शेठ राजा पुरणमलजी लाहोटी


            
             शेठ राजा पुरणमलजी लाहोटी
             हैदराबादचा स्वातंत्र्यलढा हा जनतेचा लढा होता. या भागात फारसा औद्योगिक विकास झाला नसल्यामुळे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात ज्याप्रमाणे लढ्यासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळायची तशी परिस्थिती या भागात नव्हती परंतु या भागातील धनिकापैकी लातूरचे राजा पुरणमलजी लाहोटी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वामीजींना  पुरणमलजीनी सुरुवातीपासून मदत केली पण स्वामीजींना फारसे पैसे कधी लागले नाहीत कारण सबंध लढा आर्थिकदृष्ट्या दरिद्री आणि लोकांच्या पाठिंब्याच्या  दृष्टीने श्रीमंत होता असे निरीक्षण न्या.नरेन्द्र चपळगावकर यांनी नोंदविले आहे .१९४०  मध्ये त्यांनी लातूरला श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून १९४० ला राजस्थान विद्यालय व १९४६ला श्री  गोदावरीदेवी  लाहोटी कन्या शाळा सुरु केली. हा काळ हैदराबाद मुक्ती लढ्याच्या रणधुमाळीचा काळ होता .या विद्यालयावर निजाम राजवटीची करडी नजर होती. कासीम रझवी लातूरचाच होता त्यामुळे या भागात रझाकारांचा प्रभाव मोठया प्रमाणात होता. पुरणमलजी या परिस्थितीला मोठया कौशल्याने तोंड देत होते. पुरणमलजी हे आधुनिक विचारसरणीचे होते. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. पांढरी टोपी, कोट व धोतर असा साधा पोषाख  मात्र समाजसेवेत ते नेहमी अग्रेसर होते. लोकसंग्रही असे हे व्यक्तिमत्त्व होते.  उमरगा येथील भारत विद्यालय, अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालय, नांदेड येथील पीपल्स कॉलेजला पुरणमलजींनी मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली. पुढे पुरणमलजीची राज्यसभेवर निवड झाली त्यावेळी स्वामीजी गुलबर्गा मतदारसंघातून लोकसभेवर तर बीड मधून बाबासाहेब परांजपे निवडून आले होते हे तिघेही  दिल्लीला एकाच ठिकाणी राहत.आपले काम अत्यंत निष्ठा पूर्वक करण्याची सवय शेवटपर्यंत चालू ठेवली, पुरणमलजीना उणे पुरे ५१ वर्षाचे आयुष्य लाभले .एवढ्या कमी वयातील त्यांचे अफाट शैक्षणिक कर्तृत्व लक्षात घेऊन १९५६ साली बाबासाहेब परांजपे व चंद्रशेखर वाजपाई यांनी पुढाकार घेऊन पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनची स्थापना केली. राजा पुरणमलजी लाहोटी यांच्या कर्तृत्वाचे व कार्याचे स्मरण नेहमीच काढले जाईल .    

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.