डॉ. देवीसिंग चौहान गुरुजी


डॉ. देवीसिंग  चौहान गुरुजी
           हैदराबाद मुक्तिसंग्रामात ज्यांनी विद्यार्थी दशेतच उडी घेतली ते म्हणजे मुक्तीसंग्रामातील एक महत्वाचे कार्यकर्ते  देवीसिंग  चौहान. यांचा जन्म २ मार्च १९११ रोजी औसा तालुक्यातील नागरसोगा या गावात झाला त्यांचे मूळ  नाव धोंडुसिंग व्यंकटसिंग चौहान.गुरुजींचे लहानपण खूप गरिबीत गेले.   घरची  जनावरे नागरसोग्याच्या  माळावर घेऊन जात असत.  पुढे औसा येथे त्यांनी सातवी पर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर  ते हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेत आले. त्या ठिकाणी अनंत कुलकर्णी, स्वामीजी व बाबासाहेब परांजपे असे ध्येयवादी शिक्षक त्यांना लाभले. आपल्या धाडसी आणि बाणेदार वागण्याने ते सर्वाना प्रिय वाटू लागले. एकदा गावातील होनाळकर यांच्या शेतात ओढयाला आलेला पूर पाहत सर्वजण थांबले  होते तेव्हा काकासाहेब  बोलता बोलता पाण्यात  गेले व पुराच्या वेगवान प्रवाहाने वाहून जाऊ लागले तेव्हा गुरुजींनी पाण्यात उडी मारून त्यांना किनाऱ्यावर आणले. गुरुजींनी आपले शिक्षण पूर्ण करून परत हिप्परगा व अंबाजोगाई येथील शाळेत शिक्षक म्हणून काम केले. स्वामीजींच्या सांगण्यावरून त्यांनी नागपूर येथे वकिलीचा अभ्यास केला यावेळीच त्यांनी आपले धोंडूसिंग  हे नाव बदलून देवीसिंग  असे केले. १९४१ मध्ये तात्याराव मोरे, रामराव राजेश्वरराव या मित्रांच्या साह्याने उमरगा येथे भारत विद्यालयाची स्थापना केली. १९४३ मध्ये भारत मिडल स्कूलचे हायस्कूल मध्ये रुपांतर झाले होते या काळात गुरुजींची वकिली चांगली चालली होती पण या भागात बाहेरून पदवीधर येत नसत पण बाबासाहेब परांजपे यांच्या सुचनेनुसार त्यांनी महिना बाराशे रुपयाची वकिली सोडून दोनशे रुपयाच्या मुख्याध्यापक पदावर रुजू झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ला त्यांनी उमरगा येथे तिरंगा फडकावला म्हणून  त्यांची रवानगी उस्मानाबादच्या तुरुंगात झाली येथेही त्यांचे वाचन चालूच होते या काळात हैदराबाद संस्थानात सशस्त्र लढा मोठया प्रमाणात उभा राहिला होता तुरुंगात बसण्यापेक्षा शक्य त्यांनी बाहेर पडून लढयात सहभाग द्यावा अशी सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तुरुंगातून पलायन करण्याचा बेत आखला. श्रीनिवास अहंकारी व त्यांनी मिळून तुरुंगातून पलायन केले पण पहारेकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पाठलाग सुरु झाला. श्रीनिवास अहंकारी शेजारच्या शेतात जमिनीवर पडून राहिले पण पळणाऱ्या गुरुजीना पकडून परत तुरुंगात आणले गेले त्यांच्या हाता-पायात बेडया  ठोकून त्यांना फटके मारण्यात आले पण हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी गुरुजींनी सर्व यातना हसतमुखाने स्वीकारल्या पुढे हैदराबाद संस्थान मुक्त झाले, गुरुजी राजकारणात आले. १९५२ च्या निवडणुकीत गुरुजी औसा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मराठवाडयाच्या विकासाचा ध्यास त्यांना होता. हैदराबाद राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात १९५२ ते १९५४ या काळात  त्यांनी शिक्षण आणि सहकारमंत्री म्हणून काम केले. यथावकाश राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आपला वेळ सदैव संशोधन व लेखनात घालविला. ते संपूर्ण मराठवाडयात देवीसिंग गुरुजी या नावाने सुपरिचित होते. ध्येयवादी शिक्षक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी, वकील, राजकारणी, संशोधक असे बहुआयामी व्यक्तिमत्व गुरुजींच्या रूपाने मराठवाडयाला लाभले हे आपले भाग्य.....
                

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.