स्वामी रामानंद तीर्थ
विधार्थी मित्रहो, आज मी तुम्हाला स्वामी
रामानंद तीर्थ यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे.
हैदराबादचा स्वातंत्र्यालढा हा भारतीय स्वातंत्र्य लढयाचाच भाग होता.भारताला
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामाने हैदराबाद संस्थानास भारतात विलीन करण्यास नकार
दिला. संस्थानातील प्रजेला दुहेरी
पारतंत्र्यात राहावे लागत होते.राजकीय पारतंत्र्य तर होतेच पण त्या बरोबर जनतेच्या
शिरावर सांस्कृतिक,भाषिक
आणि धार्मिक पारतंत्र्यही लादण्यात आले होते.ब्रिटीशांपेक्षाही अधिक दडपशाही आणि
कोणताही उदारमतवाद न सहन करणारी राजकीय संस्कृती येथे नांदत होती.अत्यंत प्रतिकूल
परिस्थितीत स्वातंत्राचा जो लढा येथे चालवला गेला त्याचे नेतृत्व कर्मयोगी
संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले.वास्तविक पाहता स्वामीजी हे हैदराबाद
संस्थानाबाहेरील होते.स्वामीजींचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्हयातील सिंदगी या
गावी ३ ऑक्टोबर १९०३ रोजी झाला.
स्वामीजींचे पूर्वाश्रमीचे नाव
व्यंकटेश भवानराव खेडगीकर असे होते.स्वामीजींच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. सिंदगीच्या
शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सोलापूरला आले.येथे नॉर्थकोट हायस्कूल
ही ब्रिटीशांची सरकारी इंग्रजी शाळा होती.येथील मुख्याध्यापक व शिक्षक इंग्रजनिष्ठ
होते.घरून आर्थिक सहाय्य न मिळाल्याने व्यंकटेशने शाळेच्याच वसतिगृहात वाढप्याचे
काम करून निवास व भोजनाची सोय करून घेतली.येथेच त्यांना नवनवे मित्र मिळाले,पुस्तकांचा
सहवास लाभला. हा पहिल्या महायुद्धाचा काळ होता आणि देशभर लोकमान्य टिळकांच्या
नेतृत्वाखाली ब्रिटीश विरोधी आंदोलन चालू
होते.शाळेतील शिक्षक हिंदी मुलांच्या मनात इंग्रजनिष्ठा निर्माण करण्याचा खटाटोप
करीत होते.या काळी वाढत्या वयाबरोबरच व्यंकटेशची प्रस्थापित सत्तेविरुद्ध बंडखोरी
वाढत होती.लहान लहान गोष्टींतून ती प्रगट होत असे.एके दिवशी मुलांना युनियन जॅकचे
छोटे झेंडे व त्याबरोबर खाऊचे पुडे दिले गेले.व्यंकटेशने स्वतः युनियन जॅक फेकून
दिला व युनियन जॅक फेकून देणाऱ्या विध्यार्थांची संख्या वाढविली.अर्थातच दुसऱ्या
दिवशी अशा सर्व विध्यार्थ्यांना इंग्रजधार्जिण्या मुख्याध्यापकाच्या छडया खाव्या
लागल्या. या काळातच सोलापूरला लोकमान्य टिळक येणार होते,लहानगा व्यंकटेश व
त्यांच्या बालमित्रांना लोकमान्य टिळकांच्या सभेस जावावयाचे होते पण शाळेत त्या
वेळी परीक्षा सुरु होती.ही सभा दुपारी होती.मुलांना सभेस जाता येऊ नये म्हणून
मुद्दाम दुपारी परीक्षा ठेवला गेला पण व्यंकटेश व त्यांच्या मित्रांना कोणत्याही
परिस्थितीत सभेला जायचे होते मग त्यांनी चांगले येणारे प्रश्न घाईघाईने सोडविले व पळतच सभा स्थान गाठले .अर्थात
या बदलही त्यांना शिक्षा झाली पण देशभक्ती
व स्वातंत्र्य याचे बीज मनात रुजत गेले .पुढे लोकमान्य टिळकांचे मुंबईला निधन
झाल्याचे वृत्त आले अन छोटया व्यंकटेशला खूप दु:ख झाले, त्यांनी दिवसभर उपवास
केला,ते एका तळ्याच्या काठी जाऊन बसले व स्वतःशीच संकल्प केला की या क्षणापासून मी माझे
जीवन मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण करीन,सर्वसंग त्याग करून आजन्म ब्रह्मचारी राहीन.पुढे
गांधीजी एकदा सोलापूरहून जाणार होते. व्यंकटेशवर
