चंपारण्य सत्याग्रह आणि स्वातंत्र्य लढयातील शेतकऱ्यांचा सहभाग
चंपारण्य
सत्याग्रह आणि स्वातंत्र्य लढयातील शेतकऱ्यांचा सहभाग
भाऊसाहेब
शिवाजीराव उमाटे
सहशिक्षक,ज्ञानेश्वर
विद्यालय,लातूर ४१३५१२
मो.७५८८८७५६९९
Email- umatebhausaheb@gmail.com
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गांधी
युगाचा उदय खऱ्या अर्थाने चंपारण्य सत्याग्रहापासून
झाला.ग्रामीण भारतावर ब्रिटीश सत्तेचा पडलेला महत्वाचा प्रभाव म्हणजे भारतीय कृषी
व्यवस्थेत झालेले दूरगामी परिणाम होय. सरकारी कराचे प्रमाण आणि जमीनदाराच्या
हिस्साचे प्रमाण जास्त असल्याने शेतकरी वर्गाची स्थिती दिवसेंदिवस हालाखीची बनत
गेली.१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात वारंवार दुष्काळ पडले.आणि त्यात
उपासमारीने लक्षावधी शेतकरी व इतर दुर्बल घटक मृत्यूमुखी पडले.ह्या काळात
भारताच्या भिन्नभिन्न प्रदेशात लहानमोठे २४ दुष्काळ पडले.आणि त्यात २ कोटी ८५ लक्ष
जनता मृत्यूला सामोरे गेली.१ . मळेवाल्यांची
आर्थिक पिळवणूक आणि सरकारी अत्याचार असह्य होऊन शेतकऱ्यांनी १८६० साली
सत्याग्रहाचा मार्ग अवलंबिला. त्यात ४०० शेतकरी तुरुमगात गेले. या शेतकरी
आंदोलनाच्या वेळी कलकत्त्याचे विष्णुचरण व दिगंबर विश्वास, दीनबंधू मित्र, शिशिरकुमार घोष आदींनी
शेतकऱ्यांची बाजू घेऊन सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांच्या प्रचारामुळे पुढे चौकशी
करावी लागून शेतकऱ्यांवर जे भयानक जुलूम होत होते, त्यांवर
प्रकाश पडला. इंग्रजांच्या अन्यायी कारभाराविरुद्ध आणि विशेषतः पिढ्यान्पिढ्या महसूल माफ
असलेल्या जमिनींवर सारा आकारणे, साऱ्यात अचानक
वाढ करून ती जबरदस्तीने वसूल करणे, वसुलीसाठी जमिनीसुद्धा
लिलावत काढणे यांसारख्या घटनांविरुद्ध विजयानगर, गंजाम,
गाझीपूर तसेच ओरिसा व माळव्यातल्या जमीनदारांनी सशस्त्र उठाव केले.
याच प्रश्नांवर उत्तर हिंदुस्थानातील व बंगालच्या गरीब शेतकऱ्यांनी अनेकवार
सामूहिक आंदोलने केली. सरकारने जमीनदारांशी तडजोडी केल्या; पण
शेतकऱ्यांची आंदोलने मात्र निपटून काढली.
दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठी सत्याग्रहाचे नवीन
साधन वापरून जगप्रसिद्ध झालेले महात्मा गांधी हिंदुस्थानात ९ जानेवारी १९१५ रोजी
आले. त्यांनी वर्ष-दीड वर्ष येथील परिस्थितीचा अभ्यास केला. त्यानंतर अहमदाबाद येथे आश्रम स्थापन करून त्यांनी ते
आपल्या कार्याचे प्रमुख केंद्र बनवले.सुरुवातीस कॉंग्रेसच्या कामकाजात त्यांचा
सहभाग अत्यल्प असे मात्र १९१६ नंतर गांधीजींचा कॉंग्रेसच्या कामकाजातील सहभाग
वाढला.२ भारताच्या राजकारणात
गांधीजीच्या पदार्पणामुळे आर्थिक व राजकीय दिशा मिळाली.गांधी आपली चळवळ
व्यापक बनवू इच्छित होते,त्यामुळे त्यांनी चळवळीत ग्रामीण जनतेला व शेतकऱ्यांना सहभागी
करून घेण्याचा प्रयत्न केला.इ.स.१९१६ च्या लखनौ कॉंग्रेस अधिवेशनात चंपारण्य येथून
राजकुमार शुक्ल हे तरुण कार्यकर्ते आलेले होते.ते चंपारण्यमधील शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडावी या साठी
ठराव मांडण्याची विनंती करीत होते पण जमलेल्या नेत्यांना विनंती करून ही कोणीही
त्यांची दखल घेतली नाही.अशातच काठेवाडी पोषाखातील गांधी त्यांच्या नजरेस पडले.त्यांनी
चंपारण्यातील शेतकऱ्यांवर निळीचे गोरे व्यापारी जो अन्याय करीत आहेत,त्याबाबत
अधिवेशनात ठराव मांडण्याची विनंती केली. ‘आता सर्व ठराव झाले आहेत.लोकमान्य टिळकांचीही
त्यावर सही झाली आहे आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्याशिवाय मी ठराव मांडत नाही’असे
गांधीनी त्यांनी सांगितले.त्यावर चंपारण्यात येण्याची विनंती राजकुमार शुक्ल यांनी
गांधीना केली.येत्या काही दिवसात मी पूर्वेला येईन,त्या वेळी टू मला भेट’ अस गांधी
त्यांना म्हणाले.राजकुमार यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर ते पुन्हा भेटतील असा
विचार करून गांधीनी त्यांचा निरोप घेतला.३ गांधीजी अद्यापि देशातील
स्थितीचे सुक्ष्म अवलोकन करीत होते,पण परिस्थिती त्यांना स्वस्थ बसू देण्यास तयार
नव्हती.देशातील पहिला सत्याग्रह हाती घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपली.४ पुढे
चार महिन्यांनी गांधीजी ज्यावेळी कलकत्त्याला गेले त्यावेळी तिथे राजकुमार शुक्ल
येऊन गांधीजींना भेटले व चंपारण्यात येण्याची विनंती गांधीना करू लागले.त्यांनी
गांधीजींना चंपारण्यातील अन्यायग्रस्त,गरीब शेतकऱ्यांची कैफियत गांधीना ऐकवली.
“आमच्या चंपारण्य जिल्ह्यात पिकवली जाणारी सगळी नीळ इंग्लंडला जाते.निळीचा भाव
गोरे व्यापारीच ठरवतात व कमी भावात नीळ खरेदी करून वारेमाप नफा कमावतात.आम्हाला
निळीचे पिक घेणे परवडत नाही.आमच्यावर अक्षरशः उपासमारीची पाळी आलेली आहे.पण
व्यापारी जबरदस्तीने नीळ पिकवायला लावतात.जुलूम करतात.नीळ पिकवली नाही तर चाबकाने
मारहाण करतात.” चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या वेदनेची कहाणी ऐकून गांधींचं हृदय
हेलावलं.सर्व कार्यक्रम बाजूला सारून गांधी राजकुमार बरोबर चंपारण्याला गेले.५
चंपारण्य हा बिहारचा वायव्येकडील जिल्हा.तेथे
निळीची लागवड होत असे.ब्रिटीश राजवटीच्या स्थापनेनंतर तेथे इंग्रज मळेवाल्यांनी आपले
साम्राज्य स्थापन केले.तेथील शेतकऱ्यांनी जमिनीच्या तीन विसांश भागात जमिनीच्या
मूळ मालकासाठी निळीचीच लागवड केली पाहिजे असे बंधन लादले.यास ‘तीन कठिया’ असे नाव
होते.६ त्या काळात जगातली ८० टक्के नीळ चंपारण्यात पिकत असे.कलकत्ता हे
निळीचं मोठ व्यापारी केंद्र होतं.तिथून नीळ युरोप - अमेरिकेला निर्यात केली जायची.चोवीस तास चालणाऱ्या तिथल्या
कापडाच्या कारखान्यांना रंगासाठी नीळ लागायची.नीळ नसल्यास कारखाने बंद पडण्याची
शक्यता होती.म्हणून जुलमी कायदे केले गेले.या दडपशाहीखाली शेतकरी भरडून निघत होते.
