हैदराबाद मुक्तीसंग्राम व गांधीजी आणि स्वामीजी
स्वामीजींचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर असे होते.स्वामीजींच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. सिंदगीच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सोलापूरला आले.येथे नॉर्थकोट हायस्कूल या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. घरून आर्थिक सहाय्य न मिळाल्याने व्यंकटेशने शाळेच्याच वसतिगृहात वाढप्याचे काम करून निवास व भोजनाची सोय करून घेतली. व्यंकटेशवर गांधीजींचा मोठा प्रभाव होता.गांधीजी एकदा सोलापूरला येणार होते.व्यंकटेश स्टेशनवर त्यांना बघायला गेला. हे लहान मुल प्रचंड गर्दीने कुठल्या कुठे रेटीत नेले पण योगायोगाने गाडी स्टेशनात आली व व्यंकटेशच्या समोरच गांधीजीचा डब्बा थांबला.आपण धन्य झालो या भावनेने व्यंकटेशने गांधीजीचे दर्शन घेतले.गांधीजींनी मुलाचे खांदे धरले ,त्याला उठवले आणि देशासाठी काहीतरी करा असा संदेश दिला.हाच व्यंकटेश पुढे चालून हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाचा नेता झाला आणि गांधीजींच्या आदर्शावर चालत या लढयाचे नेतृत्व केले.
हैदराबाद हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे संस्थान होते.सातवे निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादूर हे येथील संस्थानिक होते. या संस्थानाचा विस्तार १६ जिल्हयात पसरला होता. यापैकी ८ जिल्हे तेलगु भाषिक, ३ जिल्हे कन्नड भाषिक तर ५ जिल्हे मराठी भाषिक म्हणजे आपल्या मराठवाडयातील होते. संस्थानात तेलगू,मराठी,कन्नड ,हिंदी व उर्दू या प्रमुख भाषा होत्या मात्र १८८४ पासून उर्दूला राज्य भाषेचा दर्जा होता. संस्थानात आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी निजामाच्या आशीर्वादाने ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना १९२८ साली झाली.या संघटनेचे खाकसार हे स्वयंसेवक दल होते. पुढे चालून लातूरचा कासीम रझवी या संघटनेच्या अध्यक्षपदावर आला याने खाकसारच्या धर्तीवर ‘रझाकार’ या संघटना बनवली.खुद निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचारास सुरुवात केली. हैदराबादचा संस्थानातील प्रजेला दुहेरी पारतंत्र्यात राहावे लागत होते.राजकीय पारतंत्र्य तर होतेच पण त्या बरोबर जनतेच्या शिरावर सांस्कृतिक,भाषिक आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते.
हैदराबादमधील काँगेसच्या वैयक्तिक सत्याग्रहासाठी गांधीजींनी ज्या पाच जणांची निवड केली त्यात स्वामीजी पहिल्या क्रमांकावर होते.हैदराबाद येथे काशिनाथराव वैद्य यांच्या घरी २९ जून १९३८ रोजी झालेल्या बैठकीत ‘हैदराबाद स्टेट कॉंग्रेस’स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.हैदराबाद स्टेट काँगेसची रीतसर स्थापना करण्यासाठी ९ सप्टेंबर १९३८ रोजी एक सभा बोलावण्यात आली होती.पण निजामाने तत्पूर्वीच या संघटनेला जातीयवादी ठरवून बंदी घातली.गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये या आक्षेपांना स्पष्ट उत्तर दिले, “ज्या संस्थानातील प्रचंड संख्या एकाच धर्मीयांची आहे, तेथे त्या धर्मीयांचा भरणा एखाद्या संस्थेत आहे एवढयाच कारणावरून ती संस्था जातीय कशी ठरते ?” असा सवाल गांधीजींनी उपस्थित केला.