हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि स्वामी रामानंद तीर्थ

          १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्यलढयाची परिपूर्ती अजून झाली नव्हती कारण काही संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास विरोध दर्शविला. पण तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुत्सदीपणे ५६५ पैकी बहुतांश संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले तरीही काश्मिर ,जुनागड व हैदराबादच्या संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वातंत्र्य देण्यास व भारतात विलीन होण्यास नकार दिला ,आणि स्वातंत्र्य राहण्याचे मनसुबे रचू लागले, त्यातील हैदराबाद हे संस्थान निजामाच्या पोलादी जोखडाखाली होते , येथे आसफिया घराण्याची सत्ता १७२४ ला स्थापन झाली होती.या घराण्यातील राजे ‘निजाम’ या त्यांना मिळालेल्या पदवी वरून ओळखले जात.

          हैदराबाद हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंखेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे संस्थान होते. या संस्थानाचा विस्तार १६ जिल्हयात पसरला होता. यापैकी ८ जिल्हे तेलगु भाषिक, ३ जिल्हे कन्नड भाषिक तर ५ जिल्हे मराठी भाषिक म्हणजे आपल्या मराठवाडयातील होते. संस्थानाची लोकसंख्या १ कोटी ६३ लाख ३८ हजार ५३४ होती, तर क्षेत्रफ़ळ ८२३१३ चौ.मैल इतके होते .वार्षिक उत्पन्न २६ कोटी रुपयाचे होते .या संस्थानातील ८५ % प्रजा हिंदू होती तर मुस्लीम ११ % होते इतर धर्माचे ४ % लोक होते . संस्थानिक मात्र मुस्लिम होता.सरकारी नौकरी मध्ये मुस्लिमांचे प्रमाण ८० % हिंदूचे २० % असे होते. संस्थानात तेलगू,मराठी,कन्नड व उर्दू या प्रमुख भाषा होत्या मात्र १८८४ पासून उर्दूला राज्य भाषेचा दर्जा होता.सर्व राज्यकारभार उर्दू मध्येच होई.अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांना नोकऱ्यांत प्राधान्य होते.

          ११ जून १९४७ रोजी निजामाने आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही तर स्वतंत्र राहणार अशी घोषणा केली .पुढे २७ नोव्हेंबर १९४७ ला भारत सरकारने निजामाशी जैसे थे करार केला .सातव्या निजामाचे नाव नवाब उस्मान अली खां असे होते, भारतातील सर्वात विलक्षण व विक्षिप्त संस्थानिक म्हणून सातवा निजाम ओळखला जात असे,अमेरिकेतील फोर्ड नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.यास पैसा व सत्ता या दोन गोष्टीचे जबरदस्त आकर्षण होते.हा महत्वकांक्षी, हुशार तर होताच शिवाय राजकीय डावपेच करण्यात व कटकारस्थाने रचण्यात पुरेसा चतुर होता.उस्मान अलीने १९२१ मध्ये एक आदेश काढून सभा संमेलने,बैठका-प्रवचने, मिरवणुका यावर सक्त बंधने लादली.व्यायाम शाळा, आखाडे, खाजगी शाळा, ग्रंथालये परवानगी वाचून काढू नयेत अशी सक्ती करण्यात आली.गश्ती निशाण ५२ आणि ५३ या नावाने हे दोन आदेश हैदराबाद संस्थानात ओळखले जात होते.आपले राज्य हे मुस्लीम संस्कृती व उर्दू भाषा यांचे केंद्र असले पाहिजे या आग्रहापोटी सर्वसामान्य जनतेचा धर्म ,संस्कृतीआणि भाषा यांना दाबून टाकण्यात आले होते.छापखाना किंवा वृतपत्र सुरु करण्याची परवानगी हैदराबादला जाऊन थेट मंत्रिमंडळाकडून मिळवावी लागत असे व सहजासहजी ती मिळत नसे.