चंपारण्यमधील निळीच्या प्रश्नाला हात
घालण्यापूर्वी जमिनीच्या कायद्याची माहिती मिळवणे त्यांना आवश्यक वाटत होते.मौलाना
मझरूल हक्क यांची आठवण गांधीना झाली.ते दोघे लंडनमध्ये एकत्र शिकले होते.७ त्यांनी
जीवित राम कृपलानी यांचे नाव सुचविले,त्यांना
नीळ जमीन कायद्याचा आणि चंपारण्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येचा अभ्यास
होता.गांधीजीं मुझफ्फरपूरला जाऊन कृपलानीना भेटले.गांधीजी म्हणतात, “कृपलानींनी
मला माझ्या कामाच्या कठीणपणाची कल्पना करून दिली.नंतर राजेंद्रबाबू व व्रजकिशोरबाबू
आले,त्या मंडळीमध्ये व माझ्यामध्ये जन्माची प्रेमगाठ बांधली गेली.”८ या पद्धती विरुद्ध न्यायालयात खटले चालवून फारसे
काही साध्य होणार नाही असे गांधीजींना वाटत होते.त्यापेक्षा लोकांचा भित्रेपणा दूर
करणे हेच त्यांच्या साठी खरे औषध आहे,त्यात तुरुंगात जाण्याचा प्रसंग येण्याचाही
संभव आहे.पुढे त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली तसेच कमिशनरला भेटले.त्यांनी गांधीना
धमकीच दिली,आपणास अटक झालीच तर ती मोतीहारी किंवा बेतियामध्ये झालेली बरे असे त्यांना
वाटले.
चंपारण्य हा तिरहूत विभागाचा एक जिल्हा व मोतीहारी हे
त्याचे मुख्य शहर.बेतियाच्या जवळच यांचे घर होते व त्यांच्या जवळपास च्या मळ्यातील
शेतकरी अधिकात अधिक रंक होते.९ गांधीजीची त्यांच्या सहकाऱ्याबरोबर मोतीहारीला
जाण्यास निघाले,तेथून जवळच पाच मैलावर एका कुळावर अत्याचार झाला होता.बाबू धरणीधर
प्रसाद यांच्यासह ते हत्तीवर बसून निघाले.अर्ध्या वाटेत पोलीस सुपरिडेंटचा निरोप
आला.त्यांनी गांधीजीवर चंपारण्य सोडून जाण्याची नोटीस बजावली गेली.त्याने
गांधीजीकडे नोटीस मिळाल्याची पावती मागितली तेव्हा गांधीजींनी लिहून दिले की, “क्रिमिनल
प्रोसिजर कोडच्या १४४ कलमाखाली माझ्यावर हुकूम बजावला आहे पण सार्वजनिक जबाबदारीच्या
जाणिवेमुळे,हा जिल्हा सोडून जाणे मला शक्य नाही, हुकुमभंगाबद्दल होणारी शिक्षा
भोगून मी त्या हुकुमाचा आदर करीन.”११
दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजरराहण्याचं समन्स गांधीजीवर
बजावण्यात आलं.त्यानुसार गांधीजी न्यायालयात हजर झाले.शेतकरी व साथीदारांच्या गर्दीने
न्यायालय तुडुंब भरून गेले.प्रवेशबंदीचा सरकारी आदेश न पाळल्याचा गुन्हा केल्याचं
व त्यासाठी शिक्षा करण्याच प्रतिपादन सरकारी वकिलांनी केलं.त्यावर गांधीनी दोन
शब्द बोलण्याची परवानगी मागितली.गांधीजी म्हणाले, “न्यायाधीश महाराज,सरकारी
आदेशाचा मी भंग केला आहे.हे मी सविनय कबूल करतो.या खटल्यात आपण आपला बहुमुल्य वेळ
वाया न घालवता मला आताच शिक्षा करावी.” गुन्हा कबूल करून लगेच शिक्षा मागणारा
गांधीसारखा अजब आरोपी न्यायाधीशांनी तोवर पाहिला नव्हता.शिक्षेचा निर्णय न्यायाधीशांनी
दुसऱ्या दिवसावर ढकलला.गांधीना विचार करण्यासाठी वेळ मिळाला.त्यांनी व्हाइसराय व
