हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ: राष्ट्रीय शाळा हिप्परगे

 


भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे

                                                                                                                   लातूर

                                                                                       इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती

व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,

                                                                                         बालभारती, पुणे४११००४

                                                                                                        www.bhausahebumate.com

                                              Youtube channel -   Total History By Umate sir             

 

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शाळा हिप्परगेचे हे  शताब्दी वर्ष आहे.हैदराबाद संस्थानात ज्यावेळी विविध बंधने लादून नागरी स्वातंत्र्याची गळचेपी केली जात होती.अशा काळात संस्थानातील स्वातंत्र्यप्रेमी मंडळीला एकत्र करून संस्थानात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अभिनव प्रयोग या छोट्याशा गावात केला गेला.

 १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य  मिळाले.पण आपल्या हैदराबाद संस्थानातील जनतेला  स्वातंत्र्य मिळाले नव्हते.कारण  आपण ब्रिटीश भारतामध्ये नव्हतो तर हैदराबाद संस्थानाचे रहिवासी होतो.  आपल्यावर अर्थात मराठवाड्यावर  आसफिया घराण्याची सत्ता होती. निजामाच्या या एकतंत्री राजवटीला आव्हान ज्या राष्ट्रीय शाळेने दिले  त्या राष्ट्रीय शाळा हिप्परगे विषयी आपण जाणून घेणार आहोत. या संस्थानाचा विस्तार १६ जिल्हयात पसरला होता. यापैकी 5 जिल्हे मराठी भाषिक म्हणजे आपल्या मराठवाड्यातील यात औरंगाबाद,बीड,परभणी, नांदेड व उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश होता तर बिदर,गुलबर्गा व रायचूर ही तीन  जिल्हे कन्नड भाषिक आणि  ८ जिल्हे तेलगु भाषिक होते. संस्थानात तेलगू,मराठी,कन्नड व उर्दू या प्रमुख भाषा होत्या मात्र १८८४ पासून उर्दूला राज्य भाषेचा दर्जा होता. हैदराबाद संस्थानाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४२ % भाग विविध जहागीरीने व्यापला होता.अशा सर्व अंधकारमय काळात संस्थानात मातृभाषेत शिक्षण देणे ही बाब शक्य नव्हती.अशा काळात आपल्या भागातील हिप्परगा (ता.लोहारा जि.उस्मानाबाद) येथे  झालेल्या  शैक्षणिक प्रयोगाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाला केवळ उर्जाच दिली नाही तर  खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची फळी पुरवली. 

हैदराबाद संस्थानाच्या इतिहासात या संस्थेला अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे.  हैदराबादच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे  नेते,सरसेनानी आणि जनतेचे  मुक्तिदाते स्वामी रामानंद तीर्थ   या छोट्याशा परंतु जाज्वल्य संस्थेमुळे हैदराबादच्या जनतेला मिळाले. भावी नेतृत्व इथेच, याच संस्थेत उदयाला आले आणि येथे  एका छोटया  निवासी शाळेत स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटले, त्यानेच पुढे विक्राळ स्वरूप धारण केले. हैदराबाद संस्थानातील शाळा-कॉलेजातील मुलांना निजामी सत्ता परमेश्वराच्या  नावावर एक  प्रार्थना म्हणावयास लावीत असे. त्या प्रार्थनेत निजामाला, त्याच्या सिंहासनाला,  त्याच्या आसफिया घराण्याला व त्या घराण्याच्या पिवळ्या झेंड्याला इस्लामी पुराणकथातील  चिरंजीव हजरत खिजर प्रमाणे उदंड आयुष्य दररोज मागितले जात असे. पुढे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले हैदराबादने स्वतंत्र भारतात विलीन होण्याचे नाकारले तेव्हा इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेचा नेता कासिम रझवी  यांने अशी दर्पोक्ती केली होती की,आमचा आसफिया ध्वज आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवू आणि  हिंदी महासागराच्या व बंगालच्या उपसागराच्या लाटा निजामाचे चरण धुण्यास दौडत येतील.उन्मत सत्ता आणि तिचे मगरूर उपासक  यांची ही घमेंड  एका संन्याशाच्या रूपाने अवतीर्ण झालेल्या जननेतृत्वाने जिरवली. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला आणि केवळ  बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरच नव्हे तर  अरबी समुद्रही भारतीय स्वातंत्र्याच्या गगनभेदी उर्मीना  आपल्या लाटांच्या तांडवानी साथ देत गेला. काळाच्या प्रवाहात कुचकामी ठरलेल्या अनेक सत्ता या सागरतळी बुडाल्या पुढे त्यांचे  नाव निशाणही उरले नाही. एवढी बलवत्तर  ऐतिहासिक घटना हिप्परग्याच्या  या माळरानावर अंकुरली.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना मांडण्यात आली.त्यानंतर देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षणाचे प्रयोग झाले.निजामी राजवटीत तर दुहेरी पारतंत्र्य होते.मातृभाषेत शिक्षण घेण्याच्या सुविधा तर नव्हत्याच पण परवानगी पण दिली जात नसे.अशा काळात हिप्परगा या गावात राष्ट्रीय शिक्षणाचा एक प्रयोग झाला. व्यंकटराव माधवराव देशमुख व अनंतराव गोविंदराव कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्हयातील हिप्परगा (ता.लोहारा तत्कालीन ता.तुळजापूर) येथे १९२१ ला राष्ट्रीय शाळा स्थापन केली. (व्यंकटराव व अनंतराव हे दोघे सख्खे भाऊ होते.पण पुढे अनंतराव  दत्तक गेल्यामुळे त्यांचे आडनाव कुलकर्णी झाले.)

