माझा वाचन प्रवास

          मी तेव्हा सातवीला असेन, दोन कि.मी.अंतर तुडवीत वलांडीच्या शाळेत जात असे. एके दिवशी शाळेत प्रार्थना झाल्यानंतर व्यंकटेश माडगुळकर यांची एक कथा ऐकवली ,कथेचे नाव होते - ‘शाळा तपासणी.’ कथा सुरु झाली आणि आम्ही मुले ती ऐकण्यात दंग झालो. खूप हसलो ,टाळ्या पिटल्या ,त्या लहान वयातही ती कथा मला खूप भावली.वाटले आपल्याच तर गावची गोष्ट आहे.आमच्या गावात चौथीपर्यंत शाळा होती .शिक्षक एकच,मारुतीच्या देवळात चार कोपऱ्यात चार वर्ग भरलेले असायचे अन गुरुजी गावभर चहापाणी,गप्पा करीत फिरायचे. कधीतरी सफारी ड्रेस घातलेले , भल्या मोठया पोटाचे नाजरसाब(शाळा तपासणीस)यायचे, खाचखळग्यात भरलेल्या वाटेने चालताना ,पाणंद चढताना त्यांची त्रेधा तिरपट उडायची,अन त्यांची बॅग घेऊन वलांडीच्या बसस्टँडला गेलेल्या आम्हा पोरांची पुढे बरेच दिवस करमणूक व्हायची.....मला वाटते माझ्या वाचनाचे बीज शाळेत ऐकलेल्या त्या गोष्टीमुळे रुजले.त्या कथेमुळे मी वाचनाकडे वळलो .


          माझे अण्णा (वडील ) शिक्षक होते,आणि त्यांना वाचनाची फार आवड, त्यामुळे चारशे लोकवस्तीच्या गावात बालपण जाऊनही मला लहानपणीच खूप दर्जेदार पुस्तके वाचता आली, आमच्या घरी नेहमीच पुस्तकांची वर्दळ असायची, मी तेव्हा नववीला असेन, अण्णांनी मला व्यंकटेश माडगुळकर यांचे ‘माणदेशी माणसं’हे पुस्तक वाचायला दिले,त्यातला झेल्या,बिटाकाका,गणा भपटया अनेक वेळा वाचलो अन खऱ्या अर्थाने मला वाचनाची आवड लागली,या माणदेशी माणसंमधील ‘झेल्या’ आजही मला जागोजागी भेटतो अन उन्नाड विधार्थ्याना शिक्षकाने कसे समजून घ्यावे यासाठी आजही मला झेल्या मार्गदर्शन करतो ,पुढे मला ‘बनगरवाडी’ ही कादंबरी वाचनात आली,आणि जणू मी व्यंकटेश माडगुळकर या नावाने झपाटून गेलो, ‘बनगरवाडी’ ही अभिजात साहित्यकृती म्हणून लोकमान्यता पावलेली आहे.तसं पाहता बनगरवाडीचे जग हे मर्यादित आहे पण त्याच्या विस्ताराच्या सीमा अपार आहेत,कादंबरी भर मास्तराचे निवेदन आहे .पण नंतर वाटते नायक अलिप्त होत गेलाय अन बनगरवाडीच नायक बनलीय,एका दुष्काळी खेडयात एक शिक्षक