गव्हर्नरांना तारा केल्या. ‘आपण चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या चौकशीसाठी जात होतो.प्रवेशबंदीच्या
गुन्ह्याखाली मला निष्कारण अडकवून
ठेवण्यात आले आहे.आपण न्याय करावा.’तारेचा चांगला परिणाम झाला.गांधींना प्रवेशबंदी
न करता सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचा व्हाइसरायचा कमिशनरला आदेश आला.अर्थातच
प्रवेशबंदीचा खटला मागे घेण्यात आला.१२
गांधीजी लिहितात, ‘चंपारण्यमध्ये मला कोणी ओळखत नव्हते.येथे
सर्व अशिक्षित शेतकरी.राष्ट्रीय सभेचा कोणी सभासदही आढळण्यासारखे नव्हते.लोकांना
राष्ट्रीय सभेच्या कार्यात भाग घेण्याची भीती वाटे.आता राष्ट्रीय सभेचे नाव न
काढता ही राष्ट्रीय सभेने व तिच्या सेवकाने त्या ठिकाणी प्रवेश केला व राष्ट्रीय
सभेची सत्ता स्थापित झाली.१३ चंपारण्यमधील मळेवाले खूप चिडले होते.वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या.मालवीयजीनी जरूर लागेल
तेव्हा बोलवा असे सांगून ठेवले होते.गांधीजींनी या लढयाला कधीही राजकीय रूप येऊ
दिले नाही.१४ चंपारण्यतला
प्रश्न सोडविण्यासाठी गांधीजींनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवण्यास सुरुवात
केली .व्रजकिशोरबाबू,धरणीधरबाबू,शंभूबाबू, गयाबाबू, अनुग्रहबाबू असे अनेक प्रांतातील वकील त्यांच्या मदतीला आले.महादेवभाई देसाई व नरहरीभाई परीख मदतीला आले होते.पाटण्यातील राजेंद्रबाबू पण सोबतीला होते. राजेंदबाबु लिहितात, “बापूंना मदत
करण्यासाठी बिहार,गुजरात ,उत्तरप्रदेशातून आलेल्या काही वकिलांनी सोबत आपापल्या
जातीचे स्वयंपाकी आणले होते.ही मंडळी दुसऱ्या जातीच्या हातचं अन्न खात नसत.गांधीजींनी सर्वांचा
स्वयंपाक एकत्र करण्याचा निर्णय घेतला,सर्वांनी त्यांचा निर्णय मानला,मी
पहिल्यांदाच दुसऱ्या जातीच्या माणसाच्या हातचे अन्न खाल्लं.जातीप्रथेवर गांधीनी जो
प्रहार केलात्यातून आम्ही खूप शिकलो.बापू स्वतचे
कपडे स्वतः धुवत,मीही स्वतःचे कपडे स्वतः धुवायला लागलो,स्वावलंबनाचा पहिला
धडा मला बापूंकडून मिळाला.’१५
फार मोठया प्रमाणात कुळे तक्रारी नोंदवण्यासाठी येत होती.पण
तक्रार नोंदवून घेताना त्या कुळाची उलट तपासणी घेतली जाई.जर तो कसोटीवर उतरला नाही तर त्याची हकीकत लिहून
घ्यायची नाही.यामुळे जबान्या खऱ्या व सिद्ध होण्याजोग्या मिळाल्या.या जबान्या
घेताना गुप्त पोलीस हजर असत पण त्यांना प्रतिबंध केला गेला नाही त्यामुळे लोकांत
निर्भयपणा आला.जवळपासपंचवीस हजार तक्रारीपैकी निवडक चार हजार तक्रारी तीन कठिया पद्धत
बंद करण्याच्या मागणीसह गांधीनी गव्हर्नर,कमिशनर व निलवरांच्या संघटनेला पाठवल्या.गांधीवर नीलवर खूप संतापले.गांधी डरपोक आहे,जिथे जातो तिथे शंभर दोनशे लोकांना घेऊन जातो.एकटा भेटला तर त्याला गोळी घालीन असे एक नीलवर म्हणाला होता.तेव्हा गांधीजी एके दिवशी