           अत्यंत बुद्धिमान असलेले व्यंकटराव व्यवसायाने वकील होते.ते लोहारा येथे वकिली करीत.ते लोकमान्य टिळकांचे भक्त होते त्यामुळेच पुढे ते स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षिले जाणे साहजिक होते. रँडच्या  खुनात आपले नाव गोवले जाईल या भीतीने संस्थानात आलेले विनायक महादेव भुस्कुटे व वि. कृ.भावे यांना व्यंकटरावांनी आपल्या घरी आश्रय दिला होता.

शाळा हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत असतानाही शाळेने हैद्राबाद सरकारने निश्चित केलेला अभ्यासक्रम व उर्दू माध्यम  स्वीकारले नव्हते.  मराठी माध्यमातून मुंबई राज्यात मान्य असलेला अभ्यासक्रम शिकवणारी संस्थानातील एकमेव शाळा  होती  तसेच  रूढ विषयांबरोबरच  मुलांवर देशभक्तीचे संस्कार करणारी, त्यांना व्यायामाची गोडी लावण्याचे प्रयत्न करणारे तसेच जातीपाती, आर्थिक उच्चनीचता विसरावयास लावून मुलामध्ये संघभावना बंधूभाव वाढवणारी ही शाळा होती.

         गावालगत दोन एकराच्या प्रशस्त जागेत विद्यालयासाठी चौसोपी पण मातीच्या भेंड्याची इमारत बांधण्यात आली. 80 णांच्या या चौसोपी इमारतीत दिवसा शाळा भरे रात्री तिचा वसतीग्रह म्हणून उपयोग होई. या इमारतीच्या जवळच शिक्षकासाठी झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. शाळेने उभारलेली स्वतंत्र व्यायाम शाळा होती. चोवीस  तास निदान काही शिक्षक व वस्तीगृहात राहणारे विद्यार्थी एकत्र राहत, त्यामुळे त्यांच्या खूप जवळीक निर्माण होई. गाव अर्ध्या किलोमीटरवर होते. तेथे एका वाड्यात शाळेचे भोजनगृह  होते. वस्तीग्रहातल्या  मुलांनी आपली ताट वाटी घेऊन जायचे व तेथे जेवायचे, भोजनानंतर ती  धूउन  परत आणायची अशी शिस्त होती. शिक्षकही तिथेच जेवत, शाळेत सुमारे दीडशे मुलं होती. 

 शाळेचा दिनक्रम-

पहाटे साडेचारला घंटा झाल्याबरोबर उठावे लागे. अंथरूण-पांघरूण याच्या घड्या करून त्यांची छोटी वळकटी  शाळेच्या छताला  बांधलेल्या शिड्यावर ठेवावी लागे. प्रातर्विधी आटोपून पाच वाजता प्रार्थना  व नंतर व्यायाम होई. एक मैल दूर असलेल्या होनाळकरांच्या विहिरीवर विद्यार्थी आंघोळ करून येत.सकाळी साडेसातच्या सुमारास भोजनगृहात अर्धी भाकरी दुध  व कारळ, जवसाची चटणी अशी न्याहरी मिळे. सकाळी आठ  ते  साडेअकरा या वेळेत  शाळेचे वर्ग भरत.द्पारच्या जेवणानंतर पुन्हा तीन ते साडेचार तास होत. त्यानंतर क्रीडांगणावर खेळासाठी जाणे  आवश्यक असे. सायंकाळी सात वाजता जेवण त्यानंतर सामुदायिक प्रार्थना करून रात्री साडेनऊच्या सुमारास विद्यार्थी झोपत. रविवारी सुट्टीच्या दिवशी शाळेच्या भिंती व जमिनी विद्यार्थी शेणाने सारवत आणि शिक्षकही त्यांना मदत करत