कसा बदल घडवू शकतो,हे मला त्यातून समजले .समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम शिक्षण हेच आहे हे त्या लहान वयातही मनावर ठसण्यासाठी माझे वाचनच कारणीभूत झाले हे मात्र निश्चित.पुढे चालून सानेगुरुजी यांचे ‘श्यामची आई’वाचनात आले मग आई वर असलेली अनेक पुस्तके वाचली त्यातही मॅक्झिम गॉर्की यांचे ‘आई’ अनेकवेळा वाचत राहिलो ,तो सबंध काळ फार भरवलेला होता. मी बी. ए. ला महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय ,उदगीरला प्रवेश घेतला आणि खऱ्या अर्थाने ग्रंथाच्या विशाल विश्वाचे मला दर्शन झाले.माझे वाचन वेड पाहून तेथील माशाळकर सर व खुब्बा मॅडमनी मला थेट ग्रंथालयात जाऊन माझ्या आवडीची पुस्तके निवडण्याची ,वाचण्याची मुभा दिली,आणि मी येथील तीन वर्षाच्या काळात झपाटल्यासारखा वाचत सुटलो,अर्थात सुरुवातीला व्यंकटेश माडगुळकर,शंकर पाटील,द. मा.मिरासदार ,पु.ल.देशपांडे, रा.र.बोराडे, व.पु.काळे,जयवंत दळवी, यांचे या ग्रंथालयात असतील तेवढी पुस्तके वाचली, भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’उदयगीरीतच वाचनात आली,आपणच ‘पांडुरंग सांगवीकर’ आहोत असे पुढे बरेच दिवस वाटत राहिले.राजन गवस यांचे ‘तणकट’ही कादंबरी व ‘आपण माणसात जमा नाही’, सदानंद देशमुख याचं ‘बारोमास’ हे साहित्य आवडीने अनेकदा वाचलो. येथेच पहिल्यांदा माझी दलित साहित्याशी ओळख झाली , अन विनोदी कथा ,कादंबऱ्यांचे वाचन आवडणारा मी दलित साहित्यातील दाहक अनुभवाने स्थंबित झालो, एका वेगळ्याच जीवनाचे दर्शन मला आपोआपच गंभीर वाचनाकडे घेऊन गेले.दया पवार यांचे ‘बलुतं’,प्र.ई.सोनकांबळे यांचे ‘आठवणीचे पक्षी’,शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’, शांताबाई कांबळे यांचे ‘माझ्या जन्माची चित्तरकथा’,लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’,लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’शरणकुमार लिंबाळे यांचे ‘अक्करमाशी’, किशोर शांताबाई काळे यांचे ‘कोल्हाटयाचे पोर’,मल्लिका अमर शेख याचं ‘मला उध्वस्त व्हायचंय’,उर्मिला पवार यांचे ‘आयदान’,डॉ.भगवान वाहुळे याचं ‘उसवलेले टाके’ अशी अनेक दलित आत्मचरित्र ,आत्मकथन वाचनात आली,अण्णाभाऊ साठे याची ‘फकिरा’ही कादंबरी या सुमारास वाचण्यात आली. पुढे मग आत्मचरित्र, चरित्र वाचण्याचा धडाका सुरु झाला.पु.भा.भावे यांचे ‘प्रथमपुरुषी एकवचनी’,साधना आमटे याचं ‘समिधा’,आनंद यादव यांचे ‘झोंबी’मधून शिक्षणासाठी किती पराकोटीचा संघर्ष करावा लागतो याचे दर्शन झाले,अन आपोआपच अभ्यासाकडे गांभीर्याने पाहण्याची सवय लागली,सर्व आवडीनिवडी जोपासायच्या पण अगोदर अभ्यास महत्वाचा आहे असे संस्कार माझ्यावर वाचनातूनच झाले,ना.य.डोळे सरांचे ‘प्राचार्य’मी अनेकांना वाचण्यास दिले होते. याच काळात कधीतरी तस्लिमा नसरीन यांचे ‘लज्जा’ही कादंबरी एका रात्रीत वाचल्याचे आठवतंय.

          मी एम.ए.ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे येथे प्रवेश घेतला आणि ‘जयकर ग्रंथालया’च्या रूपाने प्रचंड वाचन भांडार माझ्यापुढे खुले झाले,या काळात इतिहास आणि राज्यशास्त्राचे अनेक संदर्भ ग्रंथ वाचता आले, या काळातच भारतीय संविधानाचा अभ्यास करता आला.इ.एच.कार यांच्या ‘इतिहास म्हणजे काय ?’या ग्रंथाची पहिली भेट येथेच झाली,कथा , कादंबरी ,चरित्र ,आत्मचरित्र या बरोबरच कविता वाचण्याची गोडी येथेच लागली.वाचनासाठी लागणारी शिस्त आतापर्यंत आली होतीच,पण आता एक दिशा मिळाली . विजय तेंडूलकरांची झपाटून टाकणारी ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’, ‘कमला’ असे अनेक नाटके येथेच वाचनात आली ,मग गिरीश कर्नाड,महेश एलकुंचवार,संजय पवार असे नाटककार माझ्या वाचन प्रवासाशी जोडले गेले. माझा कविता वाचनाचा प्रवास कुसुमाग्रज ,विंदा करंदीकर , वसंत बापट,मंगेश पाडगावकर असा सुरु झालेला प्रवास पुढे दिलीप चित्रे ,अरुण कोल्हटकर मार्गे नारायण सुर्वे ,नामदेव ढसाळ ,तुलसी परब ,अरुण काळे असा होत राहिला,अरुण काळे यांचा ‘नंतर आलेले लोक’मधील कवितांनी मला शब्दात किती सामर्थ्य असते ते दाखवून दिले,आजही मी अधून मधून त्या कवितांचा आस्वाद घेत असतो.हल्ली दासू वैद्य,इंद्रजीत भालेराव ,मंगेश नारायणराव काळे ,हेमंत दिवटे,प्रवीण दशरथ बांदेकर ,सलील वाघ,असे अनेक नावे जुडत जात आहेत .पुण्यात असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे सेतू माधवराव पगडी,गो.स.सरदेसाई,सर जदुनाथ सरदार यांचे ग्रंथ वाचनात आले,अन मी शिवाजी महाराज व त्यांनी वास्तव्य केलेल्या दुर्गांच्या प्रेमात पडलो,दरम्यान गो.नी.दांडेकरांचे ‘दुर्गभ्रमणगाथा’वाचनात आले अन माझी ही दुर्गभ्रमंती सुरु झाली.

