
कल्हाळीच्या वीरांची शौर्यगाथा
निजामी राजवटीत रझाकारांच्या अन्याय ,अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या.पोलिसांच्या आशीर्वादाने रझाकारांनी चालविलेल्या अन्यायाचा अत्यंत शौर्याने सामोरे गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्यातीलच एक महत्वाची घटना नांदेड जिल्हयातील मन्याड नदीच्या खोऱ्यातील कल्हाळी (ता.कंधार)येथे घडली. या गावात अण्णासाहेब नाईक हे वतनदार होते.१९४८ च्या जून महिन्यात महसूल खात्याने वसुलीचा धडाका लावला होता.पण नापिकीमुळे शेतकरी सारा देऊ शकत नव्हते.गंगाधर पटवारी हा शासनाचा नोकर होता.तो गावकऱ्यांना सारा वसुलीसाठी छळू लागला.अप्पासाहेब नाईक यांनी त्यास गडीवर बोलवून दम दिला त्याने कंधारला जाऊन तहसीलदारापुढे जाऊन सदर घटनेची माहिती दिली.संतापलेल्या तहसीलदाराने आता अमीनसाहेबाला (फौजदार)सोबत देऊन आपले काही कर्मचारी वसुलीसाठी पाठविले.अप्पासाहेबांनी गढीवर बोलवून अमीन साहेब व कर्मचाऱ्यांचा चहा पाणी देऊन आदर सत्कार केला पण सारा भरण्यास साफ नकार दिला. या वर्षी उत्पन्न झाले नाही त्यामुळे सारा देणार नाही असे ठणकावून सांगितले.हळूहळू वाढ वाढू लागला. देख लुंगा म्हणत अमिनसाब निघाला पण जाताना अमिनसाहेबाने काढलेल्या अपशब्दाने नाईक संतापले व त्यांनी आपल्या बंदुकीतून गोळी झाडली,गोळी अमीनाच्या मांडीत घुसली .त्याने कंधारच्या दिशेने पळ काढला .घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती त्याने नांदेडला कळून सशस्त्र पोलिसांची मदत मागितली पण सदर घटनेचा रिपोर्ट हैदराबादला जाऊन कारवाई होण्यास वेळ लागणार होता पण अमिनसाहेबाला तेवढा धीर निघत नव्हता.त्याने कंधारच्या रझाकारांना चिथावणी दिली.गंगाधर पटवारी व ते दीड-दोनशे रझाकारांनचे टोळकेकल्हाळीवर येऊन धडकले व त्यांनी गावात दिसेल त्यास झोडपण्यास सुरुवात केली .अनेक घरे जाळली.नाईक यावेळी गावात नव्हते ते परत येईपर्यंत रझाकार पळाले. साऱ्या अनर्थाला गंगाधर पटवारी कारणीभूत आहे हे कळताच नाईक संतापले त्यांनी या गोष्टीचा बदला घेण्याचा निश्चय केला चारच दिवसांनी पेठवडजच्या बाजारात नाईकाच्या लोकांनी पटवाऱ्याला गोळ्या घालून ठार केले.नाईकांच्या बगावतीची बातमी हैदराबाद पर्यंत पोहचली.कल्हाळीवर एक सशस्त्र पोलिसांची टोळी पाठवली गेली.अप्पासाहेबांना परिस्थितीचे गांभीर्य समजले त्यांनी ज्या लोकांना गाव सोडून जावावयाचे आहे त्यांनी जावे असे सुचविले काही लोक गेले पण अनेकांनी नाईकांची साथ सोडण्यास नकार दिला.
२९ जुलै १९४८ ला रझाकारांनी गावावर हल्ला केला.धोक्याची घंटा वाजवली गेली.सारा गाव गढीत जमले.लढाईला तोंड फुटले.गढीवरून गोफणीतून गोटे सुटू लागले. बंदुकीतून गोळ्या झडू लागल्या. दिवसभरात पंचवीस रझाकार मारले गेले फक्त संभाजी टोळ हा तरूण जखमी झाला.दुसऱ्या दिवशी शनिवार.आता सशस्त्र पोलीस येऊन पोहचले त्यांनी पद्धतशीर गढीला वेढण्यास सुरुवात केली.शनिवारी दिवसभर गढीवरील जवानांनी पोलिसांशी लढा दिला.अनेक पोलीसांचा खातमा केला पण मर्यादित असलेला दारुगोळा संपला.शेकडो लोकांनी गढीत आश्रय घेतल्यामुळे अन्न संपून गेले. आता गढीतील लोकांना सुरक्षित बाहेर काढणे आवश्यक होते.त्यासाठी एक युक्ती योजिली गेली.गढीच्या दाराच्या वरच्या बाजूला गोंधळ माजवला गेला व मागच्या बाजूला न्हाणीच्या नालीचे तोंड मोठे करून बायका,मुलांना बाहेर काढले गेले.गढीचे दार उघडून आपणही बाहेर पडले.पण पळणाऱ्या ३० लोकांना पकडण्या त आले.या लोकांना अप्पा नाईक कौन है असे विचारले तेव्हा मीच अप्पा नाईक आहे असे बाणेदार उत्तर प्रत्येकांनी दिले. संतापलेल्या अधिकाऱ्यांनी सर्वाना रांगेत थांबवून गोळ्या घातल्या.शेवटी एका वाडयाचा आश्रय घेऊन लढणारे अप्पा साहेब व त्यांचे साथीदार कामी आले अशाप्रकारे कल्हाळीच्या ३६ वीर या घटनेत हुतात्मा झाले. पण या घटनेचे कुठलेही नोंद इतिहासाने घेतली नाही.
Post a Comment