इतिहास स्वयंअध्ययन अभ्यासमाला लेख 2इयत्ता दहावी
विषय : इतिहास व राज्यशास्त्र

स्वयंअध्ययन अभ्यासमाला  लेख 2
                                                                       
                                                                                 भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे
                                                                                  ज्ञानेश्वर विद्यालय,शाहू चौक, लातूर
                                                                                       इतिहास अभ्यास मंडळ सदस्य,
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती
व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
                                                                                         बालभारती, पुणे४११००४
                                                                                         www.bhausahebumate.com
                                                                                      
           विद्यार्थी मित्रांनो,मागील लेखात आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकानुसार गुण विभागणी या विषयी जाणून घेतले होते तसेच स्वयंअध्ययन कसे करावे या विषयी माहिती पाहिली होती.  आज आपण इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा  या प्रकरणाचा सविस्तर  आढावा घेणार आहोत.
 तुमची या नवीन पाठयपुस्तकाची तिसरी बॅच आहे.मागील दोन वर्षात  सुरुवातीला बहुतांश विद्यार्थी पहिले प्रकरण अवघड आहे असे म्हणतात पण माझ्या मते हे प्रकरण सर्वात सोपे आहे. फक्त तुम्ही लक्षपूर्वक हा लेख वाचा. माझी खात्री आहे की तुम्ह्वाला हे प्रकरण आवडणार आणि त्याची उत्तरेही सहजपणे  लिहिता येतील.


प्रकरण १. इतिहासलेखन : पाश्चात्य परंपरा


या प्रकरणात  कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ?
१.    इतिहास संशोधन पद्धती कशी विकसित झाली.
२.    इतिहास लेखन म्हणजे काय ? इतिहासकार म्हणजे काय ?
३.    आधुनिक इतिहासलेखनाची वैशिट्य
४.    युरोपातील वैज्ञानिक दृष्टीकोननाचा विकास व इतिहासलेखन
५.    युरोपातील महत्वाचे विचारवंत व इतिहासलेखणाविषयी त्यांचे योगदान
अर्थात या प्रकरणात इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेचा आढावा घेतलेला आहे.
आता आपणास अगदी सुटसुटीत पद्धतीने वरील मुद्यांचा विचार करावयाचा आहे. पण मी मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यासास सुरुवात केली आहे का? ( जर तुम्ही पहिला लेख वाचला नसाल तर अगोदर पुढील लिंकला क्लिक करून तो वाचून घ्या ) नेहमी एक बाब लक्षात ठेवा जे प्रकरण आपण वर्गात शिकणार आहोत ते अगोदर घरी वाचून घेतलेच पाहिजे. यामुळे जरी तुम्हाला त्यातला बराचसा भाग समजला नसला तरी कमीत कमी त्या विषयाची पार्श्वभूमी तरी लक्षात येते.
जर तुमच्याकडे  अद्याप इतिहासाचे पाठयपुस्तक नसेल तर तुम्ही  e.balbharti  या संकेत स्थळावरून दहावीची सर्व पाठ्यपुस्तके Pdf format स्वरुपात  Download करून घेऊ शकता.जर यामध्ये तुम्हाला काही अडचण आल्यास तुमच्या शिक्षकांशी संपर्क साधा.
मित्रांनो, ही तर  तुमची दहावीची सुरुवात आहे म्हणून तसेच  आजचा भागही तुमच्यासाठी नवीन असल्यामुळे या प्रकरणाच्या थोड्या सविस्तर नोटस देत आहे. मात्र एकदा तुम्हाला या विषयाचा गाभा समजला की आपण नोट्स मध्ये अधिक नेमकेपणा आणू यात आणि  परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नोत्तरांच्या सरावावर भर देऊ. मात्र आता थोडासा सविस्तर अभ्यास करू ...
 इतिहास संशोधन, लेखन आणि अभ्यास ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे.वैज्ञानिक ज्ञान शाखामध्ये विविध घटनांच्या संदर्भात सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे शक्य असते कारण त्यात प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो.
इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती , प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची  पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते.
ऐतिहासिक दस्तावेज ज्या भाषेत आहेत ती भाषा व लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते.तसेच अक्षर वाटिका ( अक्षराचे वळण ) , भाषाशैली,कागदाच्या निर्मितीचा काळ,प्रकार, अधिकार दर्शक मुद्रा  यासारख्या गोष्टींचे ज्ञान असलेल्या जाणकाराची आवश्यकता असते.
   इतिहासकार म्हणजे काय ?
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापुर्वक संशोधन करून , भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते.हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हंटले जाते.
जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती.पण वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या, पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होतीच.लोककथा, गीत, पोवाडे या मौखिक साधनांच्या आधारे इतिहास जपला जात असे.
आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची  वैशिष्ट्ये :
   १,  ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे.तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
२. हे प्रश्न मानवकेंद्रित  असतात. भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट  कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही.
३.या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह्य पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते.
४ मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.
आधुनिक इतिहासलेखनाची बीजे ५ व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आढळतात.’ हिस्टरी’ भा शब्द ग्रीक भाषेतील असून हिरोडोटसने तो प्रथम त्याच्या ‘द हिस्टरिज’ या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. म्हणूनच हिरोडोटसला इतिहासाचा जनक(Father Of History) असे म्हणतात.

