पद्मश्री गोविंदभाई श्रॉफ
पद्मश्री गोविंदभाई श्रॉफ
हैदराबाद संस्थानात
निजामी राजवटी विरुद्धचे आंदोलन जरी संपूर्ण संस्थानभर चालले तरी त्यात मराठवाडा
आघाडीवर होता. स्वामीजी कडून प्रेरणा घेऊन ज्या कार्यकर्त्यांनी हैदराबाद मुक्ती
लढयाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली त्यात गोविंदभाई श्रॉफ हे नाव आघाडीवर होते. गोविंदभाई
१९३६ला एम एस्सी व एल एल बी या पदव्या संपादन करून औरंगाबादला परतले या वेळी
मराठवाडयातील तरुणांमध्ये एक नवे वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांना जाणवली. ते
कार्ल मार्क्सच्या विचाराकडे आकर्षित झाले.
औरंगाबाद शहरात त्यांनी एक अभ्यास मंडळ स्थापन केले. हळूहळू या बैठकांना संवेदनशील
तरुणांची गर्दी होऊ लागली. दरम्यान
त्यांना औरंगाबादला शासकीय हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. अल्पावधीतच त्यांनी
विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक प्राप्त केला.
१९३७ ला
परतूर येथे महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन भरले त्यात गोविंदभाईच्या नेतृत्वाखाली
तरुणांचा गट होता. संस्थानातील जुलमी सरकारच्या विरोधात लोकांची संघटना उभी करून
तिच्यामार्फत सरकारशी लढा द्यावा असे मत या तरुणांच्या गटाचे होते या अधिवेशनामध्येच
गोविंदभाईचे नेतृत्वगुण उघड झाले या अधिवेशनातच गोविंदभाईनी परिषदेची घटना तयार केली. शेतकऱ्यांचे प्रश्नांचे महत्त्व
लक्षात घेऊन त्यांनी आपल्या राजकीय कार्यक्रमामध्ये या प्रश्नांना महत्त्वाचे
स्थान देण्याचा निर्णय घेतला.१९३८ च्या डिसेंबर महिन्यात निजाम सरकारने संस्थानात
वंदेमातरम् या गीतावर बंदी घातली गोविंदभाई व कॉम्रेड व्ही.डी. देशपांडे यांनी
प्रार्थनेच्या वेळी वंदेमातरम् म्हणण्याची चळवळ सुरु केली पुढे ही चळवळ हैदराबाद,
गुलबर्गा व वरंगल येथील कॉलेजमध्येही पसरली. या चळवळीत भाग घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना
निजाम सरकारने शिक्षण घेण्यास मज्जाव केला त्यांनी संस्थाबाहेर जाऊन आपले शिक्षण
पूर्ण केले पण हैदराबाद मधील निजामाच्या जुलमी राजवटी विरोधात पहिला लढा
विद्यार्थ्यांनी उभा केला. लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या दुसऱ्या
अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे कार्य गोविंदभाईनी
केले. हैदराबाद स्टेट कॉंग्रेसवर
स्थापनेपुर्वीच बंदी घालण्यात आली होती. राजकीय स्वातंत्र्य व लोकशाहीसाठी
स्वामी रामानंद्तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मध्ये सत्याग्रह सुरु केला. गोविंदभाई
श्रॉफ यांनी मराठवाडयातील तरुणांचा सहभाग मिळवण्यासाठी संपूर्ण मराठवाडाभर झंझावती दौरा
सुरु केला व मराठवाडयातील हजारो तरुण सत्याग्रहाच्या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान
गोविंदभाईनी आपली नोकरी सोडून दिली आणि एक पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून स्वतःला चळवळीसाठी
वाहून घेतले. हैदराबाद मुक्ती लढयातील मवाळ गटाचे लोक स्वामीजी आणि गोविंदभाईवर ते
साम्यवादी पक्षाचे असल्याचा आरोप करीत असत वस्तुतः ते खरे नव्हते त्यांच्या राजकीय
भूमिका डाव्या विचारसरणीला अनुकूल असल्या तरी त्यांना समतेबरोबरच लोकशाही
स्वातंत्र्य अभिप्रेत होते. याच काळात
गोविंदभाईनी वैजापूर या दुष्काळी तालुक्यात शेतकऱ्याच्या आर्थिक व सामाजिक
स्थितीच्या पाहणीचे काम हाती घेतले तसेच औरंगाबाद येथे भरलेल्या मजूर परिषदेत भाग
घेतला. १९४० सालच्या डिसेंबर महिन्यात सरकारने गोविंदभाई, आ.कृ.वाघमारे व इतर
निवडक कार्यकर्त्यांना अटक केली आणि बावीस महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावून
बिदरच्या जेलमध्ये रवाना केले. १९४२च्या ऑक्टोबर महिन्यात त्यांची सुटका झाली. चळवळ
जोमात होती पण हैदराबाद मधील काही मंडळीची विचारसरणी वेगळी होती त्यांना आझाद
हैदराबाद हवा होता अर्थात स्वामीजी व गोविंदभाईनी त्यास ठाम विरोध केला. औरंगाबादला
महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन भरवले गेले. संस्थानात रझाकारांचे मोठया प्रमाणात अत्याचार वाढत होते हैदराबाद
येथे १९४७मध्ये या लढयाचे संचालन करण्यासाठी एक कृती समिती स्थापन केली गेली. दिगंबरराव बिंदू हे या समितीचे
अध्यक्ष होते तर गोविंदभाई मराठवाडा विभागाचे प्रमुख होते. गोविंदभाईनी दिगंबरराव
बिंदूसह दिल्लीला जाऊन गांधीजींची भेट घेतली व निजामाचे सैन्य, पोलीसदल आणि रझाकारांनी
जनतेवर चालवलेल्या अत्याचाराची व रक्तपाताची संपूर्ण माहिती गांधीजींना दिली. यावेळी
पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल याची पण भेट घेतली. दिवसेंदिवस हा
मुक्ती लढा तीव्र होऊ लागला. ७ ऑगस्ट १९४७ रोजी
स्वामीजी आणि गोविंदभाईनी भारतीय संघराज्यात हा दिवस ‘आझाद हैदराबाद दिवस’
म्हणून पाळण्याचा आदेश दिला. हैदराबाद संस्थानातील कार्यकर्त्यांनी तो भारतीय
स्वातंत्र्याचा दिवस मोठया उत्साहात पाळला.
चिडलेल्या निंजाम सरकारने त्या दिवशी मराठवाडयातून
३६२१ लोकांना अटक केली. शेवटी पोलीस कारवाईने हे संस्थान निजामाच्या जुलमी
राजवटीतून मुक्त झाले. पण गोविंदभाईचा लढा संपला नाही. पुढील काळात गोविंदभाई मराठवाडयाच्या
विकासाचा, शिक्षणाचा आणि सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा करीत राहिले, “आम्ही ज्यासाठी लढा दिला त्या स्वातंत्र्याचा अर्थ हा
केवळ एका जुलमी सरंजामशाही सत्तेपासून सुटका एवढाच नव्हता तर लोकशाही स्वातंत्र्य
मिळवणे हा होता” असे ते आग्रहपूर्वक सांगत. भारतातील जुन्या परंपरा आणि संस्कृती
या गोष्टी विषमतेवर आधारित होत्या. येथे समतेवर आधारित अशी नवी लोकशाही मूल्ये
रुजवण्याचे काम अवघड होते. या देशाला लोकशाही शिवाय पर्याय नाही असे ते नेहमी
सांगत.
Post a Comment