगरवाडी’ किरण बेदी यांचे  आय डेअर,  श्री.ना.पेंडसे यांचे हदद्पार, प्र.के.अत्रे यांचे कऱ्हेचे पाणी ,मॅक्झिम गॉर्की यांचे ‘आई’ वि.स.खांडेकर यांचे ‘ययाती’ अॅन  फ्रन्कचे ‘द डायरी ऑफ अन फ्रंक’ प्र.ई.सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’, शांताबाई कांबळे यांचे ‘माझ्या जन्माची चित्तरकथा’,लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’, पु.भा.भावे यांचे ‘प्रथमपुरुषी एकवचनी’, साधना आमटे याचं ‘समिधा’,स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप’  ही पुस्तके मला  शालेय जीवनातच वाचता आली. उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतात चिंचेच्या झाडाखाली बसून पुस्तके वाचणे हा माझा आवडता छंद बनला. त्यात  सुट्ट्या कधी संपून जात कळत पण नसे.
माझ्यावर  आनंद यादव यांचे ‘झोंबी’या काळातच वाचल्याचे आठवतंय. शिक्षणासाठी किती पराकोटीचा संघर्ष करावा लागतो याचे दर्शन झाले. यामुळेच  अभ्यासाकडे गांभीर्याने पाहण्याची सवय लागली. सर्व आवडीनिवडी जोपासायच्या पण अगोदर अभ्यास महत्वाचा आहे हा  संस्कार वाचनातूनच झाला. वाचनानेच मला जगण्याचे भान दिले.
वाटचालीत वाचनाचा सहभाग

बी. ए. ला असताना उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात  खऱ्या अर्थाने ग्रंथाच्या विशाल विश्वाचे दर्शन झाले.  माझे वाचन पाहून तेथील माशाळकर सर व खुब्बा मॅडमनी थेट ग्रंथालयात जाऊन पुस्तके निवडण्याची मुभा दिली. येथील तीन वर्षाच्या काळात झपाटल्यासारखा वाचत सुटलो.  व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, द.मा.मिरासदार,  पु.ल.देशपांडे, वि.स.खांडेकर , रा.र.बोराडे, व.पु.काळे, जयवंत दळवी, भाऊ पाध्ये. अरुण साधू , रविंद्र पिंगे,रत्नाकर मतकरी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, अनिल अवचट  अशा अनेक दिग्गज लेखकांच्या साहित्याचे वाचन झाले. भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’उदयगीरीतच वाचनात आली. आपणच ‘पांडुरंग सांगवीकर’ आहोत असे पुढे बरेच दिवस वाटत राहिले. महाश्वेतादेवी यांचे ‘हजार चुराशिर माँ’, विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’, राजन गवस यांची  ‘तणकट’ व ‘आपण माणसात जमा नाही’, सदानंद देशमुख याचं ‘बारोमास’, श्याम मनोहर  अशी आवडती नावे तरी किती घेणार ? याच काळात कधीतरी तस्लिमा नसरीनची  ‘लज्जा’ही कादंबरी एका रात्रीत वाचल्याचे आठवतंय.
माझा दुसरा मार्गदर्शक

माझ्या वाचनाला शिस्त लावण्याचे काम  डॉ.सुधाकर देशमुख यांनी केले. ते सर्जन होते पण प्रचंड वाचन व लेखन करत. एका अर्थाने ते माझे गुरु. आपल्याकडील महत्वाचे ग्रंथ ते मला वाचण्यास देत. राष्ट्र आणि राष्ट्रवाद : संकल्पना आणि विकास, अश्मक, प्रतिभा आणि सर्जनशीलता ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. नरहर कुरुंदकर, इरावती कर्वे, आचार्य जावडेकर,  रा.चिं. ढेरे, कॉ.शरद पाटील, दुर्गा भागवत यांच्या  साहित्याचा परिचय सरांमुळेच झाला.
           आणि इतिहास विषयाची निवड झाली