पहाटे तीन वाजता उठून त्या निलवराच्या घरी गेले, ‘आता आपलं काम करून टाका’ असे
शांतपणे म्हणाले.१६ अर्थात गांधीजीचे सर्वात महत्वाचे विशीष्ट म्हणजे त्यांनी
स्वतच्या उदाहरणातून लोकांना निर्भय बनण्यास शिकवले.
गांधीचा अहवाल मिळाल्यानंतर सरकारने जिल्हाधिकारी,सेटलमेंट
ऑफिसर आणि मळेवाले यांच्याकडूनही अहवाल मागवले.ले.गव्हर्नर सर एडवर्ड गेट यांनी
गांधीना चार जुन रोजी रांची येथे भेट घेण्यास सांगितले.तीन दिवसाच्या चर्चेनंतर विभागीय
कमिशनरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली.या समितीवर गांधीजीचीही एक
सभासद म्हणून नेमणूक करण्यात आली.३ऑक्टोबरला समितीने एकमताने अहवाल दिला.सरकारने
समितीच्या सर्व शिफारशी स्वीकारल्या.त्यावर आधारित कायदाही पुढे मंजूर करण्यात
आला.या कायद्यानुसार तीन कठिया पद्धत रद्द करण्यात आली.इतकेच नव्हे तर कुळांना संरक्षण देणाऱ्या आणखी काही तरतुदी करण्यात आल्या.१७
गांधीजी चंपारण्यमध्ये केवळ सत्याग्रहाचा प्रयोग करून थांबले
नाहीत तर खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु केले.केवळ
राहण्यास जागा व शिक्षकांना जेवण या सुविधेवर गांधीजीच्या प्रेरणेने अनेक
कार्यकर्ते या भागात ज्ञानदानाचे कार्य करू लागले.व हळूहळू सर्वसामन्यांना
आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला.या आंदोलनाची काही वैशिष्टय सांगता येतील.सर्वात महत्वाचे म्हणजे गांधीजींनी
अनुसरलेला संपूर्ण बुद्धिवादी दृष्टीकोन.यात शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा अविश्रांतपणे
व काळजीपूर्वक अभ्यास केला गेला आणि ती परिस्थिती काटेकोरपणे व इतक्या योग्य
पद्धतीने मांडण्यात आली की सरकारला ती नाकारणे अशक्य झाले.या सत्याग्रहाचे दुसरे वैशिष्टय म्हणजे हे आंदोलन
गांधीजींनी प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यापुरतेच मर्यादित ठेवले होते.यामुळे
आंदोलनात झुंड सामील होण्याचा धोका टळला.त्यामुळे आंदोलन पूर्णपणे शांततामय होते.फक्त
निरलस कार्यकर्ते व ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असे शेतकरी यांचाच सहभाग या
आंदोलनात होता.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात फार मोठया प्रमाणात शेतकरी
वर्गाने उत्साहाने सहभाग नोंदविला. खेडा जिल्ह्यामध्ये १९१७-१८ सालचे पीक बुडाले
होते.जमाबंदीच्या नियमाप्रमाणे पीक जेव्हा चार आण्यापेक्षा कमी असते.तेव्हा शेतकऱ्यांना
साऱ्यात तहकुबी मिळत असे.पण सरकारने सहाशे गावांपैकी एका गावाला पूर्ण तहकुबी व
१०३ गावांना अर्धी तहकुबी मंजूर केली.गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चारशे गावची
पाहणी केली.सर्व ठिकाणी त्यांना पीक चार आण्यापेक्षा कमी आढळले.आपल्या हक्कांसाठी
जे लोक लढणार नाहीत त्यांची अवस्था गुलामासारखीच असे त्यांना वाटत होते.१८
सत्याग्रहाच्या मार्गाने हा प्रश्न सोडविला गेला.