          पुढे लातूर येथे ज्ञानेश्वर विद्यालयात इतिहास शिक्षक म्हणून रुजू झालो, आमच्या शाळेत पंधरा हजार ग्रंथ संग्रह असलेले ग्रंथालय आहे ,येथेही मग मनमुराद वाचन चालूच राहिले.माझे मित्र फड सर मला हवे ते पुस्तक आनंदाने देतात.सोबतीला लातूरमधील ‘वेद प्रतिष्ठान वाचनालय’, ‘शिवछत्रपती वाचनालयांनी’ माझ्या वाचन प्रवाशाला भरपूर पुस्तके पुरवली.

          दरम्यान ‘यशदा’(यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,पुणे )यांनी माध्यमिक शिक्षकांसाठी ‘किशोरवयीन मुला-मुलींना समजून घेताना’हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी ‘मास्टर ट्रेनर’म्हणून माझी निवड झाली.या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे माझा ‘मूल समजून घेण्याचा’ प्रवास सुरु झाला.आणि या विषयावर असलेल्या पुस्तकांशी मी जोडला गेलो. अच्युत गोडबोले यांचे ‘मनात’,प्रा.रमेश पानसे यांचे ‘बहुविध बुधिमत्तांचा विचार’तसेच ‘शिक्षण:परिवर्तनाची सामाजिक चळवळ’, ‘रचनावादी शिक्षण’ अदिती नातू यांचे ‘मेंदू संशोधन व बालशिक्षण’,डॉ.विजया वाड यांची ‘उत्तम शिक्षक होण्यासाठी’, ‘आपली मुलं’, ‘आपल्या मुली वाढवताना’,डॉ.संदीप केळकर यांचे ‘जावे भावनांच्या गावा’,दलिप सिंह यांचे ‘भावनिक बुद्धिमत्ता’,शोभा भागवत यांचे ‘आपली मुलं’,अंजली पेंडसे यांचे ‘मनमोकळे’,डॉ.आनंद जोशी यांचे ‘मेंदूतला माणूस’,शिवराज गोर्ले याचं ‘सुजाण पालक व्हावं कसं ?’,अशी मूल ,मेंदूसंशोधन या विषयाची अनेक पुस्तके वाचनात व संग्रहात आली, तेत्सुको कुरोयानागी यांचे ‘तोत्तोचान’,सिल्विया अॅश्टन-वाँर्नर यांचे ‘टीचर’डेव्हिड ग्रीबल यांचे ‘खऱ्या शिक्षणाच्या शोधात’ त्याबरोबरच गिजुभाई बधेका ,ताराबाई मोडक ,अनुताई वाघ यांचे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’या पुस्तकांनी मला खऱ्या अर्थाने शिक्षकाने मुल कसे समजून घ्यावे हे शिकवले .मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ही कादंबरी सुद्धा मुलांच्या मनात काय चालते हे जाणून घेण्यासाठी आवश्य वाचावी अशीच आहे.