 एम.ए.ला असताना  जयकर ग्रंथालयात  इतिहास आणि राज्यशास्त्राचे  अनेक संदर्भ ग्रंथ अभ्यासता आले. इ.एच.कार यांच्या ‘इतिहास म्हणजे काय ?’ या ग्रंथाची पहिली भेट येथेच झाली. धनंजय कीर यांनी लिहिलेली   महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रे अभ्यासता आली. डॉमिनिक लॅपिए  व लॅरी कॉलिन्स यांचे ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ सदानंद मोरे यांचे ‘लोकमान्य ते महात्मा’, रामचंद्र गुहा यांचे ‘गांधीनंतरचा भारत’या ग्रंथांनी  इतिहास लेखनाची  दृष्टी  विकसित केली.  
            वाचनातून लेखनाची आवड

  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी   कृ.अ.केळूसकर, सेतू माधवराव पगडी, रियासतकार गो.स.सरदेसाई, सर जदुनाथ सरदार,अ.रा.कुलकर्णी  यांचे ग्रंथ वाचू लागलो. पुढे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास समजून घेण्यासाठी पं. नरेंद्रजी, स्वामी रामानंद तीर्थ,  अनंत भालेराव, नरेंद्र चपळगावकर, यशवंतराव सायगावकर यांचे पुस्तके वाचली. आता या एकाच विषयावरील पंचाहत्तर पुस्तके माझ्याकडे आहेत. वाचनामुळेच मला इतिहास लेखनाची आवड निर्माण झाली.  ‘शौर्यगाथा हैदराबाद मुक्तीसंग्रामाची’, ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम : गोर्टा हत्याकांड’ यासह  माझी पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  मराठवाडयाच्या इतिहासाचे  संदर्भ उपलब्ध व्हावेत याकरिता ग्रंथांच्या सुचीसह संकेतस्थळ सुरु केले आहे. जिज्ञासूंनी हे संकेतस्थळ अभ्यासावे.
         शिक्षक आणि पालकांचे आदर्श

  शिक्षक आणि पालक यांचे वाचन मला फार महत्वाचे वाटते. बालशिक्षणाच्या दृष्टीने तेत्सुको कुरोयानागी यांचे ‘तोत्तोचान’, सिल्विया अॅश्टन-वाँर्नर यांचे  ‘टीचर’, ज्युलिया वेबर गॉर्डन यांचे ‘माय कंट्री स्कूल डायरी’, गिजुभाई बधेका यांचे ‘दिवास्वप्न’, अनुताई वाघ यांचे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ प्रा.रमेश पानसे यांचे ‘शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ’, ‘रचनावादी शिक्षण’ अदिती नातू यांचे ‘मेंदू संशोधन व बालशिक्षण’, डॉ अभय बंग यांचे ‘शिक्षणाचे जादुई बेट’ याशिवाय डॉ.विजया वाड, डॉ.संदीप केळकर,  शोभा भागवत, अच्युत गोडबोले, डॉ.आनंद जोशी, डॉ.श्रुती पानसे  यांची पुस्तके  वाचली पाहिजेत.
        पहिले पुस्तक वाचन केव्हा करावी    
    