गांधीजींचा मोठा प्रभाव होता. व्यंकटेश स्टेशनवर त्यांना बघायला गेला. हे
लहान मुल प्रचंड गर्दीने कुठल्या कुठे रेटीत नेले पण योगायोगाने गाडी स्टेशनात आली
व व्यंकटेशच्या समोरच गांधीजीचा डब्बा थांबला.आपण धन्य झालो या भावनेने व्यंकटेशने
गांधीजीचे दर्शन घेतले.गांधीजींनी मुलाचे खांदे धरले ,त्याला उठवले आणि ‘देशासाठी
काहीतरी करा’ असा संदेश दिला.हाच व्यंकटेश पुढे चालून हैदराबाद स्वातंत्र्य
आंदोलनाचा नेता झाला आणि गांधीजींच्या आदर्शावर चालत या लढयाचे नेतृत्व केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे व्यंकटराव
देशमुख व अनंतराव कुलकर्णी यांनी १९२१ मध्ये राष्ट्रीय शाळा स्थापन केली होती.या
शाळेने खऱ्या अर्थाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाला उर्जा व कार्यकत्यांची फळी
पुरवली.हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ या शाळेत जवळपास सहा वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य करत होते.येथेच स्वामीजींनी १४
जानेवारी १९३२ रोजी संन्यास घेतला.तेव्हापासून
त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ असे झाले .पुढे अंबाजोगाई येथील योगेश्वरी
शिक्षण संस्थेत काम करत असताना स्वामीजींनी पूर्ण वेळ राजकारणात यावे ,असा आग्रह
आनंद कृष्ण वाघमारे व इतर सहकाऱ्यांनी धरला .यावेळी लातूरला महाराष्ट्र परिषदेचे
दुसरे अधिवेशन चालू होते. संस्थानात कायदेभंगाची
चळवळ करण्यासाठी परिस्थिती परिपक्व झाली आहे या निर्णयाप्रत स्वामीजी आले होते.या
अधिवेशनातच स्वामीजींनी आपण पूर्णवेळ राजकीय कामासाठी स्वतः ला वाहून घेत आहोत,
असे आपल्या सहकारी मित्रांना सांगितले.
स्वामीजींच्या नेतृत्वाखालीच
१९३८ ला हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना झाली. मग स्वामीजींनी मागे वळून
पहिलेच नाही. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते स्वामीजींना लाभले,स्वामीजींनीही अत्यंत संयमाने या लढयाचे नेतृत्व केले.
वैयक्तिक सत्याग्रह केले,अनेकवेळा तुरुंगवास भोगला.हैदराबाद मधील चंचलगुडा,निजामाबाद,
गुलबर्गा अशा अनेक तुरुंगात
स्वामीजींना ठेवण्यात आले. स्वामीजींनी उभारलेल्या लढयात जनता
मोठया संख्येने सहभागी झाली.
अखेरीस भारत सरकारने १३ सप्टेंबर
१९४८ रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरु केली या कारवाईला ‘ऑपरेशन पोलो’ असे
म्हटले जाते . १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला व निजामाच्या पोलादी जोखडातून हैदराबाद संस्थान मुक्त
झाले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.स्वामीजींच्या
नेतृत्वाखाली हा लोकलढा यशस्वी झाला. पक्षीय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही
स्वामीजींनी शिक्षण व खादी क्षेत्रात काम चालू ठेवले. आंध्रप्रदेशातील गोदावरी
जिल्ह्यात पिठापुरमजवळ स्वामी ओंकारांनी शांती आश्रमाची स्थापना केली होती, स्वामीजींनी
तेथे काही शैक्षणिक प्रयोग केले. पुढे हैदराबाद येथे उस्मानिया हॉस्पिटलमध्ये २२
जानेवारी १९७२ रोजी स्वामीजींचे निधन झाले. ज्यांनी संस्थानी जनतेचे अखंड नेतृत्व केले
व स्वातंत्र्याचे ध्येय शिद्धीस नेले ते स्वामीजी हैदराबादच्या जनतेच्या
इतिहासावर कायमचा ठसा उमटवून निघून गेले.
(लेखक हैदराबाद
मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक व वक्ते असून इतिहास अभ्यास मंडळाचे,बालभारती सदस्य आहेत.)
Post a Comment