Temples in Marathwada ( Part 1 )
केदारेश्वर मंदिर , धर्मापुरी
खूप दिवसापासून ज्या प्रकल्पाचा विचार चालू होता
त्याला आज सुरुवात झाली. (कोणे एके काळी मराठवाडयात भारतीय संस्कृती आणि
स्थापत्याचे माहेरघर होते .. १९०१ ते १९०२ या काळात कझिन्स या इतिहास अभ्यासकाने
अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या पुढे १९७२ ला डॉ . प्रभाकर देव यांनी या
विषयावर खूप अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला आहे. आज त्या मंदिरांची अवस्था काय
आहे तेथील स्थापत्य आणि शिल्पकाम समजून घेणे हा माझ्या भटकंतीमागचा मूळ उद्देश आहे
... त्याची इतरांना माहिती व्हावी असाही प्रयत्न असेलच ... साधारणपणे माहिन्यातून
एक मंदिराला भेट देण्याचे नियोजन आहे ... ) मित्रमंडळी फारसी उत्सुक
नसल्यामुळे आज सकाळी एकटाच बाईकवर स्वार
झालो... रेणापूरला रेणुकादेवीचे दर्शन घेऊन पानगावमार्गे धर्मापुरीला
पोहचलो ... चालुक्य शैलीतील अप्रतिम स्थापत्य व शिल्पकलेचे उदाहरण म्हणजे
येथील केदारेश्वर मंदिर. धर्मापुरी हे गाव अंबेजोगाई- नांदेड रस्त्यावर अंबेजोगाई
पासून ३० किमीवर आहे. ( लातूरहून जात असल्यास रेणापूर ,पानगाव
मार्गे जावे.. एकूण अंतर 6O किमी. ) मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
मंदिराच्या बाहय भिंतीवर ६८ मूर्ती कोरलेल्या आहेत .. यात शैव व वैष्णव दोन्ही
प्रकारची शिल्पे आहेत. काली , ब्रह्मा, नरसिंह, वराह, विष्णू या
मूर्ती आहेत तसेच बाहयभिंतीवर एकूण तीन देवकोष्ठ आहेत त्यावरही उत्तम कोरीव काम
आहे . गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवरच्या देवकोष्ठांमध्ये वासुदेवाची मूर्ती आहे .
दक्षिण आणि उत्तर बाजूच्या देवकोष्ठांत अनुक्रमे केशव आणि नरसिंह यांच्या मूर्ती
आहेत. या गावात खूप अप्रतिम शिल्प लोकांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी
वापरली आहेत ... एकूणच ऐतिहासिक ठेवा जतन करण्याबाबत आपल्याकडे उदासिनता
पाहावयास मिळते ... त्यातल्या त्यात एक चांगली बातमी म्हणजे पुरातत्त्व
खात्याने या मंदिराच्या जिर्णोदवाराचे काम हाती घेतले आहे आणि तेही मूळ
स्थापत्य शैलीत कोणताही बदल न करता .... हे पाहून खरोखरच खूप आनंद झाला ... तिथेच
झाडाखाली बसून निवांतपणे जेवण केलं... थोडा वेळ वाचन , फोटो
काढले नंतर गावात असलेल्या किल्ल्याला भेट दिली .. तिथे प्रचंड अतिक्रमण आणि
दुरावस्था पाहून उदास मनाने बाहेर पडलो ... परतीचा प्रवास घाटनांदूर, अंबेजोगाई मार्गे लातूर असा केला ... दिवसभरचा एकूण प्रवास १५० कि मी ...
ना थकावट ना रुकावट ...कधी या भागात आलात तर अप्रतिम शिल्पाविष्कार पाहण्यासाठी या
मंदिरास नक्की भेट द्या ....

भाऊसाहेब उमाटे
www.bhausahebumate.com
Post a Comment