दक्षिणेतील भगतसिंग- नारायणराव पवार

                                        
                              दक्षिणेतील भगतसिंग-  नारायणराव पवार 


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानातील परिस्थती दिवसेंदिवस बिघडत होती.रझाकार संघटना  सैनिकी थाटात संचलन करून ‘आझाद हैदराबाद झिंदाबाद’ च्या घोषणा देत होती.भारत सरकार या समस्येवर तात्काळ उपाययोजना करेल असे वाटत नव्हते.अशा परिस्थितीमध्ये संस्थानी जनतेने आपल्या पद्धतीने या संकटाशी धैर्याने सामना केला.असाच एक धाडशी प्रयत्न संस्थानातील तीन बहादूर तरुणांनी केला.नारायणराव पवार,जगदीश आर्य,गंगाराम पालमकोल यांनी केला होता.
निजाम वेगवेगळ्या खेळी खेळत होता.कासीम रझवी व रझाकारांनी संस्थानात धुमाकूळ घातला होता.अन्याय,अत्याचाराने परिसीमा गाठली होती.या सर्व परिस्थितीला सातवा निजाम मीर उस्मान अली हाच जवाबदार आहे.आपण जर मुळावरच घाव घातला तर हैदराबादची डोकेदुखी कायमची संपून जाईल असे या तरुणांना वाटत होते.या सर्वांना एकत्र आणून या क्रांतीकार्याला आरंभ केला ते म्हणजे क्रांतिवीर नारायणराव पवार.हे मुळचे बिदर जिल्ह्यतील सायगावचे.(ता.भालकी)पुढे त्यांचे वडील सौळदापका व तेथून पोट भरण्यासाठी म्हणून वरंगल येथे गेले.नवीन रेल्वे रूळाचे काम चालू होते. प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर ते मुकादम पदापर्यंत पोहचले तेथेच घर,जमीन घेऊन स्थायिक झाले.नारायणरावांना शिक्षणासाठी हैदराबाद येथे ठेवले.हैदराबाद मधील एक प्रसंग नारायणरावांच्या जीवनात फार मोठा बदल करणारा ठरला तो म्हणजे मोहम्मद अली जिन्ना यांचे भाषण.नारायणराव संतप्त झाले.आता आपण शांत बसून चालणार नाही.भलेही आपले प्राण जातील पण हैदराबाद स्वातंत्र्य झालाच पाहिजे ही त्यांची मनोभूमिका झाली.हळूहळू सोबती मिळू लागले यामध्ये नारायणराव पवार, बाळकृष्ण ,जगदीश आर्य,गंगाराम पालमकोल,पोचनाथ रेडडी,विश्वनाथ यांचा समावेश होता.पैसा आणि हत्यारांचा अभाव होता पण हे बहादूर तरुण हर मानणार नव्हते.हातबॉम्ब व इतर साहित्य मिळाले, निजामालाच संपवण्याची योजना आखली गेली.
निजाम दररोज सायंकाळी आपल्या किंग कोठी या निवास स्थानापासून कारने त्याच्या आईच्या मजारला( समाधीला)  दर्शनासाठी जात असे नेमकं याच संधीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला गेला.
४ डिसेंबर १९४७ रोजी सायंकाळी निजामाच्या गाडीची वाट बघत थांबले.सुरुवातीला नारायणराव हात बॉम्ब घेऊन उभे राहिले व पुढे काही अंतरावर जगदीश आर्य व गंगाराम पालमकोल उभे राहिले.किंग कोठी तून गाडी निघाली नारायणराव अगोदरच सावध होते गाडी जवळ येताच नारायणरावांनी बॉम्ब फेकला पण दुर्दैवाने तो बॉम्ब खिडकीवर आदळून बाहेर पडला व फुटला इतक्यात पोलिसांनी झडप घालून नारायणरावांना पकडले. गाडीच्या ड्रायव्हरने गाडी मागे वळवली व परत किंग कोठीत नेली त्यामुळे पुढे थांबलेल्या दोघांना काहीच करता आले नाही .नारायणरावांना खूप मार बसला पण त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगितली नाहीत.पुढे या सर्वांवर खटला चालून नारायणरावांना फाशीची शिक्षा झाली. सुदैवाने लवकरच पोलीस कारवाई झाली.या वेळीही त्यांना तुरुंगातून सुटका झाली नाही.पण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्ती नंतर ते तुरुंगातून सुटले.अशा या जीवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नारायणराव पवार यांना त्रिवार वंदन.............
                                                            भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                 सहशिक्षक , ज्ञानेश्वर  विद्यालय, शाहू चौक,लातूर  
                                               (सदस्य , इतिहास अभ्यास मंडळ,बालभारती,पुणे,) मो.७५८८८७५६९९ 
      


    

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.