पुढे गांधीजींच्या आदेशानुसार स्वामीजींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरु केला.स्वामीजींना अटक होऊन १८ महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली.गांधीजी व स्वामीजीमधील एक महत्वाचे साम्य म्हणजे लोकांना निर्भयपणे लढा लढण्याची प्रेरणा या दोघांनी दिली.गांधीजी प्रमाणेच स्वामीजींनी पण अनेक वेळा तुरुंगवास भोगला.स्वामीजी तुरुंगात असतानाच १४ नोव्हेंबर १९३८ला महाविद्यालयीन विधार्थाचे ‘वंदेमातरम्’ आंदोलन सुरु झाले.तुरुंगातील काही कैद्यांनी पण वंदेमातरम् म्हणण्याचा आपला हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.एका सत्याग्रह्याने बंदीहुकूम मोडून ‘वंदेमातरम्’ सुरु करताच त्यास फटक्यांची शिक्षा फर्मावण्यात आली. प्रत्येक फटक्या बरोबर तो ‘वंदेमातरम्’ची घोषणा देई. बेशुद्ध पडेपर्यंत ‘वंदेमातरम्’चा घोष करणाऱ्या या सत्याग्रह्यास पुढे ‘वंदेमातरम् रामचंद्रराव’या नावानेच ओळखले जाऊ लागले.काही काळाने गांधीजींच्या आदेशानुसारच सत्याग्रह स्थगित करण्यात आला.
स्वामीजींनी हैदराबाद येथे एक बैठक बोलावून विधायक कामासाठी ‘विधायक कार्य समिती’ नियुक्त केली.तालुक्यापर्यंत व काही ठिकाणी अगदी गावापर्यंत कार्यकर्त्यांचे गट तयार करण्यात आले. खादीभांडारे उघडली गेली , कार्यकर्ते खांद्यावर खादी घेऊन खेडोपाडी जाऊ लागले.अस्पृश्योदार ,साक्षरता प्रसार ,राष्ट्रीय उत्सव असे कार्यक्रम सुरु झाले.कृतीशील कार्यकर्त्यांची एक साखळी तयार झाली.याच दरम्यान स्वामीजींचे निष्ठावंत कार्यकर्ते गोविंदभाई श्रॉफ, स.कृ.वैशंपायन,आ. कृ.वाघमारे,डी .एल.पाठक,रतीलाल जरीवाला व सय्यद हबीबुद्दीन यांना अटक करून स्थानबद्ध केले.स्वामीजींना या कृतीने धक्का बसला.
ते सेवाग्रामला गेले, नेहमीप्रमाणे गांधीजींना भेटले.स्वामीजींची अस्वस्थता गांधीजींच्या नजरेतून सुटली नाही.स्वामीजींना गांधीजींनी आठ दहा दिवस ठेऊन घेतले.दररोज सकाळी स्वामीजी गांधीजी बरोबर फिरायला जात. आपल्या सहकाऱ्याच्या सुटकेसाठी आमरण उपोषण करण्याची परवानगी स्वामीजींनी मागितली.यास गांधीजींनी नकार दिला व विचारले , “अहिंसेवर तुमचा किती विश्वास आहे ?अहिंसा ही तुमची निष्ठा का धोरण ?यात नको ते छळ सहन करावे लागतील.सत्याग्रही निष्ठेने तुम्ही हे करू शकाल का ?”स्वामीजी लिहतात दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून गांधीजीकडे गेलो त्यांना सांगून टाकले की,अहिंसेचा स्वीकार मी जीवननिष्ठा म्हणून केला आहे .तुमच्या मार्गाने जाण्याची माझी तयारी आहे.तुम्ही सांगाल ते मी करीन ,न कळत स्वामीजींनी गांधीजींच्या चरणाला स्पर्श केला.गांधीजींचेही डोळे पाणावले.त्यांनी स्वामीजींना वर उचलले व पाठीवर थाप मारली .न बोलता ही गांधीजींनी सांगून टाकले होते की,हैदराबादच्या जनतेला आता खरा नेता लाभला आहे.आता लढाई आपण जिंकलीच आहे आणि खरोखरच हैदराबाद संस्थानातील जनतेने मोठ्या धैर्याने स्वामीजींच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला. ब्रिटीशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती.
