हुतात्मा शोएब उल्ला खान


                               हुतात्मा शोएब उल्ला खान
                                                                  भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                            

             १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण अजून भारताच्या  स्वातंत्र्याची परिपूर्ती झाली  नव्हती. कारण भारताला ब्रिटीशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले होते आणि  संपूर्ण भारतावर काही इंग्रजांचे राज्य नव्हते. काही भागावर पोर्तुगीज, फ्रेंच यांचे साम्राज्य होते तसेच यावेळी भारतात ५६५ संस्थाने अस्तित्वात होती. भारताच्या अखंडतेसाठी ही सर्व संस्थाने भारतात विलीन होणे आवश्यक होते. भारताचे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आल्यानंतर या संस्थानिकांना भारतात सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरु झाले . भारताचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुत्सदीपणे ५६५ पैकी  बहुतांश संस्थानांचे १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीच भारतात विलीनीकरण केले. (भौगोलिक सलगतेमुळे २० संस्थाने प. पाकिस्तानात तर ६ संस्थाने पूर्व पाकिस्तानात -सध्याच्या  बांगलादेशात  विलीन झाली.) पण अजून काही संस्थाने भारतात विलीन झाली नव्हती. यात  काश्मिर, जुनागड व हैदराबाद या संस्थानांचा प्रामुख्याने  समावेश होता. येथील संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वातंत्र्य देण्यास व भारतात विलीन होण्यास  नकार दिला, त्यातील आपले  हैदराबाद हे संस्थान निजामाच्या पोलादी जोखडाखाली  होते, येथे आसफिया घराण्याची सत्ता १७२४ सालापासून  नांदत होती.
              हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्याशिवाय अखंड  भारत  अस्तित्वात येणे शक्य नव्हते. पण येथील संस्थानिक सातवा निजाम मीर उस्मान अली खान भारतात सामील होण्यास नकार देत होता. निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्ध संस्थानातील प्रजेने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असा लोकलढा उभारला,  हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा हा कोणता धार्मिक लढा नव्हता तर हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी सामान्य जनतेने दिलेला लोकलढा होता. यात सर्व जनतेने शौर्याने, धैर्याने व प्राणपणाने झुंज दिली. सामान्य जनतेच्या असीम त्यागातून आपणास स्वातंत्र्य मिळाले पण दुर्दैवाने हा इतिहास नवीन पिढीला फारसा  माहीत  नाही.हैदराबाद संस्थानाचा संस्थानिक सातवा निजाम मीर उस्मान अली हा होता. संस्थानिक मुस्लिमतर बहुसंख्य प्रजा हिंदू असल्यामुळे येथील लढा प्रथम दर्शनी जरी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील संघर्ष वाटत असला तरी वास्तविकता मात्र तशी नव्हती. महात्मा गांधी यांच्या आदेशामुळे आपला हा लढा पूर्णपणे लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी हुकुमशाहीच्या विरोधात दिला गेलेला लढा होता. हैदराबाद स्टेट कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर स्वामीजी हैदराबाद शहरात स्थायिक झाले.निंजामाच्या विरोधात लोक बोलत असले तरी सुरुवातीला स्वामीजींना उघडपणे मदत करण्यास अनेकांनी टाळाटाळ केली अशा प्रसंगी जे स्वामीजी बरोबर ठाम पणे उभे राहिले त्यात  सिराज उल हसन तिरमिजी यांचा आग्रहपूर्वक उल्लेख करावा लागतो.सिराज उल हसन तिरमिजी हे दीर्घकाळ हैदराबाद शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. हे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही स्वातंत्र्याचा आवाज वर्षानुवर्ष निझामाच्या नगरीत घुमवीत ठेवणारे एक लोकविलक्षण नेते होते. गोविंदराव पानसरे मारले गेल्याची बातमी जेव्हा हैदराबादमध्ये  आली त्यानंतर भरलेल्या कुंदास्वामी येथील प्रचंड जाहीर सभेत तिरमिजीनी हैदराबादच्या एकूण राजकारणावर आग ओकणारे भाषण केले. ते म्हणतात, “पानसरे भाग्यवान ठरले कारण त्यांना एका विशिष्ठ दिवशी हुतात्मा होता आले. मी गेली एक तप रोजच मरणाच्या सावलीखाली आहे, हे माझे व्याख्यान आपण माझ्याही शोकसभेचे व्याख्यान समजावे”.
