उदगीरची लढाई आणि तांदुळजा


उदगीरची लढाई 

आणि 

तांदुळजा
                                                      भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                              लातूर

पानिपत या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक मित्र उदगीरची लढाई आपल्या उदगीरलाच झाली होती का ? असा प्रश्न विचारु लागले ...या लढाईबद्दल सांगताना उदगीरच्या लढाईतील सर्वात निर्णायक लढाई लातूर पासून ३५ किमी वरील तांदुळजा  या गावी झाली असे सांगितल्यानंतर ऐकणारा आश्चर्य चकित होत असे.आमचे मित्र श्री विकास जाधव व श्री परमेश्वर राऊत यांच्यामुळे  माझा मुलगा प्रथमेश सोबत आज (दि १९ डिसेंबर २०१९) केलेला तांदुळजा दौरा खूप सुकर झाला. आपल्या भागात इतकी महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना घडली होती हे पण नवीन पिढी विसरून जात आहे .... म्हणूनच  या लढाईचा हा धावता आढावा ...

 नुकताच पानिपत हा चित्रपट प्रदर्शित  झाला ...भारताचा इतिहास पाहिल्यास यातील अनेक प्रसंग चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करतात. चित्रपटात ‘ऐतिहासिक  प्रसंग’ जिवंत करण्याची ताकद आहेच .... एखादा प्रतिभावंत दिग्दर्शक अशा संधीच सोनं करतो नी शिवाय तो  ऐतिहासिक कालखंड ही परत एकदा जिवंत करून त्या काळात आपणास घेऊन जातो...

प्रत्येक मराठी माणसामध्ये कुठेतरी खोलवर रुतून बसलेली जखम म्हणजे १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेले पानिपतचे तिसरे युद्ध .....पण मी आज यावर बोलणार नाही ..आज मी बोलणार आहे या चित्रपटाची सुरुवात ज्या प्रसंगापासून होते त्या उदगीरच्या लढाईबद्दल ...इ.स.१७२२ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्याने पालखेडच्या लढाईत निजामाचा पराभव करून निजामाकडून चौथ आणि सरदेशमुखीचे हक्क मान्य करून घेतले होते.( पूर्वी मोगलांनी हे हक्क मान्य केले होतेच पण इ.स.१७२४ मध्ये निजामी राजवट प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी हे हक्क मान्य करणे आवश्यक होते जे पालखेडच्या  लढाईमुळे शक्य झाले ) पुढे निजाम व मराठे यांच्यात इ.स.१७५२ मध्ये भालकीचा तह झाला ....या  सुमारास पेशव्यांचा उत्तरेकडे हल्ला करण्याचा विचार पक्का झाला होता त्यापूर्वी दक्षिणेकडील आपले राज्य पक्के करावे म्हणून पेशव्यांनी आपली नजर निजामाकडे वळवली.कारण पेशव्यांचा पहिला शत्रू निजामच होता. 

निजामाच्या दरबारात बुसी या फ्रेंच सेनापतीवरून दोन तट पडले होते, थोडयाच दिवसात बुसीला फ्रेंच गव्हर्नरने परत बोलवले आणि सालाबातजंगचा  भाऊ निजाम अली याच्याकडे सूत्रे सोपवली. या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी पेशव्यांनी इ.स.१७५७ साली औरंगाबादजवळ सिंदखेड येथे युद्ध करून २५ लाखाचा मुलुख आणि नळदुर्गचा किल्ला घेतला. सिंदखेडच्या तहात अहमदनगर आणि परंडयाचा किल्ला पेशव्यांना द्यावा असे ठरले होते पण तो करार अमलात आणण्यास निजाम अनमान करत होता त्यामुळे उदगीरची मोहीम आखणे गरजेचे होते. प्रथमतः अहमदनगरचा किल्ला घेतला गेला. हा किल्ला  घेतल्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली सैन्य बिदरकडे जाण्यास निघाले. यात राघोबादादा, सदाशिवरावभाऊ  व विश्वासराव हे तिघे युद्धाच्या आघाडीवर होते.