युरोपातील वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विकास आणि इतिहासलेखन :
अठराव्या शतकानंतर युरोप-अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहासलेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले.
सन १७३७ मध्ये जर्मनीतील गाँटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली.या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.

युरोपातील महत्त्वाचे विचारवंत

रेने देकार्त (१५९६-१६५०)

 फ्रेंच तत्त्वज्ञ. ‘ डिसकोर्स ऑन द मेथड’ हा ग्रंथ. इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले.
‘एखादी गोष्ट सत्य आहे असे नि:संशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये’असा शास्त्र शुद्ध संसोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नियम मांडला.
व्हाँल्टेअर (१६९४-११७८)
फ्रेंच तत्त्वज्ञ. मूळ नाव – फ्रान्स्वा मरी अरुए. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ट सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढयावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यातून इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला.
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल(१७७०-१८३१)

 जर्मन तत्त्वज्ञ. ‘रिझन इन हिस्टरी’ हा प्रसिद्ध ग्रंथ.ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर .इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार बदलत जाणे  स्वाभाविक असते असे प्रतिपादन. या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी कमी प्रतीच्या नाहीत.अशी खात्री.”
हेगेलचा ‘दवंदववाद’:  
हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्या शिवाय मानवी मनाला या घटनेचे आकलन होत नाही. उदा.खरे - खोटे, चांगले – वाईट. या पद्धतीला दवंदववाद  असे म्हणतात. यात प्रथम एक सिद्धांत मांडला जातो त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रति सिद्धांत मांडला जातो. या दोन्हींच्या तर्कावर आधारित ऊहापोहानंतर त्या दोन्हीचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते.
( हा सिद्धांत सोप्या भाषेत समजून घेऊ – वाद ,प्रतिवाद व संवाद म्हणजे एखाद्याने एक मत मांडल्यानंतर दुसरा त्याच्यापेक्षा वेगळ म्हणजे विरोधी मत मांडतो व या दोघांच्या चर्चेनंतर त्या दोघांच्या मांडणीतील  योग्य मुद्दे टिकतात व अयोग्य मुद्दे नाकारले जातात. त्या चांगल्या विचारांच्या समन्वयास संवाद असे म्हणतात. हेगेलचा हा विचारच कार्ल मार्क्स यांच्या विचाराचा पाया किंवा आधार होता)  

लिओपाँल्ड व्हान रांके (१७९५-१८८६)

जर्मन तत्त्वज्ञ.बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक. ‘द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी’आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ हे ग्रंथ.    इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती मांडली. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त माहिती सर्वाधिक महत्वाची यावर भर.ऐतिहासिक घटनांशी संबंधीत असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर टीका केली.
कार्ल मार्क्स (१८१८- १८८३)
 मूळ जर्मन तत्त्वज्ञ पण नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक. ‘दास कॅपिटल’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ. वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला.

इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.माणसामाणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष  निर्माण होतो.
मानवी इतिहास अशा वर्गसंघार्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली.
अनल्स प्रणाली :
 विसाव्या शतकात फ्रान्स मध्ये उदय .इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे. महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी,युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्वाचे मानले जाऊ लागले. अॅनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली.
स्त्रीवादी इतिहासलेखन :
स्त्रियांच्या दृष्टीकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.सीमाँ- द- बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टीकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर.
स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, ट्रेड युनियन,त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन सुरु झाले.
१९९० नंतर ‘स्त्री’हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहण्यावर भर दिला गेला.
मायकेल फुको : (१९२६-१९८४)

 फ्रेंच इतिहासकार. ‘आर्केऑलॉंजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ.इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन. पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला.
इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र , तुरुंगव्यवस्था यासारख्या विषयांचा मायकेल फुको याने इतिहासाच्या दृष्टीने विचार केला.
अशा रीतीने आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती वाढत गेली.
मित्रहो, जर तुम्हाला  ही अभ्यासमाला उपयुक्त वाटत असेल तर अगोदर तुम्ही माझ्या website follow करा. ज्यामुळे नवीन लेख प्रकाशित झाल्याबरोबर तुम्हाला मेसेज येईल.