                हैदराबाद संस्थानात निजामाच्या एकतंत्री कारभारास व रझाकारांच्या अन्यायाला जाहीरपणे विरोध करणाऱ्यामध्ये ‘इमरोज’ या उर्दू वर्तमानपत्राचा तरुण संपादक  शोएब उल्ला खान यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. संस्थानात जे चालले होते ते सर्वच मुस्लिम लोकांना  पसंद होते असे नव्हे, त्यात ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो ते म्हणजे हुतात्मा शोएब उल्ला खान. शोएब उल्ला खान आपल्या लेखणीच्या माध्यमातून निजाम सरकार व रझाकारांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध जाहीरपणे टीका करीत होते. आपल्या जाज्वल्य निष्ठासाठी प्राणाचे मोल मोजणारे शोएब उल्ला खान हे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील एक संघर्षशील व तेजस्वी व्यक्तिमत्व होते.सुरुवातीपासूनच शोएबची लेखणी अन्यायाच्या विरोधात प्रहार करीत होती. निजामाचे डावपेच, कटकारस्थाने, सामान्य जनतेची होणारी फरफट, कासीम रझवी व रझाकारांचे अन्याय – अत्याचार व राजसत्तेचा त्यास असलेला पाठींबा असे  चौफेर विषय ते लावून धरत.  निजामाच्या ढोंगी राजकारणावर त्यांनी ‘दिन की सरकार और रात की सरकार’या लेखामधून जळजळीत चपराक लगावला. दिवसेंदिवस शोएब उल्लाच्या लेखणीमधून जणू निजामशाहीला हादरे बसू लागले. त्यास धमकीची पत्रे येऊ लागली. पण हा काही धमक्यांना भिक घालणारा नव्हता.  १९ ऑगस्टच्या रझाकारांच्या  सभेत कासीम रझवीनी नाव न घेता शोएबवर जहरी टीका केली होती, ‘....आमच्याविरुद्ध उठणारे हात खाली खेचले जातील वा धडापासून वेगळे केले जातील.’  असे म्हणतात की, समझनेवालों को इशारा काफी होता है  आणि तेच झाले .
               २१ ऑगस्ट १९४८ ला आपले कार्य आटपून शोएब उल्ला खान व त्यांचे मेव्हणे इस्माईल खान कार्यालयातून बाहेर पडले. घरी परतणाऱ्या या दोघांवर रझाकारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या  शोएब उल्ला खान यांचे दोन्ही हात कलम करण्यात आले आणि जणू रझवीने केलेला संकल्प पूर्ण केला.  पहाटे पाचच्या सुमारास दवाखान्यात त्यांचे निधन झाले. इस्माईल खान मात्र वाचले  मृत्यूशय्येवर पडलेल्या आपल्या पुत्राला पाहून शोएबची आई उदगारली ‘आज मेरे बेटे ने शानदार मौत पायी’ पत्रकारितेतील शोएबचे गुरु एम.नरसिंहरावयांनी म्हटले की शोएबने आपल्या हौतात्म्याने हैदराबादमधील पोलीस कारवाईची तारीख जवळ आणली’. हैदराबादमधील पोलीस कारवाई संबंधी सरदार वल्लभभाई पटेल ठाम होते. शोएब उल्ला खान यांच्या  हौतात्म्याने पंडीत नेहरूजींच्या मनातील अस्थिरता संपली. मृत्युनंतरही रझवी व त्याच्या अनुयायाचे  शोएबशी वैर संपले नाही. शोएबचं शव कबरीतून उकरून त्याची जाहीर विटंबना करू अशा  जाहीर धमक्या रझाकार  देत. ते पाहून शोएबचे वृद्ध पिताजी आगापुऱ्यातील शोएबच्या कबरीपाशी कित्येक दिवस बंदुकीसह पहारा देत.  हैदराबाद मुक्तीसंग्रामातील शोएब उल्ला खान यांचे हौतात्म्य आपल्या कायम स्मरणात राहील .         उमाटे भाऊसाहेब शिवाजीराव ,लातूर ७५८८८७५६९९ www.bhausahebumate.com
No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.