इतिहास स्वयंअध्ययन अभ्यासमाला लेख ३
इयत्ता दहावी
विषय : इतिहास व राज्यशास्त्र
स्वयंअध्ययन अभ्यासमाला  लेख ३
                                                                       
                                                                             भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                  ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक, लातूर
                                                                                       इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
                                                                                         बालभारती, पुणे४११००४
                                                                                                        www.bhausahebumate.com
                                                                                      
                                                                                                

           विद्यार्थी मित्रांनो,मागील लेखात आपण इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा  या प्रकरणाचा सविस्तर  आढावा घेतला होता.
 मला खात्री आहे तुम्ही या नोट्सच्या साह्याने पहिल्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास पूर्ण केला आहे. पण मित्रांनो आपणास जोपर्यंत त्या प्रकरणावर आधारित प्रश्नांची उत्तरे देता येत  नाहीत  तोपर्यंत अभ्यास पूर्ण झाला आहे असे म्हणणे चुकीचे आहे  ...म्हणून आज आपण या प्रकरणावर आधारित प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत ते पाहू यात ...यात स्वाध्यायातील प्रश्नांची तर उत्तरे आहेतच पण पाठावर आधारित इतर ही काही प्रश्न सरावासाठी दिली आहेत.प्रकरण १. इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा ( स्वाध्याय )

आपण सर्वप्रथम  प्रश्न क्रमांक १ अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा       प्रश्न १ ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा आणि प्रश्न क्रमांक २ अ . दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
    तर चला मग या तिन्ही प्रश्नांचा आपण एकत्रित अभ्यास करू यात ,,,,
विद्यार्थी मित्रांनो आपण फक्त वरील माहिती लक्षात ठेवली तर माझ्या मते प्रश्न क्र,१ अ व ब, प्रश्न     क्रं.२ अ ची संपूर्ण तयारी होईल. स्वाध्यायातील प्रश्नाशिवाय इतर प्रश्न विचारल्यास ही आपण सहज पणे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. चला तर मग उदाहरणासह  पाहूयात ..
     स्वाध्यायातील प्रश्न ---
     १.आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ...............यास म्हणता येईल.
      उत्तर -आधुनिक इतिहास लेखनाचा जनक  व्हाँल्टेअर  यास म्हणता येईल.
      २ ‘आर्केऑलॉंजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ ....................याने लिहिला.
      उत्तर - ‘आर्केऑलॉंजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ  मायकेल फुको  याने लिहिला.
      आता हे झाले स्वाध्यायातील प्रश्न ....यापेक्षा वेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात का ? या प्रश्नांचे सरळ उत्तर होय असे आहे. आपण जर अशा प्रश्नांचा ही अगोदरच अभ्यास केल्यास इतर प्रश्नांच्या उत्तरासाठी ही मदत होते ....
       समजा ‘आर्केऑलॉंजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ ....................याने लिहिला या ऐवजी दुसऱ्या    एखादया विचारवंताच्या ग्रंथाचे नाव विचारल्यास confuse होण्याचे काहीच कारण नाही .
       चला सराव करूयात ....
       ३.‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ हा ग्रंथ ......................याने लिहिला .
      उत्तर – ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ हा ग्रंथ लिओपाँल्ड व्हान रांके  याने लिहिला.
      स्त्रीवादाची मूलभूत भूमिका..............या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली.
       उत्तर -  स्त्रीवादाची मूलभूत भूमिका  सीमाँ- द- बोव्हा  या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली
        विसाव्या शतकात .............या देशात अॅनल्स प्रणाली उदयास आली .
       उत्तर - विसाव्या शतकात फ्रान्स या देशात अॅनल्स प्रणाली उदयास आली .
          आता अशा प्रकारे  इतर प्रश्न तयार करून सराव करा.
          आता प्रश्न १ ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. याचे एक उदाहरण पाहू .
   १.जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल -‘रिझन इन हिस्टरी’        
   २. लिओपाँल्ड व्हान रांके - ‘द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
   ३. हिरोडोटस - ‘द हिस्टरिज’
    ४ कार्ल मार्क्स - ‘ डिसकोर्स ऑन द मेथड’
    उत्तर – चुकीची जोडी कार्ल मार्क्स - ‘ डिसकोर्स ऑन द मेथड’
लक्षात ठेवा -  उत्तर पत्रिकेत वरीलप्रमाणे फक्त चुकीची जोडी लिहिणे अपेक्षित आहे. तुम्ही परत चार ही जोड्या लिहण्याची आवश्यकता नाही त्यामुळे विनाकारण आपला वेळ वाया जातो तसेच ती जोडी दुरुस्त करून लिहिण्याची पण आवश्यकता नाही.)
(वरील उत्तराचे तुमच्यासाठी स्पष्टीकरण-  वरील जोडी चुकीची का? तर कार्ल मार्क्स यांच्या ग्रंथाचे नाव दास कॅपिटल असे आहे आणि ‘ डिसकोर्स ऑन द मेथड’ हा ग्रंथ रेने देकार्त यांचा आहे.

