हैदराबाद मुक्तीसंग्राम व आर्य समाज

          १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्यलढयाची परिपूर्ती अजून झाली नव्हती कारण भारतातील काही संस्थानिकांनी भारतात विलीनिकरणास विरोध दर्शविला ,पण तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुत्सदीपणे ५६५ पैकी बहुतांश संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले तरीही काश्मिर ,जुनागड व हैदराबादच्या संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वातंत्र्य देण्यास व भारतात विलीन होण्यास नकार दिला ,आणि स्वातंत्र्य राहण्याचे मनसुबे रचू लागले, त्यातील आपले हैदराबाद हे संस्थान निजामाच्या पोलादी जोखडाखाली होते , येथे आसफिया घराण्याची सत्ता १७२४ ला स्थापन झाली होती.या घराण्यातील राजे ‘निजाम’ या त्यांना मिळालेल्या पदवी वरून ओळखले जात.

          हैदराबाद हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंखेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे संस्थान होते. या संस्थानाचा विस्तार १६ जिल्हयात पसरला होता. यापैकी ८ जिल्हे तेलगु भाषिक ,3 जिल्हे कन्नड भाषिक तर ५ जिल्हे मराठी भाषिक म्हणजे आपल्या मराठवाड्यातील होते. संस्थानाची लोकसंख्या १ कोटी ६३ लाख ३८ हजार ५३४ होती, तर क्षेत्रफ़ळ ८२३१३ चौ.मैल इतके होते .वार्षिक उत्पन्न २६ कोटी रुपयाचे होते .या संस्थानातील ८५ % प्रजा हिंदू होती तर संस्थानिक मुस्लिम होता.सरकारी नौकरीमध्ये मुस्लिमांचे प्रमाण ७५ % हिंदूचे २० % असे होते. संस्थानात तेलगू,मराठी,कन्नड व उर्दू या प्रमुख भाषा होत्या मात्र १८८४ पासून उर्दूला राज्य भाषेचा दर्जा होता.शिवाय हैदराबाद संस्थानाच्या एकूण क्षेत्रफळा पैकी ४२ % भाग विविध जहागीरीने व्यापला होता

          ११ जून १९४७ रोजी निजामाने आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही तर स्वतंत्र राहणार अशी घोषणा केली .पुढे २७ नोव्हेंबर १९४७ ला भारत सरकारने निजामाशी जैसे थे करार केला .सातव्या निजामाचे नाव नवाब उस्मान अली खां असे होते, भारतातील सर्वात विलक्षण व विक्षिप्त संस्थानिक म्हणून सातवा निजाम ओळखला जात असे , अमेरिकेतील फोर्ड नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. यास पैसा व सत्ता या दोन गोष्टीचे जबरदस्त आकर्षण होते. हा महत्वकांक्षी, हुशार तर होताच शिवाय राजकीय डावपेच करण्यात व कटकारस्थाने रचण्यात पुरेसा चतुर होता. एक मात्र खरे आहे की उस्मान अली इतर संस्थानिकाच्या तुलनेत अत्यंत साधा ,निर्व्यसनी ,विलास, शानशौक, बडेजाव यापासून दूर होता. तो शेकडो नौकर-चाकर असूनही नमाज पढताना आपली चटई आपल्या हाताने पसरीत असे व नंतर गुडाळून ठेवत असे. सुमारे एक हजार कोटीची मालमत्ता बाळगणारा निजाम आठवड्याला फक्त वीस रुपये स्वतःवर खर्च करीत असे. हा १९११ ला गादीवर आला होता.याचे एकच स्वप्न होते ते हैदराबाद स्वतंत्र राज्य करणे. हा गादीवर आल्यापासून स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरु केले.त्याने आपल्या महत्वकांक्षेच्या पूर्ततेसाठी मुस्लीम धर्माचा व मुस्लीम जातीयतेचा आधार घेतला.उस्मान अलीने १९२१ मध्ये एक आदेश काढून सभा संमेलने,बैठकी- प्रवचने, मिरवणुका यावर सक्त बंधने लादली.व्यायाम शाळा,आखाडे,खाजगी शाळा, ग्रंथालये परवानगी वाचून काढू नयेत अशी सक्ती करण्यात आली.गश्ती निशाण ५२ आणि ५३ या नावाने हे दोन आदेश हैदराबाद संस्थानात ओळखले जात होते.

