हुतात्मा कॉ.वसंत राक्षसभुवनकर
हैदराबादच्या मुक्तिलढयात विचारपूर्वक
ध्येयप्रेरित होऊन उडी घेणारा एक तरुण म्हणजे वसंत सदाशिवराव राक्षसभुवनकर.१९२७ ला
वसंत जन्मला तेव्हा राक्षसभुवनकर कुटुंब बीडला वास्तवास होते. त्यांचा वाडा
बीडच्या धोंडीपुरा मोह्ल्यातील बोबडेश्वर गल्लीच्या सुरुवातीला डाव्या बाजूस आहे. शालेय
जीवनात वसंत अत्यंत हुशार होते, मृदू भाषा व हसरा चेहरा त्यामुळे मित्र परिवारात
तो नेहमीच प्रिय असे. शालेय जीवनातच ते सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी
होत असत. १९४२ ला ते
उत्तम गुणाने दहावी पास झाले होते. पुढे
ते शिक्षणासाठी हैदराबादला गेले. उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. येथेच समाजवादी
व कम्युनिस्ट विचारसरणीच्या नेत्यांशी संपर्क आला. वंदेमातरम् चळवळीने विद्यार्थ्यात मोठया
प्रमाणात जागृती झाली होती. येथे नांदेडचे नागनाथ परांजपे, कॉ.चंद्रगुप्त चौधरी, कॉ.व्ही.डी.देशपांडे,
कॉ.एस.के.वैशंपायण यांच्याशी त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. एकूणच हैदराबाद मुक्तिसंग्रामात
उडी घेतल्यामुळे त्यांनी आता बी.ए.ला प्रवेश घेतला, येथे
त्यांनी समविचारी मित्रांना घेऊन कार्यास सुरुवात केली. ‘यंग कम्युनिष्ट लीग’ची
स्थापना केली दरम्यान त्यांनी हैदराबाद सोडून औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शेतकरी वर्गात जागृती
करण्याचे कार्य सुरु केले. अल्पावधीत त्या भागातील शेतकरी वर्गात वसंतराव लोकप्रिय
होऊ लागले तसा निजामी पोलीसांचा त्रास सुरु झाला. हैदराबादच्या सरहद्दीवर अनेक
कॅम्प सुरु झाले होते. वसंतरावांनी जैनपूर येथे कॅम्प सुरु केला व करोडगिरी नाके उद्धवस्त करण्याची मोहीम आखली. भिल्ल
लोकांना सोबत घेऊन त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या पण भामाठाणच्या मोहिमेत
आपल्या सैनिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना गोळी लागली. वसंतराव शहीद झाले. ही
बातमी सर्वदूर पसरली. गंगापूर, वैजापूर व नेवासा तालुक्यातील हजारो गरीब
शेतकऱ्यांनी व भिल्ल आदिवासी लोकांनी त्या दिवशी जेवण केले नाही की दिवा लावला
नाही . भामठाण येथे या थोर देशभक्ताची समाधी आहे. वसंतरावांचे भाऊ अनंतराव राक्षसभुवनकर
व त्यांच्या भगिनी विमलताई अंबुलगेकर यांनी ‘हुतात्मा कॉ. वसंत राक्षसभुवनकर
चरित्र आणि आठवणी’ या ग्रंथात वसंतरावांच्या जीवनातील अनेक दुर्लक्षित पैलूवर प्रकाश
टाकला आहे.
Post a Comment