झुंजार स्वतंत्रता सेनानी यशवंतराव सायगावकर





झुंजार स्वतंत्रता सेनानी यशवंतराव सायगावकर

                हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार सेनानी यशवंतराव सायगावकर आपल्याला सोडून गेले यावर माझा विश्‍वासच बसत नव्हता. साधारणपणे पाच वर्षापूर्वी मी पहिल्यांदा सायगावला गेलो होतो. माझे वडिल व बाबांचे (यशवंतरावांचे) लहान बंधु रघुनाथराव हे वर्गमित्र जेंव्हा
माझे वडील बाबांना भेटण्यासाठी गेले तेंव्हा त्यांना आश्‍चर्य वाटलं की एका स्वातंत्र्य सैनिकाला भेटण्यासाठी कोणीतरी येतंय. नंतर पुढे केंव्हातरी मी गेलो माझं खुप उत्साहाने स्वागत झालं. भरपूर गप्पा मारल्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे या विषयावर अगदी लहान-सहान तपशील मी त्यांना विचारू लागलो. पहिल्याच भेटीत मी बाबांच्या प्रेमात पडलो. नव्वदच्या आसपास वय असतांनाही किती उत्साह, अफाट स्मरणशक्ती, प्रचंड वाचन, अखंडीत लेखन... बापरे मी शब्दशः अचंबित झालो. या वयात एखादा असामान्य कर्तृत्वाचा माणूसच हे सगळं करू शकतो. माझा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा अभ्यास बघून त्यांना झालेला आनंद ते अनेक ठिकाणी व्यक्त करत.
               गोर्टा हत्याकाडांवर डॉक्युमेंटरी तयार करावी असं मला वाटत होतं, एकदा सहजच मी बाबांना माझी कल्पना सांगितली. त्यांना ती कल्पना मनापासून आवडली. यासंबंधी मी काहीवेळेस एकटाच गाडीवर  जात असे. बाबा म्हणत , 'एकटं फिरू नये,सोबतीला कोणीतरी घ्यावं” त्यांना वाटणारी काळजी साहजिकच होती. मी माझ्या गावापासून जवळपास 200 कि.मी.चा प्रवास एकट्यानेच अन् तेही गाडीवर करतो हे बाबांच्या काळजीचं मुख्य कारण असे. मी सायगावला गेलो की, त्यांच्याशी निवांतपणे गप्पा मारणे आणि त्यांच्या भूतकाळातील घटना जाणून घेणे हा माझा नित्यक्रमच झाला होता. बाबांनी कधीच कंटाळा केला नाही. बाबा सांगत, ' माझा जन्म मोगलाई पायगा विभागातल्या नवाब सर खुरर्शीदजा मरहम यांच्या जहागिरीच्या सायगाव या गावी  1926 च्या आसपास झाला. लहानपण अगदीच गरीबीत गेलं. ओला दुष्काळ अन्नाची टंचाई, उपासमार तर पाचवीला पुंजलेली.. मिळेल ते खाऊन दिवस काढावे लागत. माझी माय नरसाबाईने या सर्व परिस्थितीचा धैर्याने सामना केला. आमच्या उपजिविकेचा मुख्य आधार शेती या थोड्याशा शेतीवर कुटूंबाला जगविणे ही तारेवरची कसरत. मला चौथीत असल्यापासूनच आर्य समाजाच्या सानिध्यात येण्याची संधी मिळाली. दरवर्षी सायगावला आर्य समाजाचे वार्षिक संमेलन भरत असे. या कार्यक्रमात एकदा मी आर्य समाजाचे भजन गायलो. त्यांची प.प्रल्हादजी, पं.नरेदवजी आणि अ‍ॅड.शेषरावजी वाघमारे यांनी वाहवा केली. माझी चंचलता बघून हैदराबादला शिक्षणासाठी घेवून जाण्याची तयारी दाखविली पण माझी माय कांही तयार होईना. शेवटी आमच्या गावातील चन्नमल्लप्पा सुकाले सावकार यांनी विश्‍वासाने सांगितले की, तुमच्या मुलाचे भवितव्य उज्ज्वल आहे. त्याला शिकायला जाऊ द्या.
हैदराबाद येथे सुलतान बाजार आर्य समाजामध्ये पं.नरेंद्रजी यांच्या देखरेखीखाली यशवंतरावांचे शिक्षण चालू झाले. वार लावून जेवणाची सोय या ठिकाणी त्यांच्या भावकीतील नारायणराव पवार हे पण होते. 1937-39 चा सुमार होता. आर्य समाजाच्या माध्यमातूनच नंतर विजयवाडा येथे पाठविले गेले. त्या ठिकाणी जावून त्यांनी बंदुक चालविणे, लाठी चालवणे हे सर्व शिक्षण घेतले.