विद्यार्थी मित्रांनो, वरील नोटस तुम्ही कमीत कमी तीन वेळा वाचून काढा व नंतर स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे न बघता देण्याचा प्रयत्न करा.( आणि हो विचारवंताचा जन्म / मृत्यू वर्ष तसेच हे  कोणाचे चित्र आहेत असे प्रश्न येत नाहीत त्यामुळे हे दोन भाग लक्षात नाही ठेवल्यास चालेल.)
 पुढच्या भागात आपण या प्रकरणावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत. त्या स्वाध्यायातील प्रश्नांचा तर समावेश असेल तसेच इतरही प्रश्नांचा समावेश असेल ज्यामुळे या प्रकरणातील कोणत्याही आशयावर प्रश्न विचारला गेला तरी तुम्ही सहजपणे त्याचे अचूक उत्तर लिहू शकाल.
आणि हो आता वेळ आली आहे आपणच आपल्या अभ्यासाचे नियोजन करण्याची. तुम्ही एक छान नियोजन करा. लक्षात घ्या कोणत्याही परिस्थिती मध्ये दिवसाला सहा ते आठ तास अभ्यास झाला पाहिजे. आपण जर आता पासूनच अभ्यासात वेग घेतलो तर नंतर फार त्रास होत नाही आणि ताण ही येत नाही त्यामुळे स्वयंशिस्त पाळत स्वतः च अभ्यास करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ....परत भेटूयात पुढील बुधवारी ( दिनांक १३ मे ला ) ....सकाळी ११ वाजता .........

स्वयं अध्ययन लेखमालेतील पहिल्या लेखास तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात, सहा दिवसात १८००० पेक्षाही जास्त विद्यार्थानी  हा लेख वाचला आहे. त्यामुळेच माझ्या website ने एक लाख TOTAL PAGEVIEWS चा टप्पा पार केला  याचा आनंद आहे. हा लेख तुमच्या पर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू – भगिनीचे हार्दिक आभार ....
विद्यार्थी मित्रांनो , www.bhausahebumate.com  संकेतस्थळावर इतिहास विषयक अनेक लेख आहेत. तुम्ही LABLES अंतर्गत आवडता विषय निवडून लेख वाचा अथवा HOME वर क्लिक करून  MENU निवडा व लेख वाचा . भारतीय स्वातंत्र्य लढयात जालियानवाला बाग हत्याकांडाविषयी वाचले असेलच. आपल्या हैदराबाद संस्थानात ही अशीच एक घटना घडली होती. या घटनेला येत्या १० मे ला ७२ वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने मी लिहलेल्या शोधनिबंधाची  तसेच Documentary ची लिंक देत आहे. तुम्ही वेळ काढून लेख वाचा व डॉक्युमेंटरी पण पहा व प्रतिक्रिया  अवश्य  कळवा.  
  
        लेख वाचण्यासाठी खालील लिंकला click करा.

       http://www.bhausahebumate.com/2020/05/blog-post.html    

      Documentary पाहण्यासाठी खालील लिंकला click करा

             https://youtu.be/vqAAAs-ViqA

 सूचना – शिक्षक बांधवानो व  विद्यार्थी मित्रांनो ,  आता भाऊसाहेब उमाटे सरांचे  मार्गदर्शन व्हिडीयोज  Total History By Umate sir या  Youtube Channel वर उपलब्ध आहेत. तुम्ही या  स्वयंअभ्यास मालेबरोबरच आमचे दहावी साठी बनवलेले व्हिडीयोज पाहिल्यास निश्चितच तुमचा अभ्यास पूर्ण होईल. 
·       Like, share and subscribe our YOUTUBE Channel - Total history by Umate sir   
·                      Our Official website - www.bhausahebumate.com

·                       Download our App. From Play store – Bhausaheb Umate
-------------------------------------------------------------------------------------------------


No comments

Theme images by luoman. Powered by Blogger.