नरवीर तानाजी मालुसरे





नरवीर तानाजी मालुसरे 

ऐतिहासिक प्रसंग चित्रपटाच्या माध्यमातून किती प्रभावीपणे मांडता येतो याचे ताजे उदाहरण म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील तान्हाजी- द  अनसंग वॉरिअर  हा चित्रपट ....ज्या वेळी एखादा दिग्दर्शक चित्रपटासाठी एखादा ऐतिहासिक प्रसंग निवडतो तेव्हाच सादरीकरणाच्या वेळी तो  त्यातील काही प्रसंगात आवश्यकतेनुसार बदल करणार , काही मसाला भरणार हे अपेक्षितच असते ...तान्हाजी या चित्रपटात सुद्धा दिग्दर्शकाने काही प्रसंगामध्ये विशेषतः चित्रपटाच्या शेवटचा प्रसंगामध्ये  बदल केले आहेत ( नरवीर तानाजी मालुसरे   यांची शेवटच्या क्षणी  छत्रपती शिवरायांशी झालेली भेट हा प्रसंग , यास इतिहासात यास दुजोरा मिळत नाही पण असो ) ....पण त्यास आक्षेप घेणे वा त्यावर टीका करणे हा या लेखामागचा उद्देश नाही उलट या अशा चित्रपटामुळे तरी आजचा तरुण वर्ग फार मोठया प्रमाणात ऐतिहासिक घटना, प्रसंग या बरोबरच इतिहास पुरुषांची आठवण जागवतो आहे हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या लेखात मी मुख्यतः काही मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतोय...
तर पहिला प्रश्न असा आहे की नरवीर तानाजी मालुसरे यांचे मूळ गाव कोणते ?
तानाजी मालुसरे यांच्या वडिलांचे नाव काळोजी मालुसरे असे होते ते पाचगणी जवळच्या गोडोली या गावचे ...त्यांना दोन मुले – तानाजी व सूर्याजी . काळोजी हे पराक्रमी, कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व पण वाईच्या आदिलशाही सुभेदाराने काळोजी व त्यांचा भाऊ भोरजी यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले, तेव्हा तानाजी व सूर्याजी लहान होते ...तानाजीच्या आईचे माहेर उमरठ ..ती माउली आपल्या मुलांना घेऊन माहेरी येऊन राहिली आणि पुढे तेच त्यांचे गाव झाले. सावित्री नदीच्या खोऱ्यात पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर कापडे गावाजवळ उमरठला जाणारा फाटा फुटतो त्या उमरठ गावचे रहिवासी झालेले  .... 
तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवराय यांच्या सोबत लहानपणा पासून स्वराज्य कार्यात पुढाकार घेणारे पराक्रमी वीर . राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय हे आपले दैवत मानून स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सतत शिवरायांची सावली बनून राहिलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा ज्या कोंडाणा किल्यावर लिहिली गेली तो दुर्ग, तो तानाजी कडा आजही त्या घटनांचा मूक साक्षीदार बनून आपल्यापुढे उभा राहतो आणि आपण काळाचे भान विसरून ४ फेब्रुवारी १६७० ला कोंडाणा सर करताना नरवीर तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, शेलारमामा व त्यांचे निवडक मावळे यांनी रचलेली शौर्यगाथा स्मरून नतमस्तक होतो. हा भीम पराक्रम रचताना नरवीर तानाजी मालुसरे यांनी ढाल तुटली असतानाही आपला शेला हाताला गुंडाळून उदयभान राठोड याच्याशी त्यांनी दिलेली झुंज आणि त्यात  दिलेले बलिदान ...त्यानंतर परत फिरण्याच्या मार्गावर असलेल्या मावळ्यांना कल्याण दरवाज्यातून सूर्याजी व त्यांच्या मावळ्यांची आलेली कुमक ...सुर्याजीचे दोर कापणे असो वा शेलारमामाची वयावर मात करून शत्रूशी दिलेली झुंज असो सर्व काही अवर्णनीय आणि सदैव प्रेरणादायी ...
सिंहगडावरील स्मारक 
दुसऱ्या दिवशी नरवीर  तानाजींचे पार्थिव प्रथम राजगडावर व तेथून एका घाटवाटेने पोलादपूर जवळच्या त्यांच्या राहत्या गावी उमरठला नेण्यात आले तेथेच त्यांच्या कलेवरास अग्नी देण्यात आली ...या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे व शेलारमामा यांचे स्मारक असून तानाजी मालुसरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे ....( तान्हाजी या चित्रपटामुळे या स्मारकाला भेट देणाऱ्यांचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही)
आणि दुसरा प्रश्न तानाजी मालुसरे यांचे कोणी वंशज आहेत का?
आज उमरठ या गावी जरी त्यांचे कोणी वंशज राहत नसले तरी बेळगाव येथे नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण नारायणराव मालुसरे हे बेळगावला राहतात .
 ज्या रायबांचे लग्न बाजूला ठेऊन नरवीर  तानाजी मालुसरे यांनी कोंडाणा किल्ला सर केला. त्या रायबांचे लग्न पुढे छत्रपती शिवरायांनी मोठया थाटामाटात पार पाडले एवढेच नव्हे तर १६७४ ला  कोल्हापूर जवळील पारगड (ता.चंदगड) या किल्ल्याचे किल्लेदार म्हणून रायबांची नियुकी केली.रायबा यांनी हा गड अधिक मजबूत केला व शिवरायांच्या आदेशानुसार या गडाचे रक्षण केले. रायबा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मुंबाजी यांनी त्यांची समाधी पारगडावर बांधली.आजही या पारगड किल्ला मालुसरे कुटुंबीयांकडेच आहे. सूर्याजी मालुसरे यांचे वंशज महाड तालुक्यातील गावडी या गावी राहतात.
....तान्हाजी या चित्रपटा मुळे का होत नाही पण इतिहासाला परत उजाळा मिळाला म्हणून दिग्दर्शक व सर्व टीमचे अभिनंदन आणि आभार ....
 भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                                                                      लातूर


  


No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.