वंदे मातरम – विद्यार्थी आंदोलन

                               वंदे मातरम – विद्यार्थी आंदोलन
 
हैदराबाद मुक्तिसंग्रामात १९३८ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिकाराचे वर्ष ठरले.हैदराबाद संस्थानात उस्मानिया विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ होते.वरंगल, गुलबर्गा,औरंगाबाद येथे इंटर मिजीएट कॉलेज होती आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी एकेक सरकारी हायस्कूल होते.उच्च शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नव्हता.औरंगाबाद येथील कॉलेजमध्ये राष्ट्रभक्त तरुणांची संख्या मोठी होती.येथे गोविंदभाई श्रॉफ,वि.गो.कर्वे गुरुजी यांच्या मुळे तरुणांमध्ये मोठया प्रमाणत जागृती निर्माण झाली होती.मात्र सरकारविरोधी कारवायांची गंभीर दखल घेत गोविंदभाई श्रॉफ यांना निजामी शासनाने नोव्हेंबर १९३८ मध्ये काढून टाकले.दुसऱ्या दिवशी ही बातमी समजल्यानंतर विद्यार्थी अस्वस्थ झाले.

उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी गेल्या चार महिन्यापासून वंदेमातरम् प्रार्थना म्हणून म्हणत असतात हे समजल्यानंतर त्यांनीही १४ नोव्हेंबर पासून वंदेमातरम् म्हणण्यास सुरुवात केली. प्राचार्य सय्यद मोहियोद्दीन यांनी वस्तीगृहात येऊन  मुलांना वंदेमातरम् ला परवानगी नाकारली मग मुलांनी अन्न सत्याग्रह सुरु केला. पालकांच्या मदतीने प्राचार्यांनी मुलांची समजूत काढली.शिक्षणमंत्री मेहंदी नवाजगंज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही बंदी कायम केली गेली.  विद्यार्थ्यांनी या बंदीच्या विरोधात संप सुरु केला. हळूहळू या चळवळीचे लोण हैदराबाद, गुलबर्गा ,नांदेड ,परभणी ,बिदर ,वरंगल, महबुबनगर या ठिकाणी पण पसरले.तेथील विद्यार्थ्यांनी पण मोठया प्रमाणात  वंदे मातरम चळवळ सुरु केली.आता विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या काढून वंदे मातरमचा जयघोष सुरु केला.प्रचंड प्रमाणात युवक निजामशाही विरुद्ध एकवटू लागले.उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शेरवानी व पायजमा हा गणवेश होता. विद्यार्थ्यांनी हा गणवेश नाकारला .शासनाने हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी दडपशाही सुरु केली.अनेक  विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून  काढून टाकले.त्यांच्या शिक्षणाचा  प्रश्न निर्माण झाला. शेवटी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी.जे.केदार यांनी या १२००  विद्यार्थ्यांना  प्रवेश दिला.गोविंदभाई श्रॉफ, अच्युतराव देशपांडे ,नरेंद्र दत्त , पी.व्ही.नरसिंहराव,कर्वे गुरुजी, आ.कृ.वाघमारे, स.कृ. वैशंपायन यांनी या लढयाचे नेतृत्व केले.
                                                      भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                             सहशिक्षक , ज्ञानेश्वर  विद्यालय, शाहू चौक,लातूर  
                                    (सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) मो.७५८८८७५६९९  

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.