               भारताचे स्वातंत्र्य जस-जसे जवळ येवू लागले तसतसे हैदराबाद संस्थानात रझाकारांच्या कारवाया वाढू लागल्या. काहीपण झाले तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहील हा सातवे निजाम मीर उस्मान अली खान बहादूर यांनी आपल्या कृतीतून दाखवण्यास सुरूवात केली. कासिम रझवीच्या नेतृत्वाखाली रझाकारांची सशस्त्र संघटना मजबूत होवू लागली. गावोगावी या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. प्रत्येक रझाकाराला महिन्याला 60 रू. पगार मिळत असे. हैदराबाद संस्थानात रझाकारांना प्रशिक्षण देणारी 52 केंद्र स्थापन झाली होती.
               बिदर जिल्ह्यामध्ये तर रझाकारांचा फार जोर होता. भालकी, मेहकर, बसवकल्याण, घोरवाडी, हुलसूर, वलांडी, देवणी, आळवाई या भागातील रझाकारांनी परिसरातील जनतेवर अन्याय-अत्याचारास सुरूवात केली. या परिसरातील अनेक पस्ताकोम  लोक रझाकारांबरोबर गावचं गाव लुटू लागली. बलात्कार, अत्याचार, जाळपोळ यांनी सर्वसामान्य जनता भयभीत झाली. आर्य समाजाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होवू लागला. सायगावला रझाकारांची मोठ्या प्रमाणात संख्या होती. रझाकार गावातील हिंदुमध्ये दहशत बसविण्याचा प्रयत्न करू लागले. कादेरखाँ हा रझाकार गावाला प्रचंड त्रास देत होता. एके दिवशी यशवंतराव व त्यांचे मित्र गावा शेजारी शेतात हुरडा खायला गेले होते. तेथे मांजरा नदी काठावर रझाकार सदर काररखाँने पायवाटेने जाणार्‍या दोन महिलांची वाट अडवली व त्या मुलीवर झडप घातली. इतक्यात आरडाओरड ऐकून यशवंतराव व त्यांचे मित्र घटनास्थळाकडे धावले. तिथे झालेला चकमकीत यशवंतरावांनी कादरखानवर गोळी झाडली व तो ठार झाला. परिस्थिती खूप कठिण होती पण आता माघार घेणे शक्य नव्हते. तिथल्याच एका कोठ्यात टाकून कादरखाँ जाळलं गेलं , आता यशवंतराव निघाले ते सरळ आट्टर्गा या( ता. भालकी ) गावी तेथे त्यांचे मामा लिंबाजी मास्तर राहत होते. आट्टरगा हे खरंतर पैलवानांचे, शुरविरांचे गाव. या भागात यशवंतरावांच्या रूपाने एक उत्साही नायक आला. या गावातील सर्तरूणांना आता प्रशिक्षण देण्याचे काम यशवंतरावांनी सुरू केले. निवृत्तीराव गायकवाड, मुरलीधर गायकवाड, व्यंकटराव माणिकराव मुळे, लिंबाजी बिरादार, बळवंतराव मास्तर, ज्ञानू बोळेगावकर, डॉ.चनप्पा तुगावकर, भीमराव बिरादार, शेषेराव वाघमारे, दादाराव हालसे, ग्यानोबा बिरादार, आत्माराम मिरखले, लिंबाजी उगले, सिद्राम पाटील, निवृत्तीराव धनगर, नारायण जाधव, तुकाराम सागावे, रामा बोसगावे या सर्वांनी मिळून आट्टर्गा यागावी किसान दल या नावाची टोळी स्थापन केली. स्वतःच्या गावासह परिसरातील गावांवर रझाकारांनी हल्ला झाला की हे बहाद्दर तरूण आपल्या प्राणाची पर्वा न करता मदतीला धावून जात.
             बोळेगाव येथे संभा दरोडेखोराने परिसरातील रझाकार व पस्ताकोम यांना जमवून गाव लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी किसान दलातील तरूण बोळेगावकरांच्या मदतीला धावून गेले व संपूर्ण गाव लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या संभा दरोडेखोराचा वध केला. कोंगळीवरून परतत असतांना मेहकर परिसरात रझाकारांबरोबर घनघोर लढाई झाली. तीन तास चाललेल्या या लढाईत यशवंतरावांच्या पायाला गोळी लागली पण या संकटातून वाचले. या किसान दलाच्या तरूणांनी बोटकूळच्या लढाईत रझाकारांचा धुव्वा उडविला. टोळीच्या वाढत्या हालचालीमुळे आट्टरगा येथे पोलीस मदतगाराने मोठा फौजफाट्यासह आक्रमण केले. यावेळी यशवंतराव सायगावकर व इतर तरूणांनी मिळून पोलीस मदतगार फतेअलीखानला गोळ्या घालून ठार केले. रझाकारांबरोबर झालेला पंधरा लढ्यामध्ये टोळीला यश मिळवून देण्यात यशवंतरावांचा सिंहाचा वाटा होता.