          संस्थानात आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी निजामाच्या आशीर्वादाने ‘मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना १९२८ साली झाली. पुढे चालून लातूरचा कासीम रझवी या संघटनेच्या अध्यक्षपदावर आला याने खाकसारच्या धर्तीवर रझाकार या संघटना बनवली.खुद निजामाचाच वरदहस्त लाभल्यामुळे या संघटनेने हिंदू प्रजेवर अनन्वित अत्याचारास सुरुवात केली.या संघटनेची सदस्य संख्या पुढे चालून दीड लाखापर्यंत झाली.रझाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी संस्थानात ५२ केंद्रे होती, प्रत्येक रझाकाराला दरमहा साठ रुपये पगार मिळे. कासीम रझवी हा लातूरचा साधा वकील होता मात्र त्याचे नेतृत्व अफाट होते. तो दिल्लीच्या लाल किल्यावर निजामाचा झेंडा फडकविणार अशी वल्गना करीत असे.

          स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैदराबाद स्टेट कॉंग्रेसने हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्याचे जे ऐतिहासिक कार्य केले त्यास भारताच्या इतिहासात तोड नाही.पण याची सुरुवात हिंदू महासभा, आर्य समाज यांनी केली होती.या लेखात आर्य समाजाच्या लढ्यातील काही ठळक घटनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

          हैदराबाद संस्थानात निजामाच्या अन्यायाविरुद्ध प्रथम आवाज उठविण्याचे काम आर्य समाजाने केले.२४ ऑक्टोबर १९३८ ते ७ ऑगस्ट १९३९ या कालावधीत आर्य समाजाने आपले १२ हजार सत्याग्रही तुरुंगात पाठविले , संस्थानात १९४१ पर्यत २४१ शाखा कार्यरत होत्या. संस्थानात आर्य समाजाचे ४०००० अनुयायी होते. यात मोठ्या प्रमाणात
संस्थानाबाहेरील सत्याग्रही होते, आर्य समाजाचा मुख्य प्रभाव उस्मानाबाद ,नांदेड ,बिदर व गुलबर्गा या जिल्हयात मोठ्या प्रमाणात होता .आर्य समाजाने मुस्लीम धर्मप्रसार व धर्मांतर (तबलीग )यांना प्राणपणाने विरोध केला. हिंदू संघटन करणाऱ्या आर्य समाजावर निजामाचा रोष होता त्यामुळे आर्य समाजाची स्थापना ,आर्य मंदिर, हवनकुंड, आर्य कीर्तन इ. प्रतिकारातूनच करावी लागली पण आर्य समाजामुळे मुस्लीम धर्मांतर मोहिमेस आळा बसला.एकीकडे निजाम सरकार व मुस्लीम धर्माध शक्ती वाढत्या अत्याचाराकडे वाटचाल करीत होत्या तर आर्य समाज अधिक परिणामकारक प्रतिकाराचे मार्ग शोधत होता. हैदराबाद संस्थानात इस्लाम धर्मीयांखेरीज कोणालाच विशेषता हिंदुना कसलेच धर्मस्वातंत्र नव्हते.आर्य समाजावर तर सरकारची वक्रदृष्टी होतीच. मराठवाडयात आर्य समाजाची पहिली शाखा धारूर (जि.बीड) येथे स्थापन झाली ,नंतर निलंगा(जि.बिदर ) येथे आर्य समाज स्थापन झाला.१९३५ मध्ये बिदरच्या मिर्जा मुहम्मद या कलेक्टरने एके दिवशी निलंगा येथील समाजमंदिर व हवनकुंड पायदळी तुडवून जमीनदोस्त केले .संस्थानभर याचे तीव्र पडसाद पडले शेवटी ते मंदिर कलेक्टर ला स्वतः च्या पैशातून बांधून देण्याचे आदेश दिले गेले व विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली.

          इ.स.१९३७ मध्ये अनेक संताप जनक घटना घटल्या. मुक्तीसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र गुंजोटी येथील आर्यसमाजाचे कार्यकर्ते वेदप्रकाश यांच्या हत्येपासून सुरु होते ,गुंजोटी येथील वेदप्रकाश यांचे मूळ नाव दासप्पा असे होते.१९३६ -१९३७ या काळात या भागात अनेक गावात आर्य समाजाची स्थापना झाली होती.भाई बंशीलाल,भाई श्यामलाल ,पं.विरभद्रजी आर्य ,पं. कर्मवीरजी, आर्य उदयवीर, माधवराव घोणशीकर, पं.नरेंद्रजी यांनी या भागात हिंदुना संघटीत करण्याचा प्रयत्न केला.वेदप्रकाश आर्य समाजाच्या कार्यात उत्साहाने सहभागी होत होते.यामुळे रझाकाराना वेदप्रकाश डोळ्यात खुपत होते.

