स्वयंअध्ययन अभ्यासमाला लेख ४ - इतिहासलेखन : भारतीय परंपरा
इयत्ता दहावी
विषय : इतिहास व राज्यशास्त्र
स्वयंअध्ययन अभ्यासमाला लेख ४
प्रकरण २ . इतिहासलेखन : भारतीय परंपरा
भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक, लातूर
इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,
महाराष्ट्र राज्य
पाठ्यपुस्तक निर्मिती
व अभ्यासक्रम संशोधन
मंडळ,
बालभारती, पुणे४११००४
विद्यार्थी
मित्रांनो,मागील लेखात आपण इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा या प्रकरणातील स्वाध्यायाचा अभ्यास केला.
आता तुमचा पहिल्या प्रकरणाचा अभ्यास
पूर्ण झाला आहे. पण तुम्ही दिवसातून कमीत कमी एकदा तरी पहिल्या प्रकरणाच्या नोट्स
व त्या प्रकरणावर आधारित प्रश्नांची उत्तरे वाचली पाहिजेत जर तुम्ही Revision केला नाहीत तर आता पर्यंत केलेल्या अभ्यासाचा
फायदा होणार नाही त्यास्तव वारंवार तो भाग अभ्यासा... आज आपण पुढील प्रकरणाचा
अभ्यास करू यात ........ या प्रकरणात आपणास भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल समजून
घ्यावयाची आहे. यात प्राचीन काळातील
इतिहासलेखन, मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन, आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटीश इतिहासकाळ यांचा अभ्यास करावयाचा आहे.हा
एक भाग झाला त्यानंतर भारतीय इतिहासलेखन विविध त्तात्विक प्रणालीमध्ये १ वसाहतवादी
इतिहासलेखन २ प्राच्यवादी इतिहासलेखन ३. राष्ट्रवादी
इतिहासलेखन या तीन तात्विक प्रणालींचा अभ्यास करावयाचा आहे. व शेवटी स्वातंत्र्योत्तर
काळातील इतिहासलेखनाचा अभ्यास करणार आहोत यात १ मार्क्सवादी इतिहास, २.वंचितांचा (सबऑल्टर्ण) इतिहास ३ स्त्रीवादी इतिहास अभ्यासणार आहोत.
या प्रकरणात आपण इतिहासलेखनाच्या
भारतीय परंपरेची माहिती घेणार आहोत.
प्राचीन काळातील
इतिहासलेखन – प्राचीन काळात पूर्वजांचे पराक्रम, दैवतपरंपरा , सामाजिक स्थित्यंतरे
इ,च्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या.
भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्त्रकापासून
किंवा त्या पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दिसते पण अद्याप हडप्पा संस्कृतीची
लिपी वाचता आली नाही.
प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये,
पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ शिवाय भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक साहित्य
, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने ही महत्वाची साधने मानली जातात.
प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास
सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत
उदा. सातव्या शतकात बाणभट्ट यांनी
लिहिलेले ‘हर्षचरित्र’ हे संस्कृत काव्य.
मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन – इतिहासलेखन कसे
शास्त्रशुद्ध असावे याचे उदाहरण म्हणून बाराव्या शतकात
कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथाचा
उल्लेख करता येईल.
मध्ययुगीन मुस्लीम इतिहासकारामध्ये झियाउद्दीन बरनी याने लिहिलेला ‘तारीख –इ-फिरुजशाही’ हा ग्रंथ महत्वाचा आहे यात त्याने
इतिहासलेखानाचा हेतू स्पष्ट केला आहे.
इतिहासलेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या ‘अकबरनामा’ या ग्रंथाचे महत्त्व
आहे.
‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे.शुरवीरांचे
गुणगान , ऐतिहासिक घडामोडी,लढाया, थोर पुरुषांची चरित्रे या विषयींचे लेखन बखरीत
वाचावयास मिळते.मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. छत्रपती राजाराम
महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी
लिहिलेली ‘सभासद बखर’ महत्वाची आहे. ‘भाऊसाहेबांची बखर’ या बखरीत
पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे.पानिपतची बखर , होळकरांची बखर या महत्वाच्या बखरी आहेत.
आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटीश इतिहासकाळ –
विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात
झाली.भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर
कनिंगहॅम हे होते यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन झाले.
जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.ब्रिटीश
अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या इतिहासलेखनात ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव दिसतो. काही महत्वाचे ग्रंथ
पुढीलप्रमाणे -
जेम्स मिल – ‘द हिस्टरी ऑफ ब्रिटीश इंडिया’(१८१७)
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन – ‘द हिस्टरी ऑफ
इंडिया’(१८४१)
जेम्स ग्रँट डफ – ‘ ए हिस्टरी ऑफ द मराठाज’
कर्नल टाँड याने राजस्थानचा इतिहास लिहिला.तर विल्यम
विल्सन हंटर याने लिहिलेल्या हिंदुस्थानच्या द्विखंडात्मक इतिहासात मात्र नि:पक्षपाती
वृत्ती दिसते.
भारतीय इतिहासलेखन विविध तात्विक प्रणाली –
वसाहतवादी
इतिहासलेखन- भारतीय इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या ब्रिटीश अधिकारी
आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या लेखनात भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या
पूर्वग्रहाचे प्रतिबिब दिसते.वसाहतवादी ब्रिटीश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या
इतिहासलेखनाचा वापर केला गेला.उदा. 'केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाचे पाच
खंड.