                यशवंतरावांना अन्यायाची प्रचंड चीड होती. उंची सहा फूट. प्रकृती मजबूत उठावदार, देखणा चेहरा, भव्य कपाळ, एकंदरच रूबाबदार शरीरयष्टी तशी हिंमतपण त्यांच्यात होती. टोळीवर येणार्‍या प्रत्येक संकटातून टोळीला वाचविण्याचे कामे बाबांनी केली. आट्टर्गा टोळीला लाभलेला हा कोहिनूर हिरा होता. त्यांच्या पराक्रमाची, कामांची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षराने केली गेलीय. ते त्यांच्या लढवय्येपणामुळे पोलीस अ‍ॅक्शनच्या वेळेस सोलापूरपासून भारतीय सैन्याला रस्ता दाखविण्याची, मार्गदर्शने करण्याची जबाबदारी बाबांवर टाकली गेली. त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली. ज्या हैदराबाद मुक्तिसाठी हे सर्वजण लढत होते तो दिवस उगवला. 17 सप्टेंबर 1948 ला निजाम शरण आला. हैदराबाद मुक्त झाले. पण लढाई संपली नाही कारण हैदराबाद संस्थानाचे त्रिविभाजन होवून मराठवाड्याचा भाग महाराष्ट्रात गेला पण मराठी भाषा बोलणारी 865 गावे कर्नाटकात राहिली. सीमाप्रश्‍नाचा लढा दिर्घकाळ चालला. त्यासाठी वेळप्रसंगी तुरूंगवास भोगावा लागला पण बाबांनी हार कधी मानली नाही. ते लढत राहिले. न्यायालयाच्या माध्यमातून ती लढाई आजही चालू आहे.
                  बाबांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी पाहुण्यांचे स्वागत करावे ते बाबांनीच. प्रत्येकांची आवड जाणूनघेवून त्याला त्याच्या आवडीचं जेवण राजेशाही थाटात खाऊ घालणे ही त्यांची स्वासियत. आजच्या काळात जवळपास नाहीसा होत चाललेला हा गुण बाबांनी शेवटपर्यंत जपला. मी सायगावला अनेकदा गेलो. कधी एकटा गेलो, कधी कुटूंबियांसोबत गेलो तर मित्रांसोबत गेलो. प्रत्येक वेळी नवीन पदार्थ अत्यंत प्रेमाने आग्रहपूर्वक बाबांनी मला खाऊ घातले. गोर्टा हत्याकांडावर डॉक्युमेंटरी नंतर मी बाबांची मुक्तिसंग्रामातील आठवणीवर आधारित एक मुलाखत चित्रित केली. त्यांनी खूप उत्साहाने आपल्या आठवणी सांगितल्या. आज बाबा नाहीत पण युट्युबवर बाबांच्या आठवणी पाहता येतात. पुढे आम्ही दोघांनी मिळून गोर्टा हत्याकांडावर संशोधनात्मक ग्रंथ तयार केला. तो छापून तयार झाला पण दरम्यान बाबा आजारी पडले. ते आजारातून बरे झाले की प्रकाशनाचा कार्यक्रम घेवू असे मी ठरवले होते पण ते परतलेच नाहीत. बाबांच्या अनुपस्थितीत हा ग्रंथ प्रकाशित करावा लागेल याची मला खंत कायम राहील. बाबांनी निवृत्ती कधीच पत्कारली नाही. भारताच्या कानाकोपर्‍यात ते फिरत राहिले. हैदराबाद मुक्तीसंग्राम आंदोलन के कुछ अध्याय, महाराष्ट्र-कर्नाटक सिमालढ्याचा इतिहास, समाजभूषण अजातशत्रू अ‍ॅड.माधवराव जवळगेकर, मी माय अन बरंच काही, स्वातंत्र्य सैनिक, खुनी, डाकू, श्री भिमराव बिरादार, हैदराबाद मुक्तिसंग्राम : गोर्टा हत्याकांड अशी सहा ग्रंथ त्यांनी लिहिले. अगदी नव्वद वर्ष वय असतांनाही तरूणाला लाजवेल असा बाबांचा उत्साह असायचा. 
                     सायगावकर कुटूंबियांशी जुळलेला स्नेह, ऋणानुबंध पुढेही कायम राहतील. मी यानंतर ही सायगावला जात राहीन पण ' या भाऊसाहेब ' म्हणून माझं स्वागत करायला आपल्या बैठकीत बाबा नसतील या जाणीवेने अजूनही माझ्या डोळ्याच्या कडा ओलावतात.
झुंजार स्वातंत्र्यसेनानी पूजनीय यशवंतराव सायगावकर (बाबा) यांना भावपूर्ण श्रध्दांजली..

- भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे 
लातूर
www.bhausahebumate.com 

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.