शाळेतील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे पंधरा मिनिटांचा तास. शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्तच्या या तासात मुलांच्यावर देशभक्तीचे संस्कार करण्यासाठी जोसेफ मॅझिनी यासारख्या देशभक्तांची चरित्रे आणि छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप या सारख्या ऐतिहासिक महापुरुषांच्या कथा सांगितल्या जात. कधी ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी तर कधी संत  तुकारामाचा अभंग समजावून सांगितला जाई.

व्यंकटराव अण्णांनी तर आपली वकिली बंद करून शाळेला संपूर्ण वाहून घेतले. एकदा अडचण आली तेव्हा भांड्याकुंड्यासह आपली सर्व मालमत्ता विकून टाकली व  आलेले आठ हजार रुपये त्यांनी शाळेला दिले होते. यामुळे  शाळा व तिचे संचालक यांच्याविषयी सर्वत्र आदराची भावना होती.

        इ.स.1929 साली  व्यंकटेश  भवानराव खेडगीकर (स्वामीजी) हे हिप्परगा शाळेमध्ये आले. शिक्षकासाठी बांधलेल्या झोपडयापैकी पश्चिमेकडील एका झोपडीमध्ये ते राहू लागले. त्यांच्याजवळ एका वळकटी शिवाय काही सामान नव्हते.  खादीचा सदरा, चूडीदार पायजमा, डोक्यावर गांधी टोपी असा त्यांचा पेहराव.  त्याचे  दोन जोड होते. हातात एक काठी असे, मात्र ती रूबाबादार दिसण्यासाठी नसून पक्षाघाताने दुबळ्या झालेल्या पायांना आधार देण्यासाठी असे. स्वामीजी वरच्या वर्गाला इंग्रजी शिकवायचे.ते पाठाची टिपणे काढून पूर्वतयारी करून शिकवीत, विद्यार्थ्याकडून नियमित गृहपाठ करून घेत. विद्यार्थ्यांना त्यांची शिकवने  आवडू लागले. मुख्याध्यापक असल्यामुळे क्वचित प्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी त्यांच्यावर प्रसंग   यायचा एकदा विद्यार्थ्याला छड्या मारल्यानंतर गुरुजी विद्यार्थ्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडले शिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा मार्ग म्हणून स्वतः उपोषण करण्यास प्रारंभ केला. एक उपोषण तर चांगली पाच-सात दिवस चालले  होते. विद्यार्थ्यांना पश्चाताप व्हावा असा उद्देश असे. आजारी विधार्थी असेल तर त्याची सुश्रुषा हे आवडीचे कार्य असे .

        परसुळे गुरुजी त्याला आयुर्वेदिक औषध उपचार करीत. गंभीर आजार असेल तर पालकांना बोलवण्यात  येई. आजारी मुलांची शुश्रुषा करण्याच्या कामात स्वामीजी सोबत  बाबासाहेब परांजपे यांनी अग्रणी असत.या शाळेतील मुलांना लाठी काठी,  बोथाटी, तलवार इत्यादी शिकवले जाई. गावातील  एक रहिवासी व शाळेतील शिक्षक दादा गवळी यांनी अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेमध्ये प्रशिक्षण घेतलेले होते.  ते कुस्ती ही  शिकवत,  शाळेचे लेझीम पथक वाखाणण्यासारखे होते. शाळेच्या वार्षिकोत्सव यासारख्या समारंभात मुलांची व्यायामाचे प्रात्यक्षिक ही मुख्य आकर्षण असे. स्वामीजी  शाळेचे मुख्याध्यापक झाले तेव्हा विज्ञान विषयाला शाळेत शिक्षकच नव्हता, सोलापूरला विनायक गोविंद परांजपे नावाचे  त्यांचे एक मित्र होते. त्यांचा धाकटा भाऊ रामचंद्र हा त्याच वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएससी झाला होता. पुढे हैदराबादच्या स्वातंत्र्य प्रख्यात झालेले हेच ते बाबासाहेब परांजपे. बाबासाहेब विज्ञान व इंग्रजी व्याकरण शिकवत,स्वार्थाचा विचारही कधी मनाला कधीच न स्पर्शू देणारा हा भावनाप्रधान शिक्षक आपल्या वक्तृत्वाने व विद्यार्थ्यांशी समरस होण्याच्या  गुणांमुळे त्यांचा आवडता झाला.