वाचनाची सुरुवात प्राथमिक इयत्तांमधूनच होणे आवश्यक आहे. आवड निर्माण होण्यासाठी  बोधकथा, इसापनीती, पंचतंत्र,बालकविता व  इतर बालसाहित्याचा समावेश करता येईल. प्राण्यांची, पक्षांची, जंगलातल्या गोष्टींच्या  पुस्तकांमुळे पर्यावरणाविषयीचे कुतूहल निर्माण होण्यास मदत होते. अरविंद गुप्ता, बाळ फोंडके, निरंजन घाटे  यांची विज्ञानविषयक पुस्तके जीवनाला दिशा देऊ शकतात. नॅशनल बुक ट्रस्ट,बालभारती व  महाराष्ट्र शासनाची प्रकाशने  माफक दरात उपलब्ध आहेत. आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांनी  डॉ.जयंत नारळीकर (आकाशाशी जडले नाते) डॉ. अच्युत गोडबोले (किमयागार) मोहन आपटे (शतक शोधांचे व चंद्रलोक) असा घडला भारत’   अशी काही पुस्तके वेळ काढून वाचावीत. प्रत्येक शाळेत किशोर, शिक्षणसंक्रमण, जीवनशिक्षण, साधना, लोकराज्य  ही नियतकालिके आली पाहिजेत. पालकांनी मुलांना ग्रंथालयात, ग्रंथ प्रदर्शनास घेऊन जावे. शाळेत ही दिवसातील एखादा तास वाचनासाठी असावा. त्या तासाला मुलांना   ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.आमच्या  शाळेत ग्रंथालयातून आठवड्याला एक पुस्तक विद्यार्थ्यांना घरी दिले  जाते. अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. ग्रंथाच्या सानिध्यामुळे जीवन आनंददायी होते.  स्पर्धा परीक्षा असो वा कोणत्याही व्यावसायिक संधी, तुम्ही वाचनामुळेच इतरांच्या तुलनेत सरस ठरता.त्यामुळे वाचायला सुरुवात करा. सध्या लॉकडाऊनमुळे तुम्हाला ग्रंथालयातून पुस्तके आणता येणार नाहीत पण अनेक पुस्तके पीडीएफ स्वरुपात ही इंटरनेटवर   विनामूल्य उपलब्ध आहेत. त्यांचे वाचन करण्याची सवय करा..
          वाचनाची सुरुवात कोणत्या पुस्तकापासून करावी असे जेव्हा विद्यार्थी विचारतात त्यावेळी मी त्यांना सानेगुरुजी यांचे ‘श्यामची आई’,महात्मा गांधी यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’,उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’,डॉ.नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’,वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’,डॉ.प्रकाश आमटे यांचे ‘प्रकाशवाटा’  सुधा मूर्ती यांचे ‘वाइज अंड अदरवाइज’  अशा काही पुस्तकांची उदाहरणादाखल  नावे सांगतो. तुम्ही मराठी, इंग्रजी वा इतर भाषेतील अनुवादित पुस्तके पण वाचली पाहिजेत. वाचन हे सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे, त्यात खंड पडता कामा नये हे मात्र खरे ..... यासोबत आता तुम्हाला शालेय अभ्यासपण सुरु करावा लागणार आहे. स्वयंअध्ययन हाच या काळातील सर्वात महत्वाचा मंत्र आहे या सोबत ऑनलाईन पद्धतीचा वापर  करणे आवश्यक आहे.यासाठी शासनाने  दीक्षा अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ..... 

                                                             भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                              लातूर
                                                                               www.bhausahebumate.com

                                                                                      मो.७५८८८७५६९९
नोट – हा लेख लोकसत्ता च्या यशस्वी भव या सदरात दि.१६ जून २०२० रोजी  प्रकाशित झाला आहे.मूळ लेख पाहण्यासाठी त्या तारखेचा लोकसत्ता पाहावा . सौजन्य – संपादक , लोकसत्ता   समन्वयक – सी.डी.वडके. विद्याप्रबोधिनी, दादर  

विद्यार्थी मित्रांनो , www.bhausahebumate.com  संकेतस्थळावर इतिहास विषयक अनेक लेख आहेत. तुम्ही LABLES अंतर्गत आवडता विषय निवडून लेख वाचा अथवा HOME वर क्लिक करून  MENU निवडा व लेख वाचा . 

लेख वाचण्यासाठी खालील लिंकला click करा.

http://www.bhausahebumate.com/2020/05/blog-post.html    

Documentary पाहण्यासाठी खालील लिंकला click करा

 https://youtu.be/vqAAAs-ViqA·        Like, share and subscribe our YouTube Channel –Bhausaheb Umate

·         Our Official website - www.bhausahebumate.com

·         Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.