हुतात्मा श्रीधर वर्तक

 
 हुतात्मा श्रीधर वर्तक

           हैदराबाद मुक्तीसंग्रामातील एक महत्वाचा कॅम्प म्हणजे चिंचोली कॅम्प . या केंद्रावर हत्यारे व इतर साहित्य मोठया प्रमाणात जमा झाले होते.पण अजूनही या कॅम्पने मोठी जवाबदारी पार पडली नव्हती. गौडगाव कॅम्पला अपसिंगा या ठिकाणच्या रझाकार केंद्राची माहिती मिळाली होती तेथे एका टेकडीवर रझाकार केंद्र असून येथे  ५० पोलीस व १०० रझाकार आहेत अशी माहिती होती या रझाकार केंद्रावर चिंचोली  गौडगाव, केसापुरी व आगळगाव कॅम्पच्या निवडक सैनिकांनी हल्ला करावा असे ठरले. योजनेप्रमाणे तीन तुकड्या केल्या गेल्या. रझाकार केंद्रावर हल्ला करणाऱ्या तुकडीत श्रीधर वर्तक होते. सर्वजण त्यांना शास्त्री म्हणत .रझाकार केंद्रावर हल्ला करण्यात आला पण त्या ठिकाणी तीन चार जण  मरून पडले होते . वास्तविक पाहता या हल्ल्याची बातमी अगोदरच रझाकारांना लागली होती त्यामुळे त्यांनी केंद्र खाली करून टेकडीवरील दर्ग्याजवळ आडोसा शोधला होता सर्व सैनिक मैदानात येताच रझाकारांनी गोळीबार चालू केला. श्रीधर वर्तक यांच्याजवळ असलेली बंदूक बंद पडली ती बदलण्याच्या प्रयत्नात त्यांना गोळी लागली व ते गतप्राण झाले. दुसरीकडे रझाकारांना तुळजापूर व उस्मानाबादहून मदत येत असल्याची बातमी आली चहूकडून रझाकारांनी घेरल्यामुळे नाईलाजाने वर्तकांचे शव तेथेच सोडून सैनिकांना परतावे लागले. वर्तकांचे शव उस्मानाबादच्या डी.एस.पीने मोटारीच्या मागे बांधून रखडीत नेले व त्याची होईल तेवढी विटंबना केली.उस्मानाबादचा मुस्लिम कलेक्टर सुद्धा त्या अधिकाराच्या कृतीने क्रोधीत झाला तेथे सर्वसामान्य जनतेचे काय सांगावे .शास्त्रीजींच्या या बलिदानामुळे या भागातील हजारो लोक स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले हे मात्र खरे ...हैदराबादचे असलेल्या  श्रीधर वर्तक यांचे योगदान अविस्मरणीय असेच आहे .तुम्ही जर कधी तुळजापूर ला गेलात तर तेथून जवळच असलेल्या अपसिंगा येथे अवश्य भेट दया....तेथे रस्त्याच्या कडेलाच वडाच्या झाडाखाली हुतात्मा श्रीधर वर्तक यांची समाधी आहे (खरतर ज्या जागी त्यांना होतात्म्य प्राप्त झाले ती जागा आहे ) त्या स्मुर्तीस्थाळला दंडवत घालावा आणि देशासाठी,स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शास्त्रीजींच्या आठवणी जागवत साश्रू नयनाने दोन फुले अर्पण करावीत .....

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.