हुतात्मा गोविंदराव पानसरे
हुतात्मा गोविंदराव पानसरे

हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्टेट कॉंग्रेसचे पहिले
हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे वडील विनायकराव हे मुळचे पुण्याचे रहिवासी होते. पण
पुढे ते शालीबंडी हैदराबाद येथे राहावयास आले.तेथे ते वैद्यकी व्यवसाय करीत.गोविंदरावांच्या
आईचे नाव यमुनाबाई.गोविंदरावांचे मामा शंकरराव हे स्टेशनमास्तर होते. शंकराराव बदनापूर
(जि.औरंगाबाद ) येथे स्टेशनमास्तर असताना
त्यांच्या घरी गोविंदरावांचा जन्म १५ मे १९१३ला (वार गुरुवार ) बदनापूर येथे झाला.गोविंदराव
अवघे सहा महिन्याचे असताना त्यांचे आई वडील वारले.केवळ सहा महिन्याचे बाळ पोरके
झाले.अशा अनाथ गोविंद रावांचे पालन,पोषण ,शिक्षण त्यांचे मामा शंकरराव यांनी केले.त्यांचे
मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण हैदराबाद च्या विवेक वर्धीनीत झाले नंतर इंटर साठी ते
निजाम कॉलेज मध्ये दाखल झाले पण त्यांनी पुढे शिक्षण सोडून दिले .त्यांचे मामा
शंकरराव यांची धर्माबाद येथे स्टेशन मास्तर म्हणून बदली झाली होती व ते तिथेच स्थायिक झाले होते.गोविंदराव
त्यांच्याकडे येऊन राहिले व सार्वजनिक काम करू लागले.हरिपूर कॉंग्रेस अधिवेशनात
स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले.हुतात्मा
गोविंदराव पानसरे हे अत्यंत बुद्धिमान,विचारी आणि चिकित्सक होते ते स्वाभिमानी ,स्वावलंबी
आणि प्रखर राष्ट्राभिमानी होते त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व व संघटन कौशल्य होते.जीवनभर
विवाह व नोकरी न करण्याचे ठरवून त्यांनी जनसेवेचे व्रत घेतले.त्यांचा स्वभावमोकळा ,
प्रेमळ पण करारी व निर्भीड होता ते गांधीवादाचे पक्के अनुयायी होते.
धर्मवत वाचनालय ,खादी भांडार व पुढे चालून महाराष्ट्र परिषद
व स्टेट कांग्रेस च्या माध्यमातून व्यापक स्वरूपाचे कार्य केले.धर्माबादच्या भोवती
चार तालुक्यांच्या बहुतेक सर्व खेडोपाडी पायी दौरे करून कॉंग्रेसचे व खादीचे प्रचार
कार्य त्यांनी केले.त्यामुळे सहा हजार प्राथमिक सभासद व तीनशे खादीधारी त्यांचे
अनुयायी बनले होते.
गोविंदराव पानसरे हे स्टेट कॉंग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते
व मुधोळ तालुक्याचे संघटक होते.या भागात गोविंदराव करत असलेले कार्य रझाकारांना
आवडणे शक्यच नव्हते.गोविंदरावांनी कोंडलवाडी येथे केलेले भाषण सरकारला आक्षेपार्ह
वाटले.त्यामुळे त्यांना अटक झाली.जामीन मिळाला नाही.शेवटी २१ ऑक्टोबर ला त्यांना जामीन
दिला गेला.सायंकाळी ते पुंडलिकराव पाटील व इतर कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीतून
बिलोलीला जात असताना रझाकारांनी अर्जापूर
जवळ गाठून त्यांचा खून केला गेला. गोविंदराव पानसरे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील
स्टेट कॉंग्रेसचे पहिले हुतात्मा होत.गांधीवादी गोविंदरावांच्या बलिदानाने या
भागातील जनता फार मोठया प्रमाणात मुक्ती लढयात सामील झाली.नांदेड जिल्ह्यातून अनेक
कार्यकर्ते निर्भीडपणे निजामी राजवटीला आव्हान देऊ लागले, हा निर्भयतेचा वसा येथील
जनतेला गोविंदराव पानसरे यांनी दिला होता हे मात्र निश्चित.
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
सहशिक्षक , ज्ञानेश्वर विद्यालय,
शाहू चौक,लातूर
(सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) मो.७५८८८७५६९९
Post a Comment