उत्तर प्रदेशातील शेतकरी चळवळ
इ.स.१९१८ मध्ये गौरीशंकर मिश्र व इंद्र नारायण द्दिवेदी
यांच्या प्रयत्नाने उत्तर प्रदेशात किसान सभा स्थापन झाली.या सभेला पंडित मदनमोहन
मालवीय यांचा पाठींबा होता.जून १९१९ पर्यंत उत्तर प्रदेशातील १७३ तहसीलमध्ये किसान
सभेच्या ४५० शाखा स्थापन झाल्या.बाबा रामचंद्र हे अवधमधील शेतकऱ्यांचे नेते म्हणून
पुढे आले.शेतकऱ्यांनी बेदखली जमिनीची मशागत करण्यास नकार द्यावा,हारी व बेगारीसारखी
वेठबिगारी थांबवावी आणि आपल्यातील भांडणतंटे पंचायती मार्फतच सोडवावेत,असे आवाहन
किसान सभेने केले.
बार्डोली येथील करबंदीची चळवळ
इ.स.१९२८मध्ये गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बार्डोली तालुक्यात
करबंदीची चळवळ सुरु झाली.वास्तविक पाहता ही चळवळ असहकार चळवळीचेच अपत्य होते.असहकार चळवळ मागे घेण्यात आल्यानंतर या भागात राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सभासदांनी फार मोठया
प्रमाणात विधायक काम केले होते.महात्मा गांधीजीच्या सूचनेनुसार या भागात सहा आश्रम स्थापन झाले होते.बार्डोली तालुक्यातील जमीन महसुलाची नव्याने आकारणी करण्याचे काम जयकर या अधिकाऱ्याकडे
सोपविण्यात आले होते.त्याने महसुलात ३० टक्के वाढ सुचविली.ही वाढ असमर्थनीय आहे म्हणून
‘यंग इंडिया’ व ‘नवजीवन’या वृत्तपत्रांनी या विरुद्ध मोहीम उघडली.या लढयाचे
नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे आले.सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्यांना
नियोजित कारवाईचे सर्व संभाव्य परिणाम समजावून सांगितले.त्यांनी सरकार जोपर्यंत सध्याचा महसूल मान्य करीत नाही,तोपर्यंत महसूल देऊ नये असे सांगितले.या लढयात बार्डोलीतील
महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली.सभा,भाषणे, पत्रके या द्वारे शेतकरयांना संघटीत केले.देशातील लोकमत अधिकाधिक सरकारविरोधी होऊ लागले.शेवटी सरकारने माघार घेतली
व हा लढा यशस्वी झाला.