प्रश्न २ अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा,

उत्तर :
प्रश्न २ ब     टिपा लिहा .
१ ‘दवंदववाद’ –  
१.जर्मन तत्त्वज्ञ जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडलेला दवंदववाद’हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे.२.हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्या शिवाय मानवी मनाला या घटनेचे आकलन होत नाही. उदा.खरे - खोटे, चांगले – वाईट. या पद्धतीला दवंदववाद  असे म्हणतात. ३.या पद्धतीत  प्रथम एक सिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रति सिद्धांत मांडला जातो. या दोन्हीं सिद्धांताची  तर्कावर आधारित ऊहापोहानंतर ( चर्चा केल्यानंतर ) त्या दोन्हीचे सार ज्यात सामावलेले आहे. अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. यालाच
दवंदववाद’ असे म्हणतात.

२ अनल्स प्रणाली :
 १ विसाव्या शतकात फ्रान्समध्ये  इतिहासलेखनाची अॅनल्स प्रणाली उदयास आली.        २.इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे. महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी,युद्धे यांच्यावरच  केंद्रित करू नये .
   तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने,     सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्वाचे मानले जाऊ लागले.
  ४ अॅनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच  दिशा मिळाली.


३ इतिहासकार –
उत्तर - १.इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापुर्वक संशोधन करून , भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते.२.अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात. ३.अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हंटले जाते.
    प्रश्न ३ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
       स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरु झाले.
उत्तर- १ इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टीकोनाचा प्रभाव होता अशा काळात  सीमाँ- द- बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.२ स्त्रियांच्या दृष्टीकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहासलेखन होय.३.स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टीकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. ४ सीमाँ- द- बोव्हा यांच्या या मांडणीमुळे नोकरी, ट्रेड युनियन,त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन सुरु झाले.
       फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.
उत्तर – १ फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले.२. पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. ३ मायकेल फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण  देण्यावर भर दिला .म्हणून या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हंटले जाते.
३. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती , प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.
उत्तर - इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती , प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची  पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते.
४ व्हाँल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचे  जनक असे म्हटले जाते.
उत्तर-१. फ्रेंच तत्त्वज्ञ व्हाँल्टेअर यांचे  मूळ नाव – फ्रान्स्वा मरी अरुए असे होते. २.इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ट सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढयावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. ३.त्यामुळे  इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला.म्हणून व्हाँल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचे  जनक असे म्हटले जाते.
    प्रश्न -५ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा
    १ कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा.
उत्तर- १ जर्मन तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात  वर्ग संघर्षाचा     सिद्धांत मांडला.२ इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.माणसामाणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात.
३. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष  निर्माण होतो.
४.मानवी इतिहास अशा वर्गसंघार्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली. या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टीकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.
   २ आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची  चार वैशिष्ट्ये कोणती ?
    उत्तर - आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची  वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
   १,  ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे.तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
२. हे प्रश्न मानवकेंद्रित  असतात. भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट  कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.
३.या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह्य पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते.
४ मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
       स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय ?
उत्तर – १.स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रियांच्या दृष्टीकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. २ इतिहासाच्या लेखन प्रकारात पुरुषांचे वर्चस्व असताना सीमाँ- द- बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.३.स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टीकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. ४.स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, ट्रेड युनियन,त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन सुरु झाले.
    ५.१९९० नंतर ‘स्त्री’हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहण्यावर भर दिला गेला.
४ लिओपाँल्ड व्हान रांके यांचा इतिहास विषयक दृष्टीकोन स्पष्ट करा.
उत्तर  - जर्मनीतील बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक लिओपाँल्ड व्हान रांके यांनी   इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. २.मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त माहिती सर्वाधिक महत्वाची यावर भर. ऐतिहासिक घटनांशी संबंधीत असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ३.इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर टीका केली आणि जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला.

