छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे स्मारक


छत्रपती शिवाजी महाराज  स्फूर्ती केंद्रमछत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे स्मारक: -
दोन वर्षापूर्वीची आठवण आहे ... कुटुंबीया सोबत श्रीशैल्यमला गेलो होतो ..स्थानिक माहिती देणाऱ्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज  स्फूर्ती केंद्रम बद्दल माहिती वाचून माझी उत्सुकता वाढली ...आणि आपोआपच मी  त्या दिशेने चालू लागलो ...माझी आपली माफक अपेक्षा होती...कारण छत्रपती शिवरायाबद्दल या तेलगु बांधवांना काय कल्पना इत्यादी भ्रम माझ्या तही होताच   ....पण तेथील भव्य स्मारक बघून मी आचंबित झालो ...    महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक होईल तेव्हा होईल पण आंध्र प्रदेशात श्रीशैल्यम येथे तेलगू बांधवांनी कोटयावधी रुपये खर्च करून शिवरायांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज  स्फूर्ती केंद्रम हे भव्य स्मारक उभारले आहे .
 [एप्रिल १६७७ मध्ये दक्षिणेच्या मोहीमेवर असताना छत्रपती शिवराय येथे नऊ  दिवस थांबले होते.येथील शांत आणि पवित्र परिसर पाहून शिवरायांना विरक्तीचे विचार आले होते असे म्हणतात .महाराजांनी या प्राचीन मंदिराच्या उत्तरेस स्वखर्चाने भव्य गोपुरम बांधून काढले आहे आजही शिवरायांच्याच नावाने  हे गोपुरम ओळखले जाते.  नंतर शिवराय जिंजीला गेले तेथील किल्ला अधिक मजबूत व अभेद्य बनवला. शिवरायांच्या या दूरदृष्टीमुळेच पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी  हा किल्ला राजधानीसाठी वापरला व अनेक आक्रमणे करूनही मुघल सैन्य मराठी साम्राज्य संपवू शकले नाही .]
 येथील  दरबार हॉलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा , शिवरायांचे जीवनचरित्र सांगणारी ५७ प्रसंगचित्रे [ इंग्रजी , हिंदी व तेलगू भाषेत] कायम स्वरूपी लावली आहेत ....त्यातील प्रसंग वाचताना आपण शिवकाळात रमून जातो तसेच  ध्यानमंडप , तीन मजली भव्य असे अतिथी भवन(यात माफक दरात निवास व्यवस्था आहे ), गोपुरम अशा वास्तू उभारल्या आहेत .आपल्या येथील बहुतांश भाविक तिरूपतीला जाताना श्रीशैल्यम येथे दर्शनासाठी थांबतात .मला वाटतं की प्रत्येक मराठी बांधवानी थोडा वेळ काढून मंदिराच्या पाठीमागे असलेल्या या स्मारकाला अवश्य भेट द्यावी (नाममात्र प्रवेश शुल्क आहे ).
          महाराष्ट्रातील किल्ल्यांची , स्मारकांची दुरावस्था पाहिल्यानंतर खरोखरच आपण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असे वाटते.... महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी असे भव्य स्मारके उभारली जाऊ शकतात ? पण आमच्याकडे ना तशी दृष्टी आहे ना इच्छाशक्ती ....आम्ही फक्त महाराजांच्या नावाचा आपल्याला काय फायदा करून घेता येईल एवढाच विचार करतो....आणि कोट्यावधी रुपये विनाकारण वाया घालवतो ...रायगड, राजगड , शिवनेरी असे अनेक दुर्ग सांगता येतील जेथे महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य केले या किल्ल्यांवर खूप भव्य दिव्य स्मारक उभा करता येतील .... श्रीशैल्यम येथील तेलगु बांधवापासून स्फूर्ती घेऊन तरी आपण कामाला लागले पाहिजे ...
                                   भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                 लातूर 

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.