किसान दल
                                किसान दल
               हैदराबाद मुक्तिसंग्रामात  सरहद्दीवर भारतीय हद्दीत  अनेक सशस्त्र कॅम्प स्थापन करण्यात आले होते तसे अंतर्गत भागात ही काही बहादूर तरुणांच्या पुढाकाराने  अशी केंद्रे उभारली गेली. त्यात बिदर जिल्हयातील आटर्गा व तोंडचिर ही सशस्त्र व लढाऊ केंद्रे होती. सरहद्दीवरील बाह्य केंद्रापेक्षा ही केंद्रे अत्यंत जोखमीची होती. येथील बहादूर तरुणांनी  रजाकारांशी सशस्त्र लढा देण्यासाठी किसान दलाची स्थापना केली. या किसान दलाचे प्रमुख केंद्र आटर्गा ता.निलंगा (सध्या ता.भालकी जि.बिद र ) हे लहानसे गाव होते. यावेळी या गावात शंभर घरांची वस्ती होती येथून जवळ मेहकर हे प्रमुख रझाकार केंद्र होते शिवाय परिसरातील आळवाई, वलांडी, देवणी, घोरवाडी, भालकी, बस्वकल्याण या गावात मोठया प्रमाणात रझाकारांची केंद्रे स्थापन झाली होती.  निवृतीराव गायकवाड, मुरलीधर गायकवाड, यशवंतराव सायगावकर, व्यंकटराव माणिकराव  मुळे, लिंबाजी बिरादार,बळवंतराव मास्तर,  ज्ञानू बोळेगावकर, डॉक्टर चनप्पा तुगावकर, भीमराव बिरादार, शेषेराव वाघमारे, दादाराव हालसे, ग्यानोबा बिरादार, आत्माराम मिरखले, लिंबाजी उगले, सिद्राम पाटील, निवृतीराव धनगर, नारायण जाधव, तुकाराम सागावे, रामा बोळेगावे   व समस्त गावकऱ्यांनी मिळून या टोळीची स्थापना केली. त्यांना पुढे  अप्पाराव पाटील कौळखेडकर व इतर शूरवीरांची साथ मिळाली.  स्वतःच्या गावासह परिसरातील अनेक गावावर रझाकारांचा हल्ला झाला की हे बहादर तरुण आपल्या प्राणाची पर्वा न करता मदतीला धावून जात. परिसरातील अनेक  गावात जात आणि आपण करीत असलेल्या कार्याची माहिती देत. रझाकार व पस्ताकोम यांच्याशी संघटितपणे मुकाबला करू असे आश्वासन दिले या टोळीतील तरुणांचा पहिला पराक्रम म्हणजे संभा दरोडेखोराचा वध.बोळेगाव येथे संभा दरोडेखोराने परिसरातील रझाकार व पस्ताकोम यांना जमवून गाव लुटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या बहादूर तरुणांनी धावून जाऊन साथ दिली व संपूर्ण गाव लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या संभा दरोडेखोराचा वध केला.  या परिसरात किसान दलाच्या  टोळीच्या रझाकाराबरोबर पंधरा लढाया झाल्या.सायगाव येथील रझाकार सदर कादरखाँ हा गावातील  लोकांवर जुलूम करीत असे.यशवंतराव सायगावकर यांना याच्यामुळेच गाव सोडून आटर्गा या गावी राहावे लागत होते.एके दिवशी जनजागृतीसाठी या  टोळीतील काही तरुण  केसरजवळगा येथे गेले होते सायंकाळी  परतत असताना सायगाव परिसरात  या तरुणांना नदीवर  कादरखाँ तेथील महिलांना त्रास देत असताना दिसला. टोळीतील तरुण संतापले त्यांनी  त्यास पकडून ठार केले. कोंगळीवरून परतत असताना मेहकर येथील रझाकारांसोबत लढाई झाली, तीन तास चाललेल्या मुकाबल्यात यशवंतराव सायगावकर यांना पायाला गोळी लागली पण ते या संकटातून वाचले. या  किसान दलाच्या बहादुर तरुणांनी बोटकुळच्या लढाईत रझाकारांचा धुव्वा उडविला. टोळीच्या वाढत्या हालचालीमुळे आटर्गावर पोलीस मदतगाराने  मोठया  पोलीस फौजफाटयासह  आक्रमण केले. यावेळी  यशवंतराव सायगावकर व इतर तरुणांनी मिळून पोलीस मदतगार फतेअलीखाला गोळ्या घालून ठार केले. पण आता गावावर परत आक्रमण होईल म्हणून ही टोळी हत्ती बेटावर आश्रयाला गेली. येथे झालेल्या घनघोर लढाईत किसान दलाला विजय मिळाला. तेथून टोळी  तोंडचीर येथे गेली. तोंडचीरच्या टोळीतील  तुकाराम पाटील तादलापूरकर , माणिकराव मुळे पाटील डोणगावकर यांनी या तरुणांना साथ दिली. रामघाटच्या लढाईत  या तरुणांनी महापराक्रम केला मात्र  मादनहिप्परगा येथील लढाईत डॉ.चनाप्पा तुगावकर, व्यंकटराव मुळे, समर्थ या तिघांना वीरमरण आले. हैदराबाद संस्थानात भारतीय फौजा पोहचण्यापूर्वी तिरंगा ध्वज फडकावण्याचा मान या किसान दलातील तरुणांना जातो. हत्यारांची वानवा असतानाही या बहादूर तरुणांनी मोठया धैर्याने दिलेली झुंज आपल्या कायम लक्षात राहते.  या छोट्याश्या गावाने परिसरातील भयभीत झालेल्या हिंदू प्रजेमध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण केली. या टोळीच्या कार्याची रोमहर्षक कहाणी झुंजार स्वातंत्र्यसेनानी यशवंतराव सायगावकर यांनी सांगितली आहे. आपण www.bhausahebumate.com या वेबसाईटवर ही रोमहर्षक  कथा पाहू शकता.

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.