स्वयंअध्ययन अभ्यासमाला लेख 8 प्रकरण २ . निवडणूक प्रक्रिया


इयत्ता दहावी
विषय : इतिहास व राज्यशास्त्र
स्वयंअध्ययन अभ्यासमाला  लेख 8
         
         प्रकरण २   . निवडणूक प्रक्रिया                                                                         

   भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                  ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक, लातूर
                                                                                       इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
                                                                                         बालभारती, पुणे४११००४
                                                                                                        www.bhausahebumate.com
                                                                                       
           विद्यार्थी मित्रांनो,आज आपण राज्यशास्त्र या विषयातील निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाचा     अभ्यास करणार आहोत. शाळा सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे आपण ही स्वयं अध्ययन अभ्यासामाला सुरु केली आहे. या माध्यमातून तुम्ही अभ्यास सुरु केला आहे. यात खंड पडता कामा नये हे लक्षात घ्या.
 आता तुमचा इतिहासाच्या दोन  प्रकरणाचा  व राज्यशास्त्राच्या एका प्रकरणाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. तुम्ही दिवसातून कमीत कमी एकदा तरी झालेल्या प्रकरणाच्या नोट्स व त्या प्रकरणावर आधारित प्रश्नांची उत्तरे  वाचत आहात असे मी समजतो.कारण Revision  केला नाहीत तर झालेला  अभ्यास पण विसरून जाईल. म्हणून  झालेला अभ्यास परत परत अभ्यासा... आज आपण राज्यशास्त्र या विषयातील दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करू यात ........ या प्रकरणात आपणास निवडणूक प्रक्रिया समजून घ्यावयाची आहे.

 भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्वाच्या प्रक्रिया आहेत,  निवडणुकांमुळे शांततामय मार्गाने सत्ता बदलली जाते.शासनाच्या धरणात बदल घडतात व समाज जीवनही बदलते.आपण निवडून देतो ते प्रतिनिधी कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते.त्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही खुली, न्याय आणि विश्वसार्ह्य असावी लागते.म्हणूनच भारताच्या संविधानात निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केली आहे.
भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्वाच्या निवडणुका घेतात.
निवडणूक आयोग :
 संविधानाच्या कलम ३२४ ने निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात.निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र्य आर्थिक तरतूद असते.
माहित आहे का तुम्हाला ?
स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत सेन यांनी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळले.

निवडणूक आयोगाची कार्ये :
१)मतदार याद्या तयार करणे : वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकर आहे.मतदार याद्या तयार करणे,त्या अद्ययावत करणे , नव्या मतदारांचा समावेश करणे इ,कामे निवडणूक आयोग करते.
२)निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे :कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरते.
३)उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे: विविध राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना अर्ज भरावा लागतो.या अर्जांची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते.
४)राजकीय पक्षांना मान्यता देणे : आपल्या देशात बहुपक्षपद्धती आहे. राजकीय पक्षांना मान्यता देण्याचे कार्य निवडणूक आयोग करते.निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देते.
५)निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे : निवडणुका संबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जवाबदारी निवडणूक आयोगावर असते.

मतदारसंघाची पुनर्रचना :लोकसभेतील एकूण सदस्यसंख्या ५४३ आहे.प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो.म्हणजेच लोकसभेचे ५४३ मतदारसंघ आहेत. हे मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा मतदारसंघाची पुनर्रचना करते.
पहिले मुख्य निवडणूक आयुक्त -   
  सुकुमार सेन
भारताचे पहिले मतदार
श्याम शरण नेगी

 
लक्षात ठेवा –
हिमाचल प्रदेशातील श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार ठरले.२५ ऑक्टोबर १९५१ रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कल्पा ( जि क्न्नौर ) येथे ते राहतात.१९५१ ते २०१९ अशा सर्व निवडणुकात त्यांनी मतदान केले आहे.

आचारसंहिता : गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुका खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही.
मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासामोरील आव्हाने : आपल्या देशाचा विस्तार व मतदारसंख्या लक्षात घेता निवडणुका घेणे हे अतिशय आव्हानात्मक काम आहे. १. निवडणुकात मोठया प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहे तो रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.२  काही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही राजकीय पक्ष त्यांना तिकीट देतात. ३. निवडणुकामध्ये होणारी हिंसा  वाढत आहे.
 निवडणूक सुधारणा : निवडणूक सुधारणा ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. १. राजकीय पक्षांनी महिला उमेदवारांना ५०% उमेदवारी द्यावी, २.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये.३.निवडणुकांचा खर्च सरकारने करावा.४.लोकप्रतिनिधीच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीत सामील होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
हेही जाणून घ्या
सार्वत्रिक निवडणुका – दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात.
मध्यावधी निवडणुका – १. निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा घटक पक्षांनी पाठींबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते.२ पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात.
पोटनिवडणुका एखादया लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखादया लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिकामी होते.त्या जागेसाठी नव्याने निवडणूक  घेतली जाते.त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात.

 विद्यार्थी मित्रानो,  या विषयाचा अभ्यास करताना केवळ पाठांतर न करता  संकल्पना समजून घेण्यावर भर देणे अपेक्षित आहे.चौकटी,तक्ते यातील माहितीचाही अभ्यास करावा , यामुळे स्वाध्याया व्यतिरिक्त इतर प्रश्न विचारले गेल्यास आपण सहजतेने उत्तरे लिहू शकतो तुम्ही आता पासूनच सरावावर भर द्या यासाठी पाठयपुस्तका बरोबर ई बालभारती वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सराव प्रश्नपत्रिकांचे अवलोकन करा.जिद्द,कष्ट व सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश मिळवता येते हे लक्षात ठेवा.
सूचना – शिक्षक बांधवानो व  विद्यार्थी मित्रांनो ,  आता भाऊसाहेब उमाटे सरांचे  मार्गदर्शन व्हिडीयोज  Total History By Umate sir या  Youtube Channel वर उपलब्ध आहेत. तुम्ही या  स्वयंअभ्यास मालेबरोबरच आमचे दहावी साठी बनवलेले व्हिडीयोज पाहिल्यास निश्चितच तुमचा अभ्यास पूर्ण होईल. 
YOUTUBE Channel - Total history by Umate sir    
Our Official website - www.bhausahebumate.com
Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.