सातवे निजाम मीर उस्मान अली खान



                        सातवे निजाम मीर उस्मान                                      अली खान

              हैदराबाद संस्थानाचे  अधिपती सातवे निजाम मीर उस्मान अली खान इ.स.१९११ महत्त्व साली सहावे निजाम मीर  मेहबूब अली खान यांच्या निधनानंतर   गादीवर आले.१९११ ते १९४८ असा दीर्घ कालावधी त्यांना लाभला. उस्मान अलीला दोन गोष्टीचे जबरदस्त आकर्षण होते एक पैसा आणि दुसरे संपती. अत्यंत महत्त्वकाक्षी ,जिद्दी,कमालीचे हट्टी असे त्यांचे वर्णन केले जाते.या कुशाग्र बुद्धिमत्ता,हुशार,चतुर,मुत्सदी असे बहुढंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना पैशाचा मोह अनावर असला तरी मीर उस्मान अली खान इतर संस्थानिकांच्या तुलनेत अनेक बाबतीत वेगळे होते.अत्यंत साध राहणीमान  ,निर्व्यसनी , विलास आणि बडेजाव यापासून दूर राहणारे असेच त्यांची ओळख आहे.एक अफू सोडली तर त्यांना कोणतेच व्यसन नव्हते.खानपान ,कपडेलत्ते साधे असत.मात्र ते कमालीचे धर्मश्रद्ध होते.पाच वेळा नियमितपणे नमाज पढणारे व सतत कुराणाचे वाचन करणारे,शेकडो नोकरचाकर असताना नमाजाच्या वेळी स्वतः चटई अंथरणारे  अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या चरित्रकारांनी रंगवली आहे.
सातव्या निजामाचे नाव नवाब उस्मान अली खां असे होते, भारतातील सर्वात विलक्षण व विक्षिप्त संस्थानिक म्हणून सातवा निजाम ओळखला जात असे ,रुस्तुम-ई दौरान ,अरस्तू- ए - जमाल, वलमा मलिक , असिफजहा,अशा अनेक पदव्या तो लावत असे. हा इतर निजामाच्या तुलनेत काही बाबतीत वेगळा होता . इतर निजाम हे अन्य संस्थानिकाप्रमाणे ‘हिज हायनेस’ होते पण उस्मानअली एकटाच ‘हिज एक्झालटेड  हायनेस’ होता.हा ब्रिटीशांचा ‘फेथफुल अलाय’ होता कारण पहिले महायुद्ध चालू असताना याने ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय केले होते. हा महत्वकांक्षी, हुशार तर होताच शिवाय राजकीय डावपेच करण्यात व कटकारस्थाने रचण्यात पुरेसा चतुर होता.  
      तसे पाहिले तर  निजाम मीर उस्मान अली खान हे योगायोगानेच गादीवर आले होते. महबूब अलीच्या अनेक बायकांपैकी जोहरा बेगम पासून  मीर उस्मान अली झालेला होता त्यांच्या जनान खान्यात येण्यापूर्वी ती हिंदू होती.महबूब अली ला औरस पुत्र अनेक दिवस झाला नाही त्यामुळे पंतप्रधान महाराजा किशन प्रसाद व ब्रिटीश राज्यकर्ते यांच्या संगनमताने  मीर उस्मान अलीला युवराजपद देण्यात आले.पुढे कायदेशीर बेगमांकडून मुलगे झाले परंतु आता वेळ निघून गेली होती व उस्मान अली गादीचा वारस ठरला होता. महबूब अलींना ही तो गादीवर यावा असे वाटत नव्हते पण त्यांचा नाविलाज झाला.त्यामुळे एवढया मोठया बादशाही परिवारात ते आणि त्यांची माता असे दोघेच परस्परांना जीव लावणारे होते.त्यामुळे ते एकाकी , इतरांपासून सतत सावध असणारे व जिद्दी बनले.
