विठ्ठल मंदिर , पानगाव
Temples in Marathwada (Part ३)
विठ्ठल मंदिर , पानगाव :
मराठवाडयाच्या भूमीत असलेली
एकापेक्षा एक सरस मंदिरे म्हणजे एक फार मोठे आश्चर्य मानावे लागेल .लातूर पासून
अवघ्या ३५ किमी वर असलेले पानगाव येथील विठ्ठल मंदिर म्हणजे चालुक्य काळातील
स्थापतीना पडलेले जणू सुंदर स्वप्नच .....रेणापुरला रेणुका देवीचे दर्शन घेऊन
हालती दीपमाळ बघत पानगावच्या दिशेने पुढे
निघावे .......हैदराबाद – परळी या रेल्वे मार्गावरील एक स्टेशन म्हणजे पानगाव ...या
ठिकाणचे देवदेवतांनी नटलेले विठ्ठल मंदिर अगदी गावच्या
मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जवळ
आहे. सर्व बाजूने भरपूर बांधकाम झाल्यामुळे मूळ मंदिराच्या सौदर्यात बाधा निर्माण
झाली आहे हे मात्र संबंधितांच्या लक्षात आले नाही यात आश्चर्य वाटून घेण्याचे काहीच
कारण नाही ....आपण आपलं शांतपणे मंदिर
पाहावे ...
अति सुंदर शिल्पांनी नटलेल्या या मंदिराच्या
निर्मिती इ.स. १००० ते इ.स. १२०० या दरम्यान झाली असावी असे मानले जाते. मंडप, अंतराळ
, गर्भगृह असे मंदिराचे मुख्य तीन भाग आहेत. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत.पण
सध्या यापैकी एकच प्रवेशद्वार वापरात आहे. या मंदिराचे विधान जरी आयताकृती असले तरी
मुखमंडप मात्र चौरसाकृती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस वेदिकापट्ट आहेत.
अर्धभिंतीवर जमिनीला समांतर असे पट्ट आहेत. त्यावर हत्ती , लघुस्तंभ, त्यावर
लघुशिल्पे असे विविध प्रकारचे कोरीव काम आहे.
या मंदिरातील एक वेगळेपण म्हणजे
येथील मुख मंडप आणि सभामंडपामध्ये वामन भिंतींवर आरपार नक्षी केलेली जाल-वातायने........ यातील कोरीव काम पाहताना आपण थक्क होऊन जातो आणि आपली
भेट सार्थकी लागली याचे समाधान आपोआपच आपल्या चेहऱ्यावर दिसू लागते....
सभामंडपात समोरील भिंतीवर दोन कोनाडे
असून एकात गणेशाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या कोनाड्यात एक नवीन देवीची मूर्ती
बसवलेली आहे. मंदिरातील सर्व द्वारशाखा पंचशाखा आहेत.
अंतराळाच्या द्वारशाखेवर ललाटबिंबावर गणपती तसेच त्यातील उत्तररंगावर विष्णू आणि नरसिंहाच्या प्रतिमा आहेत. आतील गर्भगृहाच्या
द्वारेशाखेवर गजलक्ष्मीची मूर्ती आहे. गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मात्र नंतरच्या काळात बसवलेली असावी.
गर्भगृहाच्या तिन्ही दिशांना तीन देवकोष्ठे आहेत. ह्या मंदिराचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुखमंडपातील खांबांच्या तिरप्या हस्तांवर असलेल्या मोहक सुरसुंदरी.....डॉ.प्रभाकर देव सर या शिल्पांचे स्त्री सौंदर्याचा काव्यात्म शिल्पाविष्कार असा
उल्लेख करतात...तो उल्लेख ही शिल्पे पाहिल्यानंतर मनोमन स्वीकार्य वाटतो. या
सुरसुंदरी ह्या कल्याणी चालुक्यांच्या मूर्तीच्या घाटाच्या आहेत. त्यातल्या काहीचे हात पाय भग्न झाले असले तरीही सौंदर्य अजूनही टिकून आहे.
या मंदिराचा
मुख्य मंडप मात्र नव्याने आधुनिक पद्धतीने बांधला आहे त्यामुळे मूळ मंदिराच्या
शैलीशी मेळ बसत नाही तसेच सध्याचे शिखर ही विजोड वाटते .मंदिराच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम मात्र अप्रतिम
आहे.या मंदिराचा नंदी मंडप ही उल्लेखनीय आहे.
वास्तविक पाहता
होट्टल व धर्मापुरी या ठिकाणच्या मंदिराप्रमाणे या मंदिराचा हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा
यासाठी शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पानगाव येथील ग्रामस्थ व लोकप्रतीनिधिंनी
पुरातत्त्व विभागाकडे मागणी करावी व त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा
करावा, तरच हा अनमोल ठेवा जतन करता येऊ शकेल.........अन्यथा या मंदिरांच्या रूपाने
त्या अलौकिक प्रतिभेच्या कलावंतानी घडवलेला हा ठेवा येणाऱ्या पिढ्यांना दाखवणार
कसा याचा विचार करतच मी परतीच्या प्रवाशाला निघालो...परतताना पानगावचे
अजून एक वैभव –भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला नतमस्तक होऊन मार्गस्थ झालो. मागे सात
वर्षापूर्वी ही इथे आलो होतो, त्या पेक्षा कितीतरी भव्य असे स्मारक पाहून खूप समाधान
वाटले.
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
लातूर
Post a Comment