प्राच्यवादी इतिहासलेखन - युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील
संस्कृती आणि देश यांच्या बद्दल कुतुहूल निर्माण झालेले होते.त्याबद्दल आदर, कौतुक
असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते
त्यांना प्राच्यवादी असे म्हंटले जाते.यांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील
साधर्म्याचा अभ्यास केला.
इसवी सन १७८४ मध्ये विल्यम
जोन्स यांनी कोलकात्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली.त्याद्वारे प्राचीन
भारतीय वाड्मय आणि इतिहास यांच्या
अभ्यासास चालना मिळाली.
फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन
अभ्यासकाने ‘हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला.तसेच त्याने ऋग्वेदाचा
जर्मन भाषेत अनुवाद केला.
राष्ट्रवादी इतिहासलेखन – एकोणिसाव्या- विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये
शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा
अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो त्यांच्या
लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हंटले जाते.
या लेखनास विष्णू शास्त्री यांच्या पासून प्रेरणा मिळाली.महादेव गोविंद
रानडे, रामकृष्ण गोपाल भांडारकर , विनायक दामोदर सावरकर ही प्रसिद्ध राष्ट्रवादी इतिहासलकर होत.
न्या. महादेव गोविंद रानडे यानी ‘ द राईज ऑफ द मराठा पॉवर’ या ग्रंथात मराठा
सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली.
वि.का.राजवाडे यांचे योगदान :
इतिहासलेखन,भाषाशास्त्र, युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक
विषयावर मूलभूत संशोधन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.आपला इतिहास
आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. ‘मराठयांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक
असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
“इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन , केवळ
राजकीय घडामोडी , सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत.”असे
त्यांचे मत होते.अस्सल कागदपत्रांच्याच साह्याने इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा
आग्रह होता.
भारतातील स्वातंत्र्यलढयाला प्रेरणा
देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला.त्यात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी लिहिलेले ‘द
इंडियन वॉर ऑफ इंडीपेन्डन्स’हा ग्रंथ महत्वाचा आहे. राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे
प्रादेशिक इतिहासलेखनास चालना मिळाली.
स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासलेखन : स्वातंत्र्योत्तर काळात
भारतात इतिहासलेखनात पुढील तीन नवे
वैचारिक प्रवाह आढळतात.
१ मार्क्सवादी इतिहास
२.वंचितांचा (सबऑल्टर्ण) इतिहास
३ स्त्रीवादी इतिहास
१ मार्क्सवादी इतिहास
मार्क्सवादी इतिहास कारांच्या लेखनात आर्थिक
व्यवस्थेतील उत्पादनाची साधने , पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध
यांचा विचार मध्यवर्ती होता.प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय
परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र
होते.
मार्क्सवादी
इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला.दामोदर धर्मानंद
कोसंबी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे,रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इ.चे योगदान
महत्वाचे आहे.
‘प्रिमिटीव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी’ हे पुस्तक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण
आहे.
२.वंचितांचा (सबऑल्टर्ण) इतिहास
वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी
इतिहासलेखनाच्या परंपरेतून झाली. ही
कल्पना सर्वप्रथम अँटोनिओ
ग्रामची या इटालियन तत्वज्ञाने मांडली.
वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक
महत्वाचे साधन मानले गेले आहे. वंचीताच्या इतिहासाला महत्वाची विचारसरणी म्हणून
स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केला.भारतात
वंचीताच्या इतिहासाचा विचार महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘हू वेअर
द शुद्राज’ व ‘द अनटचेबल्स’ हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचा
उदाहरण म्हणून सांगता येतील.
स्त्रीवादी इतिहास
भारतीय
इतिहासामध्ये स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित
राहिला आहे .
एकोणिसाव्या शतकात ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान
व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले.सन १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले ‘स्त्रीपुरुष
तुलना’हे
पुस्तक पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
सन १८८८ मध्ये पंडिता रमाबाई यांचे ‘द हाय कास्ट हिंदू वुमन’
तसेच मीरा कोसंबी यांचे ‘क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स : फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी’
व शर्मिला रेगे यांचे ‘रायटिंग कास्ट,रायटिंग जेंडर: रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज’हे
महत्वाचे ग्रंथ आहेत.
विशिष्ट विचारसरणीचा
आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन,
रियासतकार गो.स.सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा उल्लेख करावा लागतो. तसेच य.दि.फडके, रामचंद्र गुहा यांनी
आधुनिक इतिहासलेखनात महत्वाचे योगदान दिले आहे.
सूचना – शिक्षक बांधवानो व विद्यार्थी मित्रांनो , आता भाऊसाहेब उमाटे सरांचे मार्गदर्शन व्हिडीयोज Total History By Umate sir या Youtube Channel वर उपलब्ध आहेत. तुम्ही या स्वयंअभ्यास मालेबरोबरच आमचे दहावी साठी बनवलेले व्हिडीयोज पाहिल्यास निश्चितच तुमचा अभ्यास पूर्ण होईल.
· Like, share and subscribe our YOUTUBE Channel - Total history by Umate sir
·
Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-----------------------------
Post a Comment