          या काळात इतिहासाचे वाचन चालू होतेच, वाचनात एक शिस्त खऱ्या अर्थाने या काळातच आणता आली,भारतीय इतिहासाला व्यापून टाकणाऱ्या अनेक युग पुरुषांच्या जीवनाचा अभ्यास मी करत गेलो.महात्मा फुले,शाहू महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील ,महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी अशा थोरांची चरित्रे अभ्यासता आली, सदानंद मोरे यांचे ‘लोकमान्य ते महात्मा’ अरविंद गोखले यांचे ‘मंडलेचा राजबंदी’ ‘अज्ञात गांधी’अशी वेगळा आशय मांडणारी पुस्तके इतिहासाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन निर्माण करावयास कारणीभूत ठरली.याच काळात रामचंद्र गुहा यांचे ‘गांधीनंतरचा भारत’ हा बाराशे पानाचा ग्रंथ वाचनात आला. इतिहास कसा लिहावा ,त्याची मांडणी कशी करावी याची जाणीव विकसित होत गेली.

          इतिहासामधील एक दुर्लक्षित पान म्हणजे ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा’. मी अनेक शाळांमधून विधार्थांशी संवाद साधल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की अनेकांना या विषयी काहीच माहिती नाही वा त्या प्रेरणादायी लढयाचे गांभीर्य , महत्त्व ही उमगले नाही, मग सुरु झाला प्रवास हैदराबाद मुक्तीसंग्रामाची गाथा जास्तीत जास्त विधार्थांपर्यंत,समाजापर्यंत नेऊन पोहोचविण्याचा.अर्थात या कार्यात पण मला अनेक ग्रंथाची साथ लाभली.या विषयामुळे माझ्या वाचनाला व लेखनाला शिस्त आली.एखादया विषयाला संशोधनाची जोड कशी द्यावी हे उमजत गेले,अभ्यास करताना नोंदी ठेवणे,टिपणे काढणे कसे आवश्यक आहे हे समजत गेले या प्रवाशात अनेक ग्रंथांनी सोबत केली यात पं. नरेंद्रजी यांचे ‘हैदराबाद के आर्यो की साधना और संघर्ष’,अनंत भालेराव यांचे ‘स्वामी रामानंद तीर्थ’, स्वामी रामानंद तीर्थ यांचे ‘हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील आठवणी’, अनंत भालेराव यांचे ‘हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा’, द.ग.देशपांडे यांचे ‘संस्थान हैदराबादचे स्वातंत्र्य आणि लोकस्थिती’, नरेंद्र चपळगावकर यांचे ‘कर्मयोगी संन्याशी’, यशवंतराव सायगावकर यांचे ‘हैदराबाद मुक्ती आंदोलन के कुछ अध्याय’, डॉ.चंद्रशेखर लोखंडे यांचे ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम का इतिहास’, प्रकाश मेदरकर यांचे ‘स्वामी रामानंद तीर्थ’,असे अनेक ग्रंथ अभ्यासता आले.त्यामुळेच माझी हैदराबाद मुक्तीसंग्राम लढयाचा अभ्यासक व वक्ता म्हणून ओळख निर्माण होऊ शकली.आज हैदराबाद मुक्तीसंग्राम या एकाच विषयावर माझ्याकडे पन्नासपेक्षा जास्त ग्रंथ आहेत. विविध विषयावर आजवर माझे सत्तर पेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत.माझ्या या सर्व लेखनाचे मूळ माझ्या वाचनात दडलेले आहे हे मात्र खरे.आज माझ्याकडे स्वतःचा समृद्ध ग्रंथसंग्रह आहे.माझ्या पगाराच्या कमींत कमी ५ % व जास्तीत जास्त १० % रक्कम मी ग्रंथ खरेदीवर खर्च करतो. माझा वाचन प्रवास पाहून काही मित्र विचारतात यातून तुला काय मिळते?मी हसत ‘आनंद मिळतो’ एवढेच उत्तरतो, खरंतर आज मी जो आहे ते वाचनामुळेच. या लेखात माझ्या वाचन प्रवाशातील काही ठळक पुस्तकांचाच येथे उल्लेख केला आहे,मला विधार्थी जेव्हा विचारतात वाचनाची सुरुवात कोणत्या पुस्तकापासून करावी,त्यावेळी मी त्यांना सानेगुरुजी यांचे ‘श्यामची आई’,महात्मा गांधी यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’,उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’,डॉ.नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’,वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’अशी काही पुस्तके सुचवतो.अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते . वाचन हे सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे ,त्यात खंड पडता कामा नये हे मात्र खरे .....



उमाटे भाऊसाहेब शिवाजीराव,

लातूर
मो. ७५८८८७५६९९ 
umatebhausaheb@gmail.com
(लेखक इतिहासाचे अभ्यासक व वक्ते असून बालभारतीच्या इतिहास अभ्यास गटाचे सदस्य आहेत.)

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.