सविनय कायदेभंग चळवळ
इ.स.१९२९-३० मध्ये भारत महामंदीच्या तडाख्यात सापडला.याचा
फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.शेतीमालाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या.पण कर
मात्र कमी झाले नव्हते.या काळात आंध्रप्रदेश ,उत्तर प्रदेश,गुजरात,बिहार ,बंगाल, पंजाब,मध्य
प्रदेश , महाराष्ट्र या सर्व भागात फार प्रमाणात शेतकऱ्यांच्या चळवळी सुरु झाल्या.करबंदीसाठी
शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला.इ.स.१९३४मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना
झाली एन.जी.रंगा यांच्या पुढाकाराने १९३६ मध्ये लखनौ येथे अखील भारतीय किसान परिषदेची स्थापना झाली.पुढे तिचे
नाव ‘अखिल भारतीय किसान सभा’असे बदलण्यात आले.स्वामी सहजानंद सरस्वती यांची
अध्यक्ष म्हणून निवड झाली.तर एन.जी.रंगा यांची निवड झाली.राममनोहर लोहिया,सोहनसिंग
जोश,इंदुलाल याज्ञिक,जयप्रकाश नारायण , मोहनलाल गौतम,कमल सरकार,सुधीन प्रामाणिक
आणि अहमद दीन आदी नेते यात होते.
मलबारमध्ये कर्षक संघमाचे कार्य
केरळमधील मलबार प्रदेशात १९३४ पासून मोठया प्रमाणात
शेतकऱ्यांच्या चळवळी चालू होत्या.पी.कृष्ण पिलाई यांच्या नेतृत्वाखाली या भागात
सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आल्या.करांचे व खंडांचे प्रमाण कमी करावे,कर्जाचे
ओझे कमी करावे,शेतीमालाचे मोजमाप योग्य वजनमापांनी करावे आणि जमीनदाराच्या भ्रष्टाचाराला
आळा घालावा या यांच्या प्रमुख मागण्या होत्या.या लढयाला मोठया प्रमाणात यश
आले.
असहकार आंदोलनात सुद्धा
फार मोठया संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग होता.सविनय कायदेभंग आंदोलनात ही शेतकरी सहभागी
होते. १९३६ साली फैजपूर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात फार मोठया
प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला . शिवाय १९४२ च्या चले जाव आंदोलनात ही
शेतकऱ्यांनी अभूतपूर्व सहभाग घेतला व भारतीय स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने यशस्वी
करण्याचे कार्य लाखो शेतकऱ्यांनी केले.
..........................................................................................................
संदर्भ सूची .
१.बी.एल.ग्रोवर
-आधुनिक भारताचा इतिहास ,नवी दिल्ली,२००३,४१३
२.मधु लिमये , राष्ट्रपिता,ग्रंथाली,मुंबई,१९९८,१७
३.अज्ञात गांधी,समकालीन,पुणे,६४
४.कृष्ण कृपलानी,महात्मा गांधी :जीवनचरित्र,नॅशनल
बुक ट्रस्ट,नवी दिल्ल९४,१२२
५.अज्ञात गांधी,समकालीन,पुणे,६५
६.अरुण सारथी,शोध महात्मा गांधींचा, खंड-एक,अस्मिता
प्रकाशन,पुणे,१९९८,३१९
७.महात्मा गांधी - माझे सत्याचे प्रयोग ,साकेत,औरंगाबाद ,२०१३,२९९
८ कित्ता ..........
९ कित्ता .............
१० महात्मा
गांधी यांचे संकलित वाड.मय खंड १४
११शंकरराव
देव , गांधीजींचे बृहद आत्मचरित्र,सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला,पुणे,१९७०, २४९
१२ अज्ञात गांधी,समकालीन,पुणे,६८
१३ महात्मा गांधी - माझे सत्याचे प्रयोग ,साकेत,औरंगाबाद ,२०१३,३०५
१४ कित्ता ...........
१५ अज्ञात गांधी,समकालीन,पुणे,७०
१६ अज्ञात गांधी,समकालीन,पुणे,७१
१७ अरुण सारथी,शोध महात्मा गांधींचा, खंड-एक,अस्मिता
प्रकाशन,पुणे,१९९८,३२४
१८ महात्मा गांधी यांचे संकलित वाड.मय-
खंड १४,नवजीवन ,१९६८, २३९
Post a Comment