     हे लक्षात ठेवाच ( Importanat Poimts For Revision )
Ø आधुनिक इतिहासलेखनाची बीजे ५ व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आढळतात.’ हिस्टरी’ भा शब्द ग्रीक भाषेतील असून हिरोडोटसने तो प्रथम त्याच्या द हिस्टरिज’ या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.
Ø रेने देकार्त फ्रेंच तत्त्वज्ञ. ‘ डिसकोर्स ऑन द मेथड’ हा ग्रंथ
Ø व्हाँल्टेअर फ्रेंच तत्त्वज्ञ. मूळ नाव – फ्रान्स्वा मरी अरुए. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक.
Ø जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल जर्मन तत्त्वज्ञ. ‘रिझन इन हिस्टरी’हा ग्रंथ  ‘दवंदववाद’हा सिद्धांत    
Ø लिओपाँल्ड व्हान रांके -जर्मन तत्त्वज्ञ . ‘द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी’आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ हे ग्रंथ.    
Ø कार्ल मार्क्स - मूळ जर्मन तत्त्वज्ञ. ‘दास कॅपिटल’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ. वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला.
Ø अनल्स प्रणाली - विसाव्या शतकात फ्रान्स मध्ये उदय .
Ø स्त्रीवादी इतिहासलेखन -स्त्रियांच्या दृष्टीकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.सीमाँ- द- बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.
Ø मायकेल फुको -  फ्रेंच इतिहासकार. ‘आर्केऑलॉंजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ.इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन.

विद्यार्थी मित्रहो, मुलांना अभ्यास का कठीण वाटतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असताना मला असे आढळून आले की इतिहासाचे पाठय पुस्तकच मुले अभ्यासत नाहीत. मग पाठयपुस्तकातील आशय समजून घेण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि केवळ बाजारात उपलब्ध असणारे  विविध प्रकाशनाच्या  गाईडमधील प्रश्नांची रेडीमेड उत्तरे पाठ करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात घ्या. अशा प्रकारामुळे अभ्यास खूप कठीण होऊन बसतो. आपण केवळ घोकंपट्टी करून एखादा भाग लक्षात ठेवल्यास तो जास्तच  कठीण जाणार आणि त्यात एखादा जरी शब्द आठवला नाही तर पुढील काहीच आठवत नाही.त्यामुळे मला असे वाटते की आपण सुरुवातीला तरी फक्त पाठ्यपुस्तकाच्या आधारेच अभ्यास करावा ...या नोटस आणि मार्गदर्शन तरी तुमच्या सोबतीला आहेच की ....... आता तुमच्यासाठी एक Good News  …… 
 शिक्षक बांधवानो व  विद्यार्थी मित्रांनो ,  आता भाऊसाहेब उमाटे सरांचे  मार्गदर्शन व्हिडीयोज  Total History By Umate sir या  Youtube Channel वर उपलब्ध आहेत. तुम्ही या  स्वयंअभ्यास मालेबरोबरच आमचे दहावी साठी बनवलेले व्हिडीयोज पाहिल्यास निश्चितच तुमचा अभ्यास पूर्ण होईल. 
·       Like, share and subscribe our YOUTUBE Channel - Total history by Umate sir   परत भेटूयात पुढील बुधवारी ( दिनांक २० मे ला ) ....सकाळी ११ वाजता .......आणि करूया अभ्यास इतिहासलेखन : भारतीय परंपरा या प्रकरणाचा .........

मित्रहो, जर तुम्हाला  ही अभ्यासमाला उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही या  
WWW,BHAUSAHEBUMATE.COM  ला follow करण्ज्यायास विसरू नका.मुळे नवीन लेख 

प्रकाशित झाल्याबरोबर तुम्हाला मेसेज येईल.


·        Our Official website - www.bhausahebumate.com

·        Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------------

No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.