निजाम मीर उस्मान अली खान हे आपल्या संपत्ती साठीही ओळखले जातात.अमेरिकेच्या फोर्ड नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून यांना ओळखले जाते.यांच्याकडे सुमारे एक हजार कोटीची मालमत्ता होती मात्र स्वतःवर ते आठवड्याला फक्त वीस रुपये खर्च करीत असत.हिरे ,माणिके ,जडजवाहीर , मोती यांनी किंग कोठीच्या अनेक इमारती खच्चून भरलेल्या होत्या असे असूनही ते आपला खर्च वरचेवर येणाऱ्या पैशातून भागवत असत.
डी.एफ.कारका यांनी दिलेल्या माहितीनुसार निजाम मीर उस्मान अली खान यांच्या इस्लामी धर्माज्ञेप्रमाणे निजामाच्या कायदेशीर चार बेगमा होत्या उस्मानअलीच्या जनान खान्यात ४२ बेगमा होत्या .५० मुले ,४६ नातवंडे ,१६ सुना  आणि ४४ खानाजाद (दासीपुत्र )आणि एक हजार नोकर होते.
निजाम गादीवर आल्यापासून हैदराबाद ला स्वतंत्र देश बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होता. त्याने आपल्या  महत्वकांक्षेच्या पूर्ततेसाठी मुस्लीम धर्माचा व मुस्लीम जातीयतेचा आधार घेतला. उस्मान अलीने १९२१ मध्ये एक आदेश काढून सभा संमेलने,बैठकी- प्रवचने, मिरवणुका यावर सक्त बंधने लादली.व्यायाम शाळा,आखाडे,खाजगी शाळा, ग्रंथालये परवानगी वाचून काढू नयेत अशी सक्ती करण्यात आली.गश्ती निशाण ५२ आणि ५३ या नावाने हे दोन आदेश हैदराबाद संस्थानात ओळखले जात होते.
  यावेळी प्रशासन यंत्रणा आधुनिक पायावर उभी करण्यासाठी सर्व तालुके, जिल्हे व्यवस्थित आखले. सर्व विषयांची दफ्तरे तयार केली शिक्षकापासून सुभेदारापर्यंत सर्वांची पगार ठरवून दिली. खजिना व्यवस्थित केला. चार युरोपियन मंत्री आपल्या मंत्रिमंडळात मागवून घतले.युरोपियांच्या आधुनिक ज्ञानाचा फायदा आपणास झाला पाहिजे ही काळजी निजामाने नेहमी घेतली.निजामाने सत्ता हाती घेतली तेव्हा संस्थानात शंभर प्राथमिक शाळा होत्या १९४० साली प्राथमिक शाळांची संख्या चार हजार झाली.१९१८ ला उस्मानिया विद्यापीठ स्थापन केले या विद्यापीठातून काही काळ का असेना मेडिकल व इंजिनियरिंगचे शिक्षण उर्दू भाषेतून दिले जात होते.निजामाने गुणवत्तापूर्ण सनदी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी I C S परीक्षेच्या धर्तीवर H.C.S.नावाची हैदराबाद सनदी नोकरशाही सुरु केली. तुर्कस्थान, सौदी अरेबिया,इराण या देशांशी संबंध प्रस्थापित केले.निजामाने सातत्याने हैदराबाद स्वतंत्र व्हायला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले.स्वत:ची रेल्वे , तारखाते ,पोस्ट खाते सुरु केले. 
१५ ऑगस्ट १९४७ पर्यंत निजाम भारतात सामील झाला नाही नंतर वाटाघाटी सुरु केल्या पुढे वाटाघाटी लांबवीत भारताशी जैसे थे करार केला.हैदराबादचा प्रश्न युनोत नेण्याची त्याची तयारी होती.पोलीस , रझाकार व पोस्तोकोमयांच्या मदतीने संस्थानातील जन आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.शेवटी भारत सरकारला संस्थानात लष्कर पाठवावे लागले व  १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला .
 संदर्भ ग्रंथ
१ अनंत भालेराव ,हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम व मराठवाडा,१९८७,१९
२ नरहर कुरुंदकर -हैदराबाद  विमोचन आणि विसर्जन, १४१

३ नरेन्द्र चपळगावकर - संस्थानी माणसं ,  

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.