 नानासाहेब अहमदनगरच्या किल्ल्यात बसून योजना आखत होते. सदाशिवरावभाऊ परतूर, बीड मार्गे परळीला आले. इकडे रघुनाथराव जानेवारी १७६०  च्या सुमारास उदगीरजवळ पोहचले होते. पेशव्यांकडे विश्वासराव मेहेंदळे , इब्राहीम खान गारदी ही मंडळी होती. १९ व २० जानेवारी रोजी राघोबाच्या सैन्याने आणि इब्राहिम खान गारदीच्या सैन्याने सालाबतजंगवर हल्ला चढवला यात निजामी सैन्याचे नुकसान झाले. एव्हाना  निजामही आपल्या भावाच्या मदतीला आला, त्यांनी औरंगाबादहून आपली फौज धारूरला बोलवली होती, आपण धारूरला जावे व तिथे मराठ्यांच्या सैन्याशी लढा द्यावा या हेतूने त्यांनी आखणी केली होती पण  निजामाची ही चाल पेशव्यांच्या  लक्षात आल्यानंतर रघुनाथरावांनी सालाबातजंगला महिना दीड महिना उदगीरजवळ लहानसहान चकमकीत अडकून ठेवून त्यांचा  वेळ वाया घातला इकडे सदाशिवरावभाऊंनी धारूरच्या मार्गावरील तांदुळजा हे गाव लढण्याकरिता निवडले ....

तांदुळजा हे  गाव बावणे नाईक  या सरदारांच्या ताब्यात होते. इ.स. १७४३ साली शाहू महाराजांनी तांदुळजा आणि गिरवली ही दोन गावे सरदार जानोजीराव नाईक बावणे यांना इनाम म्हणून  दिली होती. त्यामुळेच  पेशव्यांनी या  गावची  निवड केली  असावी. येथील मातीची गढी   जानोजीराव बावणे यांच्याकडेच होती. तांदुळजा या गावाजवळ  निजामअली आणि सालाबातजंग यांच्या संयुक्त सैन्याची गाठ पडली. एका बाजूने सदाशिवराव भाऊचे सैन्य आणि डाव्या बाजूने राघोबाच्या सैन्यांनी हल्ला करून निजामाच्या सैन्याला नामोहरम केले. या तुंबळ युद्धात अनेक सैनिक कामाला आले.ज्या भागात हजारो सैनिक धारातीर्थी पडले, तो भाग आजही ‘शिरखंडी’ म्हणून ओळखला जातो. 

दुसऱ्या दिवशी निजाम शरण आला. येथील बावणे नाईकांच्या गढीतच तहाची बोलणी झाली.(आजही या गढीत बावणे नाईकांचे वंशज वास्तव्यास आहेत.)  मराठांच्या मागण्या मान्य करत निजामाने ६० लाखाचा मुलुख देऊन तह स्विकारला. या काळातच उत्तरेकडील आक्रमणाची वार्ता आली आणि उदगीरच्या लढाईतील हे पराक्रमी योद्धे पानिपतच्या दिशेने चालते झाले ....पण ते परत आलेच नाहीत. प्रत्येक मराठी माणसाला एक  खोलवरची जखम देऊन सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव  पानिपतवर दिसेनासे झाले, यावेळी सुमारे दीड लाख लोक मारले गेले. खरंतर भारताच्या रक्षणासाठीच पानिपतवर मराठे लढले ...भारत हा एक देश असण्याची व त्याचा राजा धर्माने कोणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठींबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठयांनी दाखवली हे मात्र खरे  .....

( जाता जाता- १९८४ ला औरंगाबाद येथील डॉ सतीश देशमुख यांनी सरदार नाईक बावणे यांच्या संग्रहातील दखनी, मराठा, मुगल, राजपूत शैलीची २९ चित्रे प्रकाशित केली होती. त्यातील काही दुर्मिळ  चित्रे  अभ्यासकांना येत्या काही दिवसात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे    
                                                    भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                             मो. ७५८८८७५६९९
                                                 www.bhausahebumate.com   

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.