‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’


                                 ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’

 हैदराबाद संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व भारतात विलीन होण्यासाठी खूप यातना सहन कराव्या लागल्या, निकराचे  प्रयत्न करावे लागले याचे कारण निजामाचे एकतंत्री शासन हे होते पण त्यांच्या सोबतीने इत्तेहादुल मुस्लिमीन या जातीयवादी संघटनेचा सामना संस्थानातील जनतेला करावा लागला.
हैदराबाद संस्थानात  मुक्तीसंग्रामातील सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या आशीर्वादाने संस्थानात १९२८  साली  या संघटनेची स्थापना हैदराबादमध्ये झाली.या संघटनेची पहिली सभा मौलवी महमूद नवाज खानसाहेब यांच्या तौहीद मंजिल या निवासस्थानी झाली, ही सभा मौलाना हाजी  फत्तेउल्ला  अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी या संघटनेचे नाव ‘इत्तेहादे बैनुल मुस्लिमीन’ असे होते पण नंतर दुसऱ्या सभेच्या वेळी या संघटनेचे नाव बदलून ‘मजलिसे  इत्तेहादुल मुस्लिमीन’ असे करण्यात आले.सुरुवातीस ही संघटना पूर्णपणे धार्मिक स्वरुपाची होती. पण नवाब बहादूर यारजंग यांनी या संघटनेचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर मात्र या संघटनेने राजकीय  स्वरूप धारण केले.यांचे वक्तृत्व अमोघ होते त्यांनी प्रक्षोभक भाषणे करून सर्वसामान्य मुस्लीम लोकांना या संघटनेत सामील करून घेण्यास सुरुवात केली.पुढे यांचे निधन झाले. ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’अंतर्गत स्थापन झालेल्या रझाकार या संघटनेची खरी वाढ कासिम रझवी यांच्या आगमनानंतर झाली. खुद निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचारास सुरुवात केली.या संघटनेची सदस्य संख्या पुढे चालून दीड लाखापर्यंत झाली.रझाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानात ५२ केंद्रे होती, प्रत्येक रझाकाराला दरमहा साठ रुपये पगार मिळे.कासीम रझवी हा लातूरचा साधा वकील होता मात्र त्याचे नेतृत्व अफाट होते. तो दिल्लीच्या लाल किल्यावर निजामाचा झेंडा फडकविणार अशी वल्गना करीत असे. कासीम रझवीच्या नेतृत्वाखालील   रझाकार संघटनेने  संस्थानातील हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचाराचे सत्र सुरु केले हजारो लोकांच्या कत्तली केल्या ,अनेक गावे जाळली खून,बलात्कार, लुटालूट यांची परिसीमा गाठली.

भारत सरकारने हैदराबादच्या परिस्थितीबाबत एक श्वेत पत्रिका प्रकाशित केली होती त्यात दिलेल्या आकडेवारी नुसार संस्थानातील १४४१ खेडयातून १७ कोटी ८५ हजार ३८७ रुपयांची लुट करण्यात आली, ८७८८ घरे जाळण्यात आली, ९२१ खून पडले व हजारावर बलात्काराची प्रकरणे झाली.रझाकारांच्या या क्रूर कृत्यांची आकडेवारी पाहिली म्हणजे कोणाच्याही अंगावर शहारा येईल. 

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.