ओळख वेगळ्या पुस्तकांची - हटके भटके




                                   ओळख वेगळ्या  पुस्तकांची                           
                                          हटके भटके
                                   लेखक – निरंजन घाटे
                                                                          
 
  भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे                                                                                                                                                                        www.bhausahebumate.com
                                                                                      
         मानव आणि भटकंती हे समीकरण अगदी आदिमानवापासून सुरु झाले.सुरुवातीचा मानव अन्नासाठी भटकंती करत होता...आणि त्याच्या या भटक्या स्वभावामुळेच तो जगातील वेगवेगळ्या खंडात जाऊन पोहचला.तसं  पाहिलं तर अनेकांना भटकंती आवडते त्यात मी ही आलोच ....पण काही लोक अशी काही भन्नाट भटकंती करणारी मंडळी असतात की ते वाचून आपण थक्क होऊन जातो. अशाच काही भटक्यांची ओळख करून देणारे निरंजन घाटे यांचे हटके भटके पुस्तक वाचनीय आहे .अनुभव या नियतकालिकातून हे लेख अगोदरच वाचून झाले होते. पण सर्व  लेख एकत्रित वाचणे हा  निश्चितच आनंददायी अनुभव होता.
 रामायण आपल्या सर्वांनाच माहित असते अगदी लॉकडाऊन च्या काळात परत एकदा रामायण पाहण्याची संधी मिळाली पण आपण त्यापलीकडे फारसा विचार करत नाही. रावणासोबतच्या युद्धात लक्ष्मण जखमी होतात आणि त्यांना वाचवण्याची जवाबदारी हनुमानजीवर येऊन पडते .द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले व सरळ पर्वतच उचलून नेला ही हकीकत आपल्या सर्वानाच माहिती आहे. पण  ही हकीकत ऐकल्यानंतर अन मुस्टोया इंग्लंडमधील महिलेचे कुतुहूल जागृत झाले व त्यांनी रामायणातील मारुतीच्या मार्गावरून म्हणजे नेपाळ मधील द्रोणागिरी ते लंका असा सायकलवरून प्रवास केला व या सर्व प्रवासाची आणि त्या दरम्यान रामायणातील विविध घटनांची माहिती एकत्रित करीत राहिल्या या सर्व अनुभवावर आधारित हकीकत म्हणजे ‘टू व्हील्स इन द डस्ट – फ्रॉम काठमांडू टू  कॅन्डी ‘ या पुस्तकाचा प्रवास...खरोखरच भन्नाट आहे.आपल्याला वाटतं की रामायण आम्हाला माहिती आहे पण अॅन मुस्टो यांनी पुस्तकात नोंदविलेली माहिती नाविन्यपूर्ण आहे.
सातव्या शतकात सोळा हजार किलोमीटरचा प्रवास करून भारतात आलेल्या ह्यूएनत्संग बद्दल आपण शालेय पुस्तकातच वाचलेले असते पण त्याच मार्गावरून प्रवास करून ती घटना , प्रवास समजून घेणाऱ्या मिशी सरण यांच्या वरील लेख ही वाचकांना आवडेल असाच आहे. ह्यूएनत्संग याच्या प्रवासानंतर  १३०० वर्षांनी प्रवास करून त्याच्या प्रवासच चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे करतात. फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट  याचा १८१५ च्या वाटर्लुच्या लढाईतील पराभवानंतर नेपोलियनला सेंट हेलेना या बेटावर ठेवले होते इथेच १८२१ मध्ये त्याचे निधन झाले.या काळातील त्यांचे वास्तव्य समजून घेण्याच्या उद्देशाने ज्युलिया ब्लकबर्न या ब्रिटीश महिलेने केलेल्या प्रवासाची व या बेटाविषयी , त्याच्या इतिहासाविषयी सांगितलेली माहिती भन्नाट आहे. हा लेख वाचल्यानंतर ज्युलिया ब्लकबर्नने लिहिलेले ‘ एम्परर्स लास्ट आयलंड’ हे पुस्तक वाचले पाहिजे असच प्रत्येक वाचकाला वाटू लागतं. हेन्री हॅन्सन  यांनी कुर्दिस्तान (इराक,इराण , तुर्कस्थान आणि सिरीया या देशांमध्ये विभागला गेलेला कुर्दी वंशाच्या लोकांचा प्रदेश)  या प्रदेशात एकटीने भटकंती करून लिहिलेल्या ‘डॉटर्स ऑफ अल्लाह’ हे पण एक अनोखं पुस्तक ... हेन्री हॅन्सन यांनी कधीही न दिसलेल्या समाजाची, संस्कृतीची ओळख वाचकांना करून दिली आहे.तसेच एका दुर्मिळ व्याधीने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या अलेक्झांडर फ्रेटर यांनी भारतातील मौसमी पावसाचा आढावा घेताना केलेली भटकंती आणि त्यातून सांगितलेले किस्से , गप्पा आणि इतिहास या सर्वांचा परिचय निरंजन घाटे सर तितक्याच सोप्या भाषेत, रंजक किस्से सांगत करून देतात. शून्याचा शोध घेण्यासाठी भटकणाऱ्या अमीर अॅक्झेनची कथा असो की उंटावरच्या संशोधनाला वाहून घेतलेल्या ह्ल्से कोहलर रोलेफसन यांची भटकंती असो आपण आश्चर्यचकित होऊन जातो.
या पुस्तकात एकूण सतरा लेख आहेत आणि मला खात्री  आहे की भटकंती ची आवड असणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक आवडेल असेच आहे. सर्व लेखांचा आढावा घेणे मी मुद्दाम टाळतो आहे कारण वाचकांनी मूळ पुस्तक वाचावे अशी माझी इच्छा आहे. बाकी निरंजन घाटे सरांच्या विषयी काय बोलावे ? एखादया माणसाचे वाचन एवढे अफाट असू शकते हे त्यांनी वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात खूप सविस्तरपणे मांडले आहे.

अज्ञाताच्या शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या  अर्थात हटके भटके हे पुस्तक  तुम्हाला वाचायला आवडेल या विश्वासासह थांबतो ...
हटके भटके
लेखन    :  निरंजन घाटे                              
संपादक  :  सुहास कुलकर्णी

प्रकाशक  :  समकालीन प्रकाशन,पुणे
फोन – ०२०-२४४७०८९६  
किमत – २५० रुपये

Like, share and subscribe our YouTube Channel –Bhausaheb Umate
Our Official website - www.bhausahebumate.com
Download our App. From Play store – Bhausaheb Umate
---------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.