स्वयंअध्ययन अभ्यासमाला लेख ६ प्रकरण १ . संविधानाची वाटचालइयत्ता दहावी
विषय : इतिहास व राज्यशास्त्र
स्वयंअध्ययन अभ्यासमाला  लेख ६  
प्रकरण १  . संविधानाची वाटचाल  
                                                                          

   भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                  ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक, लातूर
                                                                                       इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
                                                                                         बालभारती, पुणे४११००४
                                                                                                        www.bhausahebumate.com
                                                                                                  विद्यार्थी मित्रांनो,मागील लेखात आपण इतिहासलेखन : भारतीय परंपरा या इतिहासातील दुसऱ्या  प्रकरणातील स्वाध्यायाचा अभ्यास केला.
 आता तुमचा इतिहासाच्या दोन  प्रकरणाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. तुम्हाला परत सांगू इच्छितो की तुम्ही दिवसातून कमीत कमी एकदा तरी झालेल्या प्रकरणाच्या नोट्स व त्या प्रकरणावर आधारित प्रश्नांची उत्तरे वाचली पाहिजेत जर तुम्ही Revision  केला नाहीत तर झालेला  अभ्यास पण विसरून जाईल. म्हणून  झालेला अभ्यास परत परत अभ्यासा... आज आपण राज्यशास्त्र या विषयातील पहिल्या  प्रकरणाचा अभ्यास करू यात ........ या प्रकरणात आपणास भारतीय संविधानाची वाटचाल समजून घ्यावयाची आहे.
पण या प्रकरणाचा अभ्यास सुरु करण्याअगोदर आपण भारतीय संविधानाविषयी  अगदी संक्षिप्त माहिती जाणून घेऊ यात ...

संविधान म्हणजे काय ?
देशाच्या कारभारा संबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. अर्थात संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो.
संविधानाची आवश्यकता :
१.शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो.त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी होते.
२.संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो.शासनाला ते हक्क हिरावून( काढून ) घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरुक्षित राहते.
३.संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार केल्यामुळे कायद्याचे राज्य प्रस्थापित होते.
४ संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो.
संविधान निर्मितीची पार्श्वभूमी

संविधान सभेचे अध्यक्ष – डॉ. राजेन्द्रप्रसाद महादेव सहाय्य
मसुदा सानितीचे अध्यक्ष – डॉ बाबासाहेब आंबेडकर
कायदेविषयक सल्लागार – बी.एन.राव
इतर मान्यवर सदस्य - पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, जे.बी.कृपलानी, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर .....
एकूण सदस्य - २९९ ( स्वातंत्र्यपूर्वी ही संख्या ३८९ इतकी होती पण भारताची फाळणी झाल्यामुळे ही संख्या कमी झाली )  
संविधान निर्मितीचा कालावधी : २ वर्ष, ११ महिने आणि १७ दिवस .
मूळ संविधानात २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे यांचा समावेश होता.   
भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्विकारले गेले .(या दिवशी संविधानावर संविधान सभेतील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या . यावेळी २८४ सदस्य उपस्थित होते.)हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले (म्हणजे लागू झाले ) अर्थात भारत हे  प्रजासत्ताक राष्ट्र बनले. 

  विद्यार्थी मित्रांनो, वरील माहिती या ठिकाणी देण्याचा उद्देश असा आहे की आपण   ‘संविधानाची वाटचाल’ या प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत व त्यास्तव भारतीय संविधानाची पार्श्वभूमी आपणास ज्ञात असणे आवश्यक आहे. 
     भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. सामाजिक न्याय व समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते.
अ)            लोकशाही
१)राजकीय प्रगल्भता :
लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही तर त्या संरचने आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही, समाजाच्या राजकीय जीवनाचा एक भाग बनते.आपल्या देशात संसद, विधानसभा आणि स्थानिक शासन संस्थांच्या माध्यमातून लोकांना थेट प्रतिनिधित्व प्राप्त होते.
जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार केल्यास भारतातील लोकशाही मोठया प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे.वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. सार्वजनिक धोरण आणि प्रश्नाबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत.
२)मताधिकार :
 संविधानातील तरतुदीमुळे  मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मतदाराचे वय २१ वरून १८ वर्ष इथपर्यंत आणल्यामुळे नव्या वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झाला. हा बदल संख्यात्मक नसून गुणात्मकही आहे. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.
३)लोकशाही विकेंद्रीकरण :
 सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात.संविधानातील मार्गदर्शक तत्वाच्या आधारे भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. ७३ व्या व ७४ व्या संविधान दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासनसंस्थाना संविधानाची मान्यता तर  मिळालीच  तसेच त्यांच्या अधिकारात मोठया प्रमाणात वाढ झाली.
४)माहितीचा अधिकार:

लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस, सुदृढ होत जाते. ‘पारदर्शकता आणि उत्तरदायित्व’ ही सुशासनाची दोन वैशिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. यामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली.


ब)सामाजिक न्याय व समता :
सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबीमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे.
सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून प्रयत्न करावे लागतात पण  शासनाच्या धोरणांना व  अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे.समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष ही कमी होतो.
         अनुसूचित जाती व जमातीसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यामध्ये काही जागा  राखीव ठेवल्या जातात.त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद आहे.
         अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा.
         अल्पसंख्यांकाचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत.अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत.भारतीय संविधानाने जात,धर्म,वंश, भाषा व प्रदेश इ.घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे.
         महिलांसंबंधी कायदे व प्रतिनिधित्वविषयक तरतुदी- या अंतर्गत पुढील महत्वाचे कायदे लक्षात ठेवावेत. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा तसेच ७३ व्या व ७४व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थामध्ये महिलांसाठी   ३३% राखीव जागांची तरतूद करण्यात आली. आता हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यात ५०% पर्यंत वाढवण्यात आले आहे. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. राज्यामध्येही  राज्य महिला आयोग आहे.
क)न्यायालयाची भूमिका :
१)संविधानाची मूलभूत चौकट:
संविधान  प्रवाही असते.संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे( LIVING DOCUMENT )  आहे. परिस्थितीप्रमाणे संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार संसदेला आहे.पण संविधानात बदल करताना संसदेला संविधानाच्या मूलभूत चौकटीला (Basic Structure Of The Constitution ) धक्का लावता येणार नाही.
संविधानाच्या  मूलभूत चौकटीतील (Basic Structure Of The Constitution )  प्रमुख तरतुदी :
 यात पुढील तरतुदींचा समावेश होतो. 
  १ शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप
            २ संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप, 
            ३ देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन,
            ४ देशाचे सार्वभौमत्व,     
             ५ धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता.२)महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय :
 संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. त्यात  मानवी हक्कांची जपणूक, बालकांचे हक्क, आदिवासींचे सक्षमीकरण, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्तीस्वातंत्र्य  यासारख्या महत्वपूर्ण विषयावर निर्णय दिले आहेत यातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे.


विद्यार्थी मित्रांनो , www.bhausahebumate.com  या  website वर प्रामुख्याने इतिहास विषयक अनेक लेख आहेत. तुम्ही LABLES अंतर्गत आवडता विषय निवडून लेख वाचा अथवा HOME वर क्लिक करून  MENU निवडा व लेख वाचा . तुम्ही वेळ काढून इतर ही लेख वाचा व इतरांना पण शेअर करा.शिवाय  डॉक्युमेंटरी पहा व प्रतिक्रिया  अवश्य  कळवा. 

 सूचना – शिक्षक बांधवानो व  विद्यार्थी मित्रांनो ,  आता भाऊसाहेब उमाटे सरांचे  मार्गदर्शन व्हिडीयोज  Total History By Umate sir या  Youtube Channel वर उपलब्ध आहेत. तुम्ही या  स्वयंअभ्यास मालेबरोबरच आमचे दहावी साठी बनवलेले व्हिडीयोज पाहिल्यास निश्चितच तुमचा अभ्यास पूर्ण होईल. 
·       Like, share and subscribe our YOUTUBE Channel - Total history by Umate sir   
             Our Official website - www.bhausahebumate.com

           Download our App. From Play store – Bhausaheb Umate


             http://www.bhausahebumate.com/2020/05/blog-post_20.html
-------------------------------------------------------------------------------------------------


No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.