            असहकार  चळवळीतूनच शाळेचा जन्म झालेला व देशप्रेमाने भारलेले अनेक शिक्षक यामुळे हिप्परगाच्या शाळेत वातावरण देशभक्ती पूर्ण होते. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी तिरंगा ध्वज उभारून ध्वजवंदन होई. खाजगी शाळा हाच मुळी निजाम राज्य सरकारला खूपनारा विषय त्यात या शाळेतली हे उपक्रम सरकारच्या डोळ्यावर येण्यास वेळ लागला नाही. शाळेतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हिप्परगा येथे  कायमचची  पोलीस चौकी निर्माण करण्यात  आली.

            अनेक चांगले शिक्षक या शाळेला लाभले यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ .बाबासाहेब परांजपे,एस आर देशपांडे,आचार्य गणेश धोंडो देशपांडे,राघवेंद्रराव दिवाण, ह.रा.महाजनी, राळेरासकर , भावे गुरुजी,असे अनेक तपस्वी शिक्षक या शाळेला लाभले.विद्यार्थी संख्या २१० पर्यंत पोहोचली होती. एका वार्षिक उत्सव प्रसंगी वि.स.खांडेकर.न.चि.केळकर, कवी यशवंत, शं.वा. किर्लोस्कर, चित्रकार दिनानाथ दलाल, वा.म.जोशी इत्यादी उपस्थित होते.

“या संस्थेचे कार्य म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा श्री गणेशाच होय.” असे उदगार मा.यशवंतराव चव्हाण यांनी काढले होते.

‘हिप्परग्याच्या शाळेचा इतिहास हा अगदी लहान माणसेही ध्येयवादाने प्रेरित झाली, एखादया  कालखंडातील मंतरलेल्या वातावरणाने त्यांना भारून टाकले म्हणजे कशी कर्तृत्ववान ठरू शकतात,नवा समाज निर्माण करण्याचे स्वप्न त्यांना कसे पडू शकते ,

आपल्या व्यक्तिगत स्वार्थाचा विचार  त्यांच्या मनातून लोप पावून समष्टीच्या जीवनाशी , तिच्या भवितव्याशी ते कसे समरूप होतात याचा इतिहास आहे...............माळरानावर मुलांच्यावर देशभक्तीचे ,स्वातंत्र्याचे ,समतेचे संस्कार करणारे विद्यालय उभे राहते. अनेक गुणवान व कर्तृत्ववान माणसे शिक्षक म्हणून तिथे जमा होतात.ह.रा.महाजनी पासून बाबासाहेब परांजपे पर्यंत अनेक बुद्धिवान व्यक्ती शिक्षकाचा पेशा स्वीकारतात . मराठवाडयातील अनेक जाणते पालक आपल्या मुलांना तिथे पाठवतात.आपली जातपात विसरून मुले एका छपराखाली नांदतात आणि गरज पडली तेव्हा याच शाळेचे शिक्षक स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रत्यक्ष नेते –कार्यकर्ते म्हणून उतरतात.’अशी या शाळेची कथा न्या.नरेन्द्र  चपळगावकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ राष्ट्रीय शाळा - हिप्परगे या भगवानराव व्यंकटराव देशमुख लिखित शाळेच्या आठवणींच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. या शाळेविषयी मुळातूनच वाचावे असे हे पुस्तक आहे.

 

पुढे १९३५ ला  प्लेगच्या साथ आल्यानंतर शाळा सोलापूरला स्थलांतरीत करण्यात आली नंतर स्वामीजी, बाबासाहेब  व त्यांचे सहकारी मोमिनाबाद म्हणजेच आजच्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षणसंस्थेत सहभागी झाले.

अशा प्रकारे खऱ्या अर्थाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाला नेतृत्व व कार्यकर्त्यांची फळी पुरवण्याचे कार्य या शाळेने केले आहे.निस्वार्थ वृतीने कार्य करण्याऱ्या या सर्व संस्थापक व शिक्षकांना वंदन करून मी येथे थांबतो ...

 

जय हिंद, जय भारत....    

Contact - 7588875699

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.