          २३ फेबुवारी १९३७ ला गुंजोटी येथे भाई बंशीलाल यांचे व्याख्यान आयोजित केले होते.भाषण ऐकण्यासाठी अनेक गावातील लोक आले होते.वेदप्रकाश पं.बंशीलाल यांना आणण्यासाठी उमरगा येथे गेले होते पण सायंकाळपर्यंत पं . बंशीलाल आले नाहीत त्यामुळे वेदप्रकाश निराश होऊन गावी परतले.परगावचे लोक वाट पाहून चार वाजल्यानंतर आपापल्या गावी परतले.गावातील मजलिसे इत्तेहादुल मुसलमीनच्या गुंडांना आर्य समाजाच्या या कार्याचा रोष होता,त्या दिवशी आर्य समाजाचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी अनेक गावाहून गुंड आले होते.आता ते घोषणा देत वेदप्रकाशच्या घराकडे आले. पं . बंशीलाल आले असावेत या कल्पनेने वेदप्रकाश उत्साहाने पळत सुटले.तितक्यात गुंडांनी त्यांना घेरले.वास्तविक पाहता पिळदार शरीराचे वेदप्रकाश आपली तलवार न घेताच शत्रूच्या गराड्यात सापडले, तलवारीच्या घावांनी वेदप्रकाश यांचे शरीर रक्ताने माखून निघाले.लढता लढता ते कोसळले .वेदप्रकाश हुतात्मा झाले, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील वेदप्रकाश हे पहिले हुतात्मा, ही बातमी सर्वदूर पोहचली,सर्वत्र हाहाकार माजला.

          हुतात्मा वेदप्रकाश नंतर बसवकल्याण येथे तशीच घटना घडली.या गावात धर्मप्रकाश हे आर्य समाजाचे कार्यकर्ता होते,यांचे मूळ नाव नागप्पा असे होते ,हे हिंदू मुलांना व्यायाम शिकवीत, धर्मप्रकाश आर्य समाज मंदिरातून घरी जात असताना मुसलमान समुदायाने त्यांना घेरले तलवारीने वार केले,धर्मप्रकाश हुतात्मा झाले.१९३८ मध्ये उदगीर येथे दसऱ्याच्या मिरवणुकीवर मुसलमानांनी हल्ला केला, गोळीबार केला,आर्य समाजाचे कार्यकते माणिकरावांच्या दिशेने गोळीबार झाला.माणिकराव यांना वाचवण्यास जाऊन त्यांचे सहकारी भीमराव मरण पावले पुढे दवाखान्यात माणिकराव पण वारले,गावात अनेक घरावर मुसलमानांनी हल्ले केले.भीमरावची काकू पण गोळीबारात मरण पावल्या. यावेळी आर्य समाजाचे नेते पं. श्यामलालजी यांना अटक केली कारण त्यांच्यामुळेच या भागात आर्य समाजाचा प्रभाव झपाटयाने वाढला होता, त्यांना बिदरच्या तुरुंगात अंधार कोठडीत ठेवले. १६ डिसेंबर १९३८ ला तुरुंगात त्यांच्यावर विषप्रयोग झाला व त्यातच त्यांचे निधन झाले,सोलापूर येथे त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.सरकारच्या आशीर्वादाने चालू असलेल्या राक्षसी कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट आली.पुढे ही आर्य समाजाच्या हुतात्म्याची परंपरा चालू राहिली. आर्य समाजाच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनता निर्भयपणे निझामाशी,रझाकारांशी मुकाबला करू लागली,पुढे चालून हैदराबाद स्टेट कॉंग्रेसला अनेक निर्भय कार्यकर्ते आर्य समाजाने तयार केलेल्या पायाभरणीमुळे मिळाले व पुढे चालून १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद संस्थानांत स्वातंत्र्याची पहाट उगवली. हैदराबाद मुक्तीसंग्रामाची पायाभरणी करण्याचे काम आर्य समाजाने केले.हैदराबाद मुक्तीसंग्रामातील सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
सहशिक्षक , ज्ञानेश्वर विद्यालय, शाहू चौक,लातूर
(सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) 
मो.७५८८८७५६९९
umatebhausaheb@gmail.com

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.