          संस्थानात आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी निजामाच्या आशीर्वादाने ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना १९२८ साली झाली.या संघटनेचे खाकसार हे स्वयंसेवक दल होते याचा अध्यक्ष नवाब बहादूर यारजंग हा होता.हा पट्टीचा वक्ता होता.या संघटनेने संपूर्ण संस्थानामध्ये मुसलमानाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पुढे चालून लातूरचा कासीम रझवी या संघटनेच्या अध्यक्षपदावर आला याने खाकसारच्या धर्तीवर ‘रझाकार’ या संघटना बनवली.खुद निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचारास सुरुवात केली.या संघटनेची सदस्य संख्या पुढे चालून दीड लाखापर्यंत झाली.रझाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानात ५२ केंद्रे होती, प्रत्येक रझाकाराला दरमहा साठ रुपये पगार मिळत असे. कासीम रझवीच्या नेतृत्वाखालील रझाकार संघटनेच्या मदतीने संस्थानातील हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचाराचे सत्र सुरु केले, हजारो लोकांच्या कत्तली केल्या,अनेक गावे जाळली खून,बलात्कार, लुटालूट यांची परिसीमा गाठली. कासीम रझवी हा लातूरचा साधा वकील होता मात्र त्याचे नेतृत्व अफाट होते.तो दिल्लीच्या लाल किल्यावर निजामाचा झेंडा फडकविणार अशी वल्गना करीत असे.

          हैदराबाद संस्थानात निजामाच्या अन्यायाविरुद्ध प्रथम आवाज उठविण्याचे काम आर्य समाजाने केले. आर्य समाजामुळे मुस्लीम धर्मांतर मोहिमेस आळा बसला. हैदराबाद संस्थानात इस्लाम धर्मीयांखेरीज कोणालाच विशेषता हिंदुना कसलेच धर्मस्वातंत्र्य नव्हते.आर्य समाजावर तर सरकारची वक्रदृष्टी होतीच. मराठवाडयात आर्य समाजाची पहिली शाखा धारूर (जि.बीड) येथे नंतर निलंगा(जि.बिदर ) येथे आर्य समाज स्थापन झाला. २३ फेबुवारी १९३७ ला गुंजोटी मजलिसे इत्तेहादुल मुसलमीनच्या गुंडांनी वेदप्रकाश यांची हत्या केली. वेदप्रकाश हुतात्मा झाले, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील वेदप्रकाश हे पहिले हुतात्मा,ही बातमी सर्वदूर पोहचली,सर्वत्र हाहाकार माजला.

          हैदराबादचा स्वातंत्र्यालढा हा भारतीय स्वातंत्र्य लढयाचाच भाग होता.येथील प्रजेला दुहेरी पारतंत्र्यात राहावे लागत होते.राजकीय पारतंत्र्य तर होतेच पण त्या बरोबर जनतेच्या शिरावर सांस्कृतिक,भाषिक आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते.ब्रिटीशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वातंत्राचा जो लढा येथे चालवला गेला त्याचे नेतृत्व कर्मयोगी संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.वास्तविक पाहता स्वामीजी हे हैदराबाद संस्थानाबाहेरील होते.स्वामीजींचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्हयातील सिंदगी या गावी 3 ऑक्टोबर १९०३ रोजी झाला.हे गाव संस्थानाबाहेर होते.पण सरकारी कागद पत्रात स्वामीजींचे जन्मगाव गुलबर्गा जिल्ह्यातील चिनमेल्ली असे नोंदविले आहे.(कारण हैदराबाद संस्थानात संस्थानाबाहेरील व्यक्तीस ‘गैरमुलकी’ ठरवून हद्दपार केले जाई.)

          स्वामीजींचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर असे होते.स्वामीजींच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. सिंदगीच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सोलापूरला आले.येथे नॉर्थकोट हायस्कूल ही ब्रिटीशांची सरकारी इंग्रजी शाळा होती.येथील मुखाध्यापक व शिक्षक इंग्रजनिष्ठ होते.घरून आर्थिक सहाय्य न मिळाल्याने व्यंकटेशने

शाळेच्याच वसतिगृहात वाढप्याचे काम करून निवास व भोजनाची सोय करून घेतली.येथेच नवनवे मित्र मिळाले,पुस्तकांचा सहवास लाभला. हा पहिल्या महायुद्धाचा काळ होता आणि लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली देशभर ब्रिटीश विरोधी आंदोलन चालू होते.शाळेतील शिक्षक हिंदी मुलांच्या मनात इंग्रजनिष्ठा निर्माण करण्याचा खटाटोप करीत होते.या काळी वाढत्या वयाबरोबरच व्यंकटेशची प्रस्थापित सत्तेविरुद्ध बंडखोरी वाढत होती.लहान लहान गोष्टींतून ती प्रगट होत असे.मुलांना युनियन जॅकचे छोटे झेंडे व त्याबरोबर खाऊचे पुडे दिले गेले.व्यंकटेश सारख्या उगवत्या बंडखोरांनी युनियन जॅक फेकून देणाऱ्या विध्यार्थांची संख्या वाढविली.दुसऱ्या दिवशी अशा सर्व विध्यार्थ्यांना इंग्रजधार्जिण्या मुख्याध्यापकाच्या छडया खाव्या लागल्या. या काळातच सोलापूरला लोकमान्य टिळक येणार होते,लहानगा व्यंकटेश व त्यांच्या बालमित्रांना लोकमान्य टिळकांच्या सभेस जावावयाचे होते पण शाळेत त्या वेळी परीक्षा सुरु होती.मुलांना सभेस जाता येऊ नये म्हणून मुद्दाम दुपारी परीक्षा ठेवली तेव्हा व्यंकटेश व त्यांच्या मित्रांनी घाईघाईने चांगले येणारे प्रश्न सोडविले व सभेस उपस्थित झाले.

          उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे व्यंकटराव देशमुख व अनंतराव कुलकर्णी यांनी १९२१ मध्ये राष्ट्रीय शाळा स्थापन केली होती.या शाळेने खऱ्या अर्थाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाला उर्जा व कार्यकत्यांची फळी पुरवली.हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ या शाळेत जवळपास सहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य करत होते.येथेच स्वामीजींनी १४ जानेवारी १९३२ रोजी संन्यास घेतला.तेव्हापासून त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ असे झाले .पुढे अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेत काम करत असताना स्वामीजींनी पूर्ण वेळ राजकारणात यावे ,असा आग्रह आनंद कृष्ण वाघमारे व इतर सहकाऱ्यांनी धरला .यावेळी लातूरला महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन चालू होते. संस्थानात कायदेभंगाची चळवळ करण्यासाठी परिस्थिती परिपक्व झाली आहे या निर्णयाप्रत स्वामीजी आले होते.या अधिवेशनातच स्वामीजींनी आपण पूर्णवेळ राजकीय कामासाठी स्वतः ला वाहून घेत आहोत, असे आपल्या सहकारी मित्रांना सांगितले.

          स्वामीजींच्या नेतृत्वाखालीच १९३८ ला हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना झाली मग स्वामीजींनी मागे वळून पहिलेच नाही. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते स्वामीजींना लाभले,स्वामीजींनीही अत्यंत संयमाने या लढयाचे नेतृत्व केले. वैयक्तिक सत्याग्रह केले,अनेकवेळा तुरुंगवास भोगला.हैदराबाद मधील चंचलगुडा,निजामाबाद ,गुलबर्गा अशा अनेक तुरुंगात स्वामीजींना ठेवण्यात आले. स्वामीजींनी उभारलेल्या लढयात जनता मोठया संख्येने सहभागी झाली. १९३८ ते १९४८ या काळात पन्नास हजार लोकांचा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग होता,१९४७-१९४८ या काळात वीस हजार लोक तुरुंगात होते.तीस हजार कार्यकर्ते भूमिगत कार्य करीत होते.

          या लढयात स्वामी रामानंद तीर्थ ,गोविंदभाई श्रॉफ ,बाबासाहेब परांजपे ,दिगंबरराव बिंदू , आ.कृ.वाघमारे, अनंत भालेराव, नारायणराव चव्हाण, स.कृ.वैशपायन, पुरुषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी,देवीसिंह चौहान, शामराव बोधनकर,श्रीनिवासराव बोरीकर, मुकुंदराव पेडगावकर,राघवेंद्र दिवाण , फुलचंद गांधी ,नागनाथ परांजपे, माणिकचंद पहाडे , श्रीधर वामन नाईक इत्यादींनी मौलिक योगदान दिलेहैदराबाद मध्ये लढल्या गेलेल्या ऐतिहासिक लढयात वेदप्रकाश, धर्मप्रकाश, श्यामलाल,गोविंदराव पानसरे,बहिर्जी शिंदे,श्रीधर वर्तक,जनार्धन मामा, शोएब उल्ला खान अशा अनेकांनी हौतात्म्य पत्करले निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते.पण निजाम दाद देत नव्हता .७ नोव्हेंबर १९४७ रोजी भारत सरकारने निजामासोबत जैसे थे करार केला.पण निजाम पाकिस्तानात सामील होण्याचा प्रयत्न करू लागला.निजामाने भारतीय चलन संस्थानात बेकायदा ठरवले शिवाय युनो मध्ये हा प्रश्न घेवून जाण्याचा प्रयत्न करू लागला . अखेरीस भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरु केली या कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे म्हटले जाते . १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला व निजामाच्या पोलादी जोखडातून हैदराबाद संस्थान मुक्त झाले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला.
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
सहशिक्षक , ज्ञानेश्वर विद्यालय, शाहू चौक,लातूर
(सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) 
मो.७५८८८७५६९९
umatebhausaheb@gmail.com

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.