हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ राष्ट्रीय शाळा – हिप्परगे
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ
राष्ट्रीय शाळा – हिप्परगे
भारतीय स्वातंत्र्य
चळवळी मध्ये १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना मांडण्यात आली.त्यानंतर देशात
अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षणाचे प्रयोग झाले.निजामी राजवटीत तर दुहेरी पारतंत्र्य
होते.मातृभाषेत शिक्षण घेण्याच्या सुविधा तर नव्हत्याच पण परवानगी पण दिली जात
नसे.अशा काळात हिप्परगा या गावात राष्ट्रीय शिक्षणाचा एक प्रयोग झाला. व्यंकटराव माधवराव
देशमुख व अनंतराव गोविंदराव कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्हयातील हिप्परगा (ता.लोहारा
तत्कालीन ता.तुळजापूर) येथे १९२१ ला राष्ट्रीय शाळा स्थापन केली. या शाळेने खऱ्या अर्थाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाला उर्जा
व कार्यकत्यांची फळी पुरवली.हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद
तीर्थ या शाळेत जवळपास सहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य करत होते.येथेच स्वामीजींनी १४
जानेवारी १९३२ रोजी संन्यास घेतला.तेव्हापासून
त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ असे झाले.(अर्थात स्वामीजी शाळेच्या स्थापनेनंतर जवळपास आठ वर्षांनी या शाळेत आले होते.आणि
या संस्थेच्या संस्थापकांपैकी ते नव्हते हे लक्षात घ्यावे लागेल)
अत्यंत बुद्धिमान असलेले व्यंकटराव
व्यवसायाने वकील होते.ते लोहारा येथे वकिली करीत.ते लोकमान्य टिळकांचे भक्त होते
त्यामुळेच पुढे ते स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षिले जाणे साहजिक होते.ब्रिटीश
भारतापेक्षा हैदराबाद संस्थानातील परिस्थिती वेगळी होती. अशा प्रतिकूल परिस्थिती
मध्ये या दोन बंधुनी १९२१ मध्ये हिप्परगा या छोट्याशा गावी राष्ट्रीय शाळा स्थापन
केली.(व्यंकटराव व अनंतराव हे दोघे सख्खे भाऊ होते.पण पुढे दत्तक गेल्यामुळे
त्यांचे आडनाव कुलकर्णी झाले.) व्यंकटराव व अनंतराव या दोघांनी वेळ प्रसंगी आपले
सर्वस्व या शाळेसाठी समर्पित करून शाळा चालवली.अनेक चांगले शिक्षक या शाळेला लाभले
यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ .बाबासाहेब परांजपे,एस आर देशपांडे,आचार्य गणेश
धोंडो देशपांडे,राघवेंद्रराव दिवाण, ह.रा.महाजनी, राळेरासकर , भावे गुरुजी,असे
अनेक तपस्वी शिक्षक या शाळेला लाभले.विद्यार्थी संख्या २१० पर्यंत पोहोचली होती. “या
संस्थेचे कार्य म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा श्री गणेशाच होय.” असे
उदगार मा.यशवंतराव चव्हाण यांनी काढले होते.या शाळेच्या वार्षिकोत्सवास न.चिं. केळकर,वि.स.खांडेकर,वा.म.जोशी,
कवी यशवंत ,चित्रकार दिनानाथ दलाल आदी मंडळी उपस्थित होती.
‘हिप्परग्याच्या शाळेचा इतिहास हा
अगदी लहान माणसेही ध्येयवादाने प्रेरित झाली, एखादया कालखंडातील मंतरलेल्या वातावरणाने त्यांना भारून
टाकले म्हणजे कशी कर्तृत्ववान ठरू शकतात,नवा समाज निर्माण करण्याचे स्वप्न त्यांना
कसे पडू शकते ,
आपल्या व्यक्तिगत स्वार्थाचा विचार त्यांच्या मनातून लोप पावून समष्टीच्या जीवनाशी ,
तिच्या भवितव्याशी ते कसे समरूप होतात याचा इतिहास आहे...............माळरानावर
मुलांच्यावर देशभक्तीचे ,स्वातंत्र्याचे ,समतेचे संस्कार करणारे विद्यालय उभे
राहते. अनेक गुणवान व कर्तृत्ववान माणसे शिक्षक म्हणून तिथे जमा होतात.ह.रा.महाजनी
पासून बाबासाहेब परांजपे पर्यंत अनेक बुद्धिवान व्यक्ती शिक्षकाचा पेशा स्वीकारतात
. मराठवाडयातील अनेक जाणते पालक आपल्या मुलांना तिथे पाठवतात.आपली जातपात विसरून
मुले एका छपराखाली नांदतात आणि गरज पडली तेव्हा याच शाळेचे शिक्षक
स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रत्यक्ष नेते –कार्यकर्ते म्हणून उतरतात.’अशी या शाळेची
कथा न्या.नरेन्द्र चपळगावकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे
आद्यपीठ राष्ट्रीय शाळा - हिप्परगे या भगवानराव व्यंकटराव देशमुख लिखित शाळेच्या
आठवणींच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे .या शाळेविषयी मुळातूनच वाचावे असे
हे पुस्तक आहे.
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
सहशिक्षक , ज्ञानेश्वर विद्यालय,
शाहू चौक,लातूर
(सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) मो.७५८८८७५६९९
Post a Comment