राजा मुसलमान व प्रजा हिंदू हा योगायोग होता.राजा कोणत्याही धर्माचा असो हा स्वातंत्र्य लढा राजेशाही नष्ट करण्यासाठी ,जनतेचे लोकशाही राज्य प्रस्थापित करण्यासाठी होता.हे सर्व स्वामीजींच्या नेतृत्वामुळे शक्य झाले.स्वामीजींनी उभारलेल्या लढयात जनता मोठया संख्येने सहभागी झाली. १९३८ ते १९४८ या काळात पन्नास हजार लोकांचा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग होता,१९४७-१९४८ या काळात वीस हजार लोक तुरुंगात होते.तीस हजार कार्यकर्ते भूमिगत कार्य करीत होते. या लढयात स्वामीजींना अनेक निष्ठावंत कार्यकर्ते लाभले यात ,गोविंदभाई श्रॉफ ,बाबासाहेब परांजपे ,दिगंबरराव बिंदू , आ.कृ.वाघमारे, अनंत भालेराव, नारायणराव चव्हाण, स.कृ.वैशपायन, पुरुषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी,देवीसिंह चौहान, शामराव बोधनकर,श्रीनिवासराव बोरीकर, मुकुंदराव पेडगावकर,राघवेंद्र दिवाण , फुलचंद गांधी ,नागनाथ परांजपे, माणिकचंद पहाडे , श्रीधर वामन नाईक इत्यादींनी मौलिक योगदान दिले.
निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते.पण निजाम दाद देत नव्हता .७ नोव्हेंबर १९४७ रोजी भारत सरकारने निजामासोबत जैसे थे करार केला. निजामाने भारतीय चलन संस्थानात बेकायदा ठरवले शिवाय युनोमध्ये हा प्रश्न घेवून जाण्याचा प्रयत्न करू लागला . अखेरीस भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरु केली या कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे म्हटले जाते . यावेळी स्वामीजी चंचलगुडा तुरुंगात होते.१७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला व निजामाच्या पोलादी जोखडातून हैदराबाद संस्थान मुक्त झाले.स्वामीजींची तुरुंगातून सुटका झाली. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींनी ज्याप्रमाणे फाळणीच्या दंगली चालू असलेल्या नौखाली व इतर भागात जाऊन शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्याप्रमाणेच स्वामीजीनींही तेलंगाना भागात पदयात्रा काढून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत राहिले.पंडित नेहरूंचा विरोध असतानाही १९५३ साली हैदराबादमध्ये झालेल्या काँगेस अधिवेशनात हैदराबाद संस्थानाचे भाषेच्या आधारावर त्रिविभाजनाची मागणी केली. पुढे चालून मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी पुढाकार घेतला.पक्षीय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही स्वामीजींनी शिक्षण व खादी क्षेत्रात काम चालू ठेवले. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात पिठापुरमजवळ स्वामी ओंकारांनी शांती आश्रमाची स्थापना केली होती, स्वामीजींनी तेथे काही शैक्षणिक प्रयोग केले.पुढे हैदराबाद येथे उस्मानिया हॉस्पिटलमध्ये २२ जानेवारी १९७२ रोजी स्वामीजींचे निधन झाले. गांधीजींच्या अंत्ययात्रेत ज्याप्रमाणे जनसागर होता तसे स्वामीजींच्या अंत्ययात्रेत झाले नाही.केवळ तीन हजार लोक स्वामीजींच्या अंत्ययात्रेत उपस्थित होते आणि ज्या महाराष्ट्राची निर्मिती स्वामीजीमुळे झाली त्या महाराष्ट्र सरकारतर्फे मात्र कोणीही उपस्थित नव्हते.
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
सहशिक्षक , ज्ञानेश्वर विद्यालय, शाहू चौक,लातूर
(सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,)
मो.७५८८८७५६९९
umatebhausaheb@gmail.com
Post a Comment