भाई उद्धवराव पाटील


भाई उद्धवराव पाटील

              हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा सविस्तर इतिहास ज्यावेळी लिहीला जाईल त्यात  भाई उद्धवराव पाटील यांच्या विषयी सविस्तर माहिती असलेले एक प्रकरण निश्चितच जोडावे लागेल . भाईचे  कार्यक्षेत्र फक्त मराठवाड्यापुरतेच मर्यादित  राहिले नाही तर सर्व महाराष्ट्रात श्रमिकांचा नेता म्हणून भाई उद्धवराव पाटील यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ३० जानेवारी १९२० ला उस्मानाबाद जिल्हयातील इर्ले या गावात वतनदार पाटील घराण्यामध्ये भाईचा जन्म झाला. लहानपणी शिक्षणाची आभाळ झाली पण भाईनी जाणीवपूर्वक आपल्या शिक्षणाची दिशा निश्चित केली. उस्मानाबादमध्ये असताना भाई वार्षिक उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करत, या काळात आर्य समाजाची चळवळ     जोमात होती. पंडित श्यामलालजी, प.बन्सीलालजी, प.नरेंद्रजी यांच्या भाषणाने तरुण वर्ग प्रभावित होत असे. पुढे  प.नरेंद्रजीना अटक झाल्यानंतर भाईनी या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस  शाळा बंद पाडली त्यामुळे स्थानिक इत्तेहादुल मुसलमीनच्या नेत्यांनी या बाल सैनिकांना शासन केले जावे असा आग्रह धरला पण त्या प्रसंगातून त्यांची सुटका झाली. भाई म्हणतात , “संस्थानातील दुषित वातावरणात अनेक मुस्लिम शिक्षक मला लाभले,  त्यांच्या सुसंस्कृत मनाचा माझ्या मनावर कायमचा ठसा उमटला म्हणून मीही कधी मुस्लिम जातीचा  तिरस्कार करू शकलो नाही. १९४५ साली भाई एल.एल.बी. झाले. लातूरला महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन भरले या वेळी फुलचंद गांधीना अध्यक्ष केले होते. पण ते सावकारी करीत त्यामुळे  भाई व त्यांच्या सहकारी मित्रांनी पत्रक काढून या घटनेचा निषेध केला. शेवटी बाबासाहेब परांजपे यांनी मध्यस्थी करून भाई  व फुलचंद गांधी यांच्यात समेट घडवून आणला या अधिवेशनात फुलचंद गांधी यांनी या पुढे मी सावकारी करणार नाही असे जाहीर केले. उस्मानाबादहून आठ किलोमीटर असलेल्या काजळा या कॅम्पवर भाईनी सैनिकांना मार्गदर्शन केले होते. पुढे पोलीस कारवाई झाली हैदराबाद संस्थान मुक्त झाले अनेक मुस्लिम गुंड हैदराबादला पळून गेले पण शेतकरी – मध्यमवर्गीय मुसलमान कुठे जाणार ? अशा गरीब लोकांना लुटण्याचा, छळण्याचा प्रकार काही लोकांनी केला तेव्हा मुस्लीम लोकांना भाईनी संरक्षण दिले. भाई म्हणत, “हैदराबादचा लढा हा राजकीय लढा होता तो मुसलमानाविरुद्धचा लढा नव्हता.” पुढे १९५२ ला भाई उस्मानाबाद-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून हैदराबाद असेम्ब्लीमध्ये निवडून गेले. भाषिक पुनर्रचनेमुळे मराठवाडा मुंबई राज्यामध्ये सामील केला गेला त्यावेळी भाई मुंबई विधानसभेचे सदस्य झाले. पुढे शेतकरी कामगार पक्षाच्या (शे.का.प.) माध्यमातून भाईनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्राच्या व देशाच्या  राजकारणावर उमटवला. 
………